नथुरामने आपल्या ऐहिक आयुष्यात असे काय पराक्रम गाजवले की, तो एखाद्या चित्रपटाचा नायक व्हावा ? खाजगी जीवनात तरी कोल्हे ह्यांना नथुराम साकारणारी प्रेरणा कुठून मिळाली ह्याचा खुलासा त्यांनी केला नाही. उद्या जर का एखाद्या विकृत निर्मात्याने संभाजी राजांच्या खुनाला घेऊन चित्रपट काढला आणि त्यातील क्रूरकर्मा औरंग्या ह्याची बाजू घेऊन संभाजी महाराजांच्या खुनाचे समर्थन केले ,तर अशी मालिका किंवा चित्रपट डॉ कोल्हे करणार आहेत का ?
डॉ अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. अमोल कोल्हेंचा हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. येत्या महिना अखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकरांच्या ‘गोडसे’ चित्रपटाच्या घोषणेनंतर पुन्हा त्याच मुद्द्यांवर वाद सुरू झाले आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. गेल्या काही काळात काही हिंदुत्ववादी संघटनांनी नथुरामला फाशी दिली तो दिवस ‘बलिदान दिवस’ म्हणून साजरा केल्यावर, भाजपा नेते साक्षी महाराज आणि प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी गोडसेला देशभक्त म्हटल्यावर देशभर मोठा वाद उसळला होता. चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षात असल्यासारखे निवेदन दिले आहे. त्यामध्ये नथुराम गोडसे याने १९४८ मध्ये गांधीची हत्या केली. कडव्या विचारांचे निर्माता आता यावर्षी ३० जानेवारीलाच गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारा चित्रपट प्रदर्शित करू पाहत आहेत. दुसरीकडे महात्मा गांधींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या देशाची ओळख गांधींजींच्या नावाने होत आहे. सत्य, अहिंसा, सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यातून दाखवून दिले. म्हणूनच संपूर्ण जगभर ते परम पुज्यनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून पाळला जात असताना दुसरीकडे अशांतता, द्वेष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल, असा निवेदनाचा आशय आहे. ह्या वादात काँग्रेस ,शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका विसंगत दिसत असली, तरी ती एकमेकाला पूरक अशीच आहे. एकाने मारल्यासारखे करायचे, दुस-याने रडल्यासारखे करायचे आणि पवारांनी त्यांना उगी उगी करत दोघांना पुचकारायचे ही पटकथा असणार आहे. कारण सेना ही आधीपासून गोडसे विचारांची समर्थक आहे, तर शरद पवार हे कुणाच्या विरोधात आहेत ते २०२२ उजळले तरी नक्की नाहीय. अशात काँग्रेस तरी नक्की गांधींच्या विचारांची आहे का तर त्याचे उत्तरदेखील नकारार्थीच आहे. कारण काहीही करून सत्ता टिकवायची हा फायनल अजेंडा असल्याने ‘बापूना ‘ वा–यावर सोडायला काँग्रेसी तयार आहेत.
ही भूमिका साकारणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणताहेत की, २०१७ मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालं, जेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो, किंवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी १०० टक्के सहमत असतो असं नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहींशी आपण विचारधारेंशी सहमत नसतानाही भूमिका करतो. मुळात माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ भूमिका कधीही घेतली नाही. शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत, कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केल्याचं म्हटलं आहे. एखादा व्यक्ती कलाकार म्हणून भूमिका घेत असेल, तर त्याकडे कलाकार म्हणूनच पाहायला हवं, असा मोलाचा सल्ला देण्यास ते विसरले नाहीत. शरद पवारांनी म्हटलं.नाशिक येथे पार पडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते, असे प्रमाणपत्र बहाल करणारे शरद पवार नक्की कुठल्या विचाराचे आहेत ह्याचे नवलच होते. सावरकरांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठविणा-या शिवाजी महाराजां विषयी सावरकरानीं लिहिले आहे की ,”… त्या तरण्याबांड पोरीला परत पाठवायची म्हणजेच शत्रूची वीण वाढवण्यास साहाय्य करण्यासारखेच होते. महाराज जशास तसे नि शठं प्रति शाठ्यम् या तत्त्वाने चालणारे! मग हे त्यांना कसे उमगले नाही? अरे तुम्हाला-महाराजांना शुद्ध वर्तणूक ठेवण्याबद्दल कोणीच नावे ठेवू शकत नाही. पण, तरीही ती परत करण्याचे काय कारण होते? एखाद्या मोठ्या सरदाराला ती देऊन टाकायची. तेही करायचे नसले, त्यांचा एखादा हुजऱ्या तरी जवळपास होता ना? त्याने ती सुंदर पोर आनंदाने स्वीकारली असती. नव्हे, शत्रूंची वीण वाढवण्यापेक्षा तिने महाराजांच्या एखाद्या तरी एकनिष्ठ प्रजाजनाला जन्म दिला असता!” (सावरकरांशी सुखसंवाद, श्री. पु. गोखले, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई. १९८३, पृष्ठ ११२). पवारांना सावरकर विज्ञाननिष्ठ वाटत असल्याने त्यांनी सोयीने अमोल कोल्हे ह्यांचे ‘कलावंत’ म्हणून समर्थन केले आहे. उद्या अजमल कसाब वर एखादा चित्रपट निघाला आणि त्याने पडलेले मुडदे हे किती योग्य होते, असा विषय असला तरी राष्ट्रवादी आणि त्यांची नेतेमंडळी एक कलाकृती म्हणून डॉ कोल्हे ह्यांना कसाबची भूमिका साकारायला परवानगी देतील ,असे समजायला हरकत नाही.
