मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केली आहे. आज सकाळी जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. ते आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले आहेत.
मुंबई वाहतुकीत बदल: पोलिसांनी जारी केले नवीन आदेश
मुंबई पोलिसांनी २९ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या या आंदोलनामुळे वाहतुकीत बदल केले आहेत. मोर्चातील सहभागी लोक पायी, मोटरसायकल, कार आणि इतर वाहनांनी येत असल्याने, काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
वाहतुकीस बंदी असलेले मार्ग (आवश्यकतेनुसार):
१ ) वाशीहून येणाऱ्या आणि पांजरपोळ-फिवे कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना साऊथ बॉण्ड मार्गावर प्रवेश नाही.
२) वीर जिजाबाई भोसले मार्गावरुन ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या वाहनांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत.
३) छेडानगरवरुन फ्री वेला जाणाऱ्या वाहनांनाही बंदी आहे.
या मार्गांसाठी पर्यायी मार्ग :
- वाशीहून येणाऱ्या वाहनांनी मानखुर्द टी जंक्शन ब्रीज स्लिप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आयओसी जंक्शन आणि छेडानगर मार्गे मुंबई शहरात प्रवेश करावा.
– घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे आणि फिवेला जाणाऱ्या वाहनांनी छेडानगर मार्गे मुंबई शहरात प्रवेश करावा.
- छेडानगरवरुन फ्री वेला जाणाऱ्या वाहनांनी उजवीकडे वळून अमरमहल, नेहरूनगर ब्रीज, सुमननगर जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने शहरात प्रवेश करावा.
हे आदेश २९ ऑगस्ट, २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील.