जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शनिवारी रात्री एका ऑक्सिजन रिफिलिंग फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. विश्वकर्मा औद्योगिक क्षेत्रातील (VKI) रोड नंबर १७ वरील करणी विहार कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडली. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, फॅक्टरी मॅनेजरसह अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
शनिवारी रात्री ७:४५ च्या सुमारास फॅक्टरीमध्ये सिलिंडर रिफिलिंगचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, फॅक्टरीवरील पत्र्यांचे शेड हवेत उडाले आणि बाजूची भिंत जमीनदोस्त झाली. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासच्या परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचा भास झाला, ज्यामुळे भीतीने लोक घराबाहेर धावत आले.
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
मृत व्यक्ती: मुन्ना राय (मूळ रा. झारखंड) – फॅक्टरीमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. स्फोटाच्या तीव्रतेमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
– गंभीर जखमी: 1. विनोद गुप्ता (४५ वर्षे): फॅक्टरी मॅनेजर.
– शिबू ऊर्फ अनुवा: मूळ रा. झारखंड, फॅक्टरी कर्मचारी.
जखमींना तात्काळ जवळच्या खेतान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून स्फोटाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, रहिवासी भागाजवळ अशा प्रकारच्या फॅक्टरी सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.