बरे हा पात्र साकारण्याचा कोल्हे ह्यांचा अंतस्थ हेतू तरी काय आहे ? नथुरामने आपल्या ऐहिक आयुष्यात असे काय पराक्रम गाजवले की, तो एखाद्या चित्रपटाचा नायक व्हावा ? खाजगी जीवनात तरी कोल्हे ह्यांना नथुराम साकारणारी प्रेरणा कुठून मिळाली ह्याचा खुलासा त्यांनी केला नाही. उद्या जर का एखाद्या विकृत निर्मात्याने संभाजी राजांच्या खुनाला घेऊन चित्रपट काढला आणि त्यातील क्रूरकर्मा औरंग्या ह्याची बाजू घेऊन संभाजी महाराजांच्या खुनाचे समर्थन केले ,तर अशी मालिका किंवा चित्रपट डॉ कोल्हे करणार आहेत का ? कलावंत म्हणून ते औरंगजेबाचे पात्र योग्य ठरवून ते साकारतील का ? ह्याचे उत्तर अगदी लहान मुलाला कळणारे आहे की डॉ कोल्हेच नव्हे, तर कुणीही सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेला माणूस हे पात्र मान्य करणार नाही.ज्याने बुद्धी गहाण ठेवली अशीच ठार वेडी माणसे अशी पात्र रंगवतील. खरे तर नथुराम हा शाळा सोडलेला काही काळ टेलर म्हणून काम केलेली व्यक्ती, त्यानंतर त्याने फळं विकण्याचाही व्यवसाय केला, मग तो हिंदू महासभेत दाखल झाला. तिथे तो संघटनेच्या वर्तमानपत्राचं संपादन करत असे. गोडसेचे वडील टपाल कार्यालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. असे अगदी सामान्य जीवन जगलेला व्यक्ती साकारण्याची खुमखुमी डॉ कोल्हेना का असावी ? गांधी खुनानंतर तो संघातून काढून टाकलेला होता. अशी भूमिका त्यावेळी संघाने घेतली होती. मात्र, हा दावा खरा नाही असे ‘गांधीज् असॅसिन’ या पुस्तकाचे लेखक धीरेंद्र झा ह्यांनी लिहिले आहे. गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक ‘महत्त्वाचा स्वयंसेवक’ होता. त्याला संघातून काढून टाकल्याचा कोणताही ‘पुरावा’ नाही. सुनावणीपूर्वी नोंदवण्यात आलेल्या जबानीमध्ये त्याने ‘हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी संघापासून फारकत घेतल्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता.सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत गोडसेने दोन्ही संघटनांसोबत एकाच वेळी काम करत असल्याचं कबूल केलं होतं, असं झा लिहितात. या संदर्भातील वादात गोडसे कुटुंबीयांनीही पूर्वी मतं मांडलेली आहेत. नथुरामचे बंधू (२००५ साली मरण पावलेले) गोपाळ गोडसे म्हणाले होते की, त्यांच्या भावाने “संघापासून फारकत घेतली नव्हती.”या शिवाय, नथुराम गोडसेच्या चुलत नातवाने २०१५ साली एका पत्रकाराला सांगितल्यानुसार, नथुराम गोडसे १९३२ साली संघात दाखल झाला आणि त्याला “कधीही संघातून काढून टाकण्यात आलं नव्हतं आणि त्याने कधीही संघापासून फारकतही घेतली नव्हती.”झा यांनी अभिलेखागारं पालथी घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभा या दोन संघटनांमधील संबंधांचाही शोध घेतला आहे. हिंदू महासभा व रा. स्व. संघ यांच्यातील संबंध “परस्परव्याप्त व प्रवाही” स्वरूपाचे होते आणि त्यांची विचारसरणी सारखी होती, असं झा लिहितात. असे कॅरेक्टर साकारून नेमके काय साध्य झाले आहे हे कोल्हे ह्यांनी सांगितले पाहिजे.
