माणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने विशेष लेख…

डॉ. सोमनाथ कदम

मानवी जीवनाचा विचार केला तर असे दिसते की इतिहासाच्या संशोधनातून मानवी समूहाच्या अस्तित्वाचे, स्वत्वाचे व समस्यांचे आकलन करून आपण नवा इतिहास घडवित असतो. भारतातील एका मोठ्या समूहाचा इतिहास पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य आणि त्यांच्या समस्याचे आकलन ज्या महामानवाने केले ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विस्थापितांच्या समग्र परिवर्तनासाठी दीर्घपल्याची लढाई यशस्वीपणे लढली. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशी विविध रूपे या चळवळीची आहेत. या चळवळीच्या प्रभावामुळे भारतातील अनेक उपेक्षित जाती – जमातींच्या लोकांचे खर्‍या अर्थाने सोने झाले. कवी वामनदादा कर्डक म्हणतात त्याप्रमाणे –

उद्धारली कोटी कुळे ॥
भिमा तुझ्या जन्मामुळे ॥

हे सर्वार्थाने आज सिध्द झालेले आपण पाहतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसाधारणपणे 1920 ते 1956 या कालावधीत या मानवमुक्तीच्या चळवळीचे समर्थपणे नेतृत्व केले. म्हणून 1920 हे वर्ष आंबेडकरी चळवळीचा प्रारंभबिंदू तर 1956 हे वर्ष या चळवळीचा अंतिमबिंदू ठरले. दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथील बहिष्कृत परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या राजकीय, सामाजिक सुधारणा चळवळीच्या नभांगणावर खर्‍या अर्थाने उदय झाला म्हणून आंबेडकरी चळवळीत माणगावची परिषद ऐतिहासिक, गतिशील आणि सम्यक परिवर्तनासाठी ‘टर्निंग पाँईट’ ठरली हे लक्षात घ्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने तत्कालीन कागल या जहागिरीतील माणगाव या गावी ही परिषद भरली होती. या परिषदेत केवळ महार समाजाचा सहभाग नव्हता तर सर्व वंचित, उपेक्षित जाती – जमातींचा सहभाग होता. या परिषदेतील राजर्षी शाहू महाराजांचे भाषण तसेच त्यांनी आपल्या संस्थानातील केलेली अस्पृश्य उध्दाराची कामे यांची माहिती देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उज्ज्वल नेतृत्वाविषयी केलेली भविष्यवाणी महत्त्वाची ठरली कारण, पुढील काळात राजर्षींचे ते भाकीत डॉ. आंबेडकरांनी खरे करून दाखविले.

माणगाव परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. त्यात डॉ. आंबेडकरांनी अत्यंत चिकित्सकपणे अस्पृश्यांच्या दयनीयतेची कारणमीमांसा केली आणि या देशातील अस्पृश्य वर्गाच्या दयनीयतेचे कारण ईश्वरी लीला नसून उच्चवर्णिय व प्रस्थापित वर्गाच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या दृष्कृत्यांचा परिणाम आहे हे उपस्थित जनतेला डॉ. आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. आत्मबल आणि स्वाभिमान ही प्रमुख दोन अस्पृश्यांच्या उन्नतीची कारणे आहेत हे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या अधोगतीची कारणे भारतीय सामाजिक व्यवस्थेत असल्याचे निर्देश त्यांनी केले. तसेच व्यापार, शेती आणि नोकरी या तीनही प्रगतीच्या वाटा बंद असल्याने अस्पृश्य वर्गाच्या विकासात आडकाठी येत असल्याचे स्पष्टीकरण याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याचबरोबर केवळ अस्पृश्यांच्या दुरावस्थेवर नव्हे, तर ब्राम्हणेतरांच्या दुरावस्थेवरही चिकित्सक असे भाष्य डॉ. आंबेडकरांनी या परिषदेत केलेले होते म्हणूनच उपस्थित समुदायांसाठी त्यांचे मार्गदर्शन हे खरे टॉनिक’ ठरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात शेकडो सभा आणि परिषदा घेतल्या. आपली चळवळ जातीबध्द नाही हे स्पष्ट करण्यासाठी काही वेळा स्वतंत्रपणे महार, मातंग, चर्मकार समाजाच्या परिषदा घेतल्या, तर बहुतेक वेळा संयुक्त सभा, परिषदा घेतल्या या प्रत्येक परिषदेचे वेगळेपण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक काही ठराव प्रत्येक परिषदेत घेत असत. ते ठराव म्हणजे तत्कालीन समूहाचे लोकमत असाच त्याचा अर्थ होता आणि सर्वांसमक्ष त्या ठरावाच्या मागण्यांना लोकाश्रय मिळविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत असत, म्हणून या माणगाव परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने व कुशल मार्गदर्शनाखाली एकूण पंधरा ठराव घेतलेले होते. या ठरावापैकी पहिले तीन ठराव हे तात्कालिक व औपचारिक स्वरूपाचे होते.

