मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ३८ येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो युवक, महिला आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे दिंडोशी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सागर गवई प्रमुख उपस्थित होते. मुंबईत वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात युवक पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र या सोहळ्यात पाहायला मिळाले.

कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी आणि निर्भीड नेतृत्वाचा उल्लेख करण्यात आला. तसेच सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर उभा केलेला संघर्ष, प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका आणि युवकांमध्ये निर्माण झालेली जागृती यामुळे वंचित बहुजन आघाडीची विचारधारा समाजात अधिक व्यापकपणे पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या शाखा क्रमांक ३८ चे उपशाखाप्रमुख उपासक गायकवाड आणि तेजस्विनी उपासक गायकवाड यांच्यासह शेकडो युवक व महिलांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. हा प्रवेश स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशासाठी किरण धावरे यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे आणि पक्षप्रवेशाच्या मोठ्या संख्येमुळे परिसरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई महासचिव रोनक जाधव, उपाध्यक्ष आरिफ पठाण, समन्वयक चेतन गायकवाड, विजय लांडगे, अभिषेक वाकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून संघटना मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक डावरे आणि युवा कार्यकर्ते किरण डावरे यांच्या योगदानाबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे दिंडोशी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