मुळात लेखनस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य वगैरे माणसाचे मूलभूत अधिकार आविष्कार स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट होतात. हे मूलभूत अधिकार निरंकुश वा अनिर्बंध नसतात. भारतीय राज्यघटनेतील १९ व्या कलमानुसार भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परराष्ट्रांबाबतचे स्नेहसंबंध, सार्वजनिक सुव्यवस्था वा सभ्यता अगर नीतिमत्ता यांना बाधा पोहोचणार नाही, अशी दक्षता घ्यावी लागते. ह्याचा विसर नेते म्हणून शरद पवार आणि कोल्हे दोघांना पडलेला दिसत नाही. त्यामुळे गोडसेनं फक्त पिस्तुल घेऊन गांधींना गोळ्या घातल्या या पलीकडे त्याच्या आयुष्यात कथा काय आहे? खुनशी विकृती पलीकडे काही एक नाही. त्याचे छुपे आणि खुले समर्थक असलेल्या प्रवृत्तीला तुषार गांधी ह्यांनी अत्यंत समर्पक उत्तर दिले आहे, “गोडसेची ओळख ही एक खुनी अशीच राहणार आहे. कोणीही ती ओळख पुसू शकणार नाही. पण, अशा चित्रपटांमुळे हिंसेचं उदात्तीकरण होण्याची शक्यता असते, असं त्यांना वाटतं. पण, मला याबद्दलचा गाढ आणि पक्का विश्वास आहे की, त्यांनी काहीही केलं, अगदी शाहरुख खान किंवा अमिताभ बच्चन किंवा बाकी कोणी जरी नथुराम गोडसेची भूमिका केली, तरी त्यांना एका मारेकऱ्याचीच भूमिका साकारावी लागेल. तेही मारेकऱ्याला एका हिरोमध्ये बदलू शकणार नाहीत”. तुषार गांधी ह्याचे विश्लेषण अगदी सटीक आहे. कलावंत किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही झाकता येणार नाही. कुणाच्याही खुनाचे समर्थन करताच येणार नाही. मग, तुम्ही कुठल्या बाजूचे आहेत ह्याने काहीएक फरक पडत नाही.
काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेने चालवलेली ही आंधळी कोशिंबीर महाराष्ट्राला नवी नाही. सेना ही हिंदुत्वाचा पुरस्कार करते आणि म्हणून बाबरी मस्जिद पाडण्याचे जाहीर समर्थन करते. काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष सांगून बाबरी विध्वंस हा कट्टर हिंदुत्ववाद्यांचे कृत्य म्हणून आंदोलने करते.राष्ट्रवादीची भूमिका ही ऑल इज वेल अशी असते. शरद पवार हे वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळी भूमिका मांडत असतात. त्याचा एक दुस-याशी काहीएक ताळमेळ नसतो. म्हणून खुनाच्या घटनेतील समर्थनावर निघालेल्या चित्रपटाला ते कलाकृती म्हणून पाहयचा संदेश देताहेत. असाच खेळ १९८८ साली मी नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाचे वेळी घडला आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ प्रदीप दळवी यांनी हे नाटक लिहिलं होतं, पण तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि सेन्सॉरचं प्रमाणपत्र या नाटकाला मिळू शकलं नाही. १९९८ मध्ये राजकीय स्थिती बदलली होती. शिवसेनेच्या नेतृत्वातलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं होतं. तेव्हा या नाटकाला आवश्यक प्रमाणपत्र मिळाले होते. सत्तेत असलेल्या शिवसेनेचा या नाटकाला पूर्ण पाठिंबा होता, तर काँग्रेसनं त्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. केंद्रात भाजपाच्या नेतृत्वातलं ‘एनडीए’चं सरकार होतं. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावर हा तणाव नाट्यगृहांपर्यंत येऊन पोहोचला. पोलीस बंदोबस्तात प्रयोग सुरू झाले.आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक आहे. तेव्हा विरोधात असलेली काँग्रेस आज ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ ह्या नाटकाला पाठिंबा देणा-या सेनेसोबत भागीदारीच्या सत्तेत आहे. ज्यांनी गोडसे साकारले त्या राष्ट्रवादीच्या खासदार कोल्हे ह्यांची राष्ट्रवादीदेखील सत्तेतील तिसरा भागीदार आहे. काँग्रेसला जर गांधी खरेच प्रात समरणीय असतील आणि पटोले दावा करतात तसे ‘अशांतता, द्वेष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळणार असेल’ ,तर काँग्रेस काही निर्णय घेणार आहे का ? ह्याचे उत्तर काँग्रेस देशाला देणार आहे की फरफटत, केविलवाणी होऊन मी नाथूराम कोल्हे बोलतोय चा ओटीटी वरील प्रदर्शनाला बळेबळेच विरोध करणार आहे हे लवकरच दिसेल.
राजेंद्र पातोडे
अकोला