मुंबई : “मुस्लिम जनतेला आपले नेतृत्व पुढे यावे असे वाटते, मात्र एमआयएम (MIM) या भावनेचा चुकीचा फायदा घेत आहे,” अशी कडवी टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांनी केली आहे. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एमआयएमने भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करत त्यांनी एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तय्यब जफर यांनी म्हटले आहे की, २०१९ मध्ये विधानपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या क्रॉस व्होटिंगपासून सुरू झालेला एमआयएमचा राजकीय दुटप्पीपणा आता उघडपणे समोर येत आहे. अकोट नगर परिषदेत एमआयएमने थेट भाजपसोबत युती केली असून अचलपूरमध्येही पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे मुस्लिम समाजाच्या विश्वासाशी केलेला थेट विश्वासघात असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीच्या काळात भाजपला हरवण्याचा बाणा मारत मुस्लिमांच्या नावावर मते मागितली जातात, मात्र सत्तास्थापनेची वेळ आली की हीच मते भाजपच्या चरणी अर्पण केली जातात, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपला रोखण्यासाठी ज्यांनी एमआयएमवर विश्वास ठेवून मतदान केले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम एमआयएमने केल्याचा आरोप जफर यांनी केला आहे.
स्थानिक पातळीवर होत असलेल्या या युतींबाबत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना माहिती नाही का, असा थेट सवाल उपस्थित करत जफर म्हणाले की, जर ओवैसी यांना या सर्व घडामोडींची कल्पना असूनही ते मौन बाळगत असतील, तर ते भाजपसोबतच्या युतीला दिलेले मूक समर्थनच मानावे लागेल.
या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






