मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल!
परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावीचा शिक्षण घेत आहे. सुदर्शन शिंदे असे आरोपीचे नाव आहे. सुदर्शन शिंदे या तरुणाने पीडितेच्या हात धरून “माझ्यासोबत चल” असे म्हणत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलींने ही बाब घरी सांगितली. तिच्या वडिलांनी जाब विचारण्याचा ठरवलं. तिचे वडील आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र या जाब विचारण्यालाच आव्हान मानत सुदर्शन शिंदे गावातील सुमारे 15 जणांना एकत्र करून मुलीच्या घरात शिरला.
काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण
या १५ जणांच्या टोळीने जातीवाचक शिवीगाळ करत पीडित अल्पवयीन मुलीची काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण केली. हल्ल्यात मुलीसह तिच्या कुटुंबातील आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
१६ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून सुदर्शन शिंदे याच्यासह एकूण 16 जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी ॲक्ट) तसेच इतर 21 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.