पहिल्या महायुध्दात ब्रिटीश सरकारला अर्थात दोस्त राष्ट्रांना विजय मिळविल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच राजर्षी शाहू छत्रपती आणि काही इतर संस्थानिक व राजे जे बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करीत होते त्यांचे आभार, मानपान असे ते तात्कालिक महत्त्वाचे व सुधारकवर्गाचे मनोबल उंचावणारे व कृतज्ञतेने हे ठराव केलेले होते. ठराव क्र. 4 हा या परिषदेतील महत्त्वाचा भाग होता कारण तत्कालिन हिंदी साम्राज्यात अन्य समूहाप्रमाणे अस्पृश्यांनाही समान मानवी हक्क मिळण्याची आग्रही मागणी त्यात होती त्याचबरोबर व्यापार, नोकरीशिवाय आपली प्रगती होणार नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वअनुभवाने समजले होते म्हणूनच गुणसिध्द योग्यतेने त्यांना (अस्पृश्यांना) व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे हे ठासून सांगण्याचा या परिषदेत प्रयत्न झाला व अशा प्रकारचे मूलभूत अधिकार मिळताना आडकाठी आल्यास सरकारने कायद्याने मदत करावी असे त्या परिषदेचे मत असल्याचेही जाहीरपणे ठरावात मांडण्यात आले.

ठराव क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे शिक्षणासंबंधी होते याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील अस्पृश्य वर्गातील एकमेव उच्च विद्याविभुषित व्यक्तीमत्त्व होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते म्हणून ‘शिका’ या ब्रीदाची जाहीरपणे वाच्यता करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हीच परिवर्तनाची गुरूकिल्ली आहे हे माणगावच्या या त्यांच्या पहिलाच जाहीर सभेतून स्पष्ट केलेले होते. प्राथमिक शिक्षण मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता मिळावे, बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून त्याच वर्गातील इन्स्पेक्टर नेमावेत अस्पृश्यांना शिष्यवृत्या द्याव्यात आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात या मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या सर्व मागण्यांची 1920च्या दरम्यानची परिस्थिती पाहून आपण चिकित्सा केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी काळाच्या सुमारे शंभर वर्ष पुढची होती हे आपल्या लक्षात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्त्वावर पाश्चात्य आधुनिक मूल्यांचा, स्त्री – पुरूष समानतेचा आणि आरक्षण ही काळाची गरज असल्याचा तसेच सहशिक्षणातूनच जातीभेद दूर होईल या आत्मविश्वासाचा फार मोठा प्रभाव वरील ठरावात दिसून येतो. पुढील काळात आंबेडकरी चळवळीत शैक्षणिक चळवळीला जे महत्त्व आले त्याची रूजुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या माणगाव परिषदेतच केली होती हेही यातून आपल्यासमोर येते. या ऐतिहासिक परिषदेत ठराव क्रमांक 13 सुध्दा एक क्रांतिकारी स्वरूपाचा होता. या ठरावात असे नमूद करण्यात आले होते की भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधीही त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून घेण्यात यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे.

अस्पृश्यांचे हक्काचे प्रतिनिधी निवडून आले तर त्यांचे प्रश्न सुटतील हा विश्वास डॉ. आंबेडकरांना वाटत होता. नेमकी हीच भूमिका तत्पूर्वी त्यांनी साऊथ ब्युरो कमिशनसमोर मांडताना अस्पृश्यांना शैक्षणिक व राजकीय हक्क देण्याची मागणी केलेली होती. त्यांचे प्रतिबिंब माणगाव परिषदेच्या ठरावात उमटलेले दिसते. म्हणजेच जे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात, ध्येय धोरणात होते तेच या ठरावाच्या पानापानात प्रतिबिंबित झालेली होते व त्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय मागण्या पुढे रेटण्याचा डॉ. आंबेडकरांचा उद्देश होता. त्यासाठीच पुणे करारापूर्वी त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केलेली होती हेही लक्षात घ्यायला हवे. या माणगाव परिषदेतील ठराव करताना अत्यंत विचारपूर्वक केलेले होते. तत्कालीन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्नांना तोंड फोडण्याचा आणि आपली अस्पृश्य उध्दाराची चळवळ गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला व त्याच अनुशंगाने पुढीलकाळात चळवळीची दिशा निश्चित केली व भारतीय संविधानात महत्त्वाची कवचकुंडले येथील सर्व विस्थापितांना प्रदान करण्यात डॉ. आंबेडकर आघाडीवर राहिले.

ज्या माणगाव परिसरात पुढीलकाळात या चळवळीचा विचार कशापध्दतीने झाला एवढेच नव्हे तर या परिषदेच्या शतकपूर्तीच्या आजच्या काळात त्या परिषदेच्या ठरावाचा विचार करता चळवळीची आजची अवस्था काय आहे याचे ही चिंतन या निमित्ताने झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सम्यक चळवळ ज्या माणगाव परिसरात कोल्हापूर भागात सर्वप्रथम सुरू झाली. दुर्देवाने आज त्या परिसरात आंबेडकरी चळवळ विशेष गतिमान दिसत नाही. विदर्भात, कोकणात ज्या गतीने आज आंबेडकरी चळवळीची बीजे रूजली आहेत त्या प्रमाणात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आंबेडकरी विचार धम्म्मविचार रूजले नाहीत हे वास्तव आहे.

केवळ भौतिक विकास म्हणजे अस्पृश्यांची प्रगती असा अर्थ या चळवळीत अपेक्षित नसतो कारण, बौध्दिक विकासाशिवाय चळवळ पुढे जात नसते. आजही बर्‍याच ठिकाणी सार्वजनिक पातळीवर  जयभीम  करण्यास कचरणारे समूह आणि आंबेडकरी विचारधारेचा प्राण असलेला धम्म विचार नाकारून विषमतावादी संस्कृतीचे पाईक असणार्‍यांची संख्या माणगाव आणि कोल्हापूर भागात आजही काही प्रमाणात का असेना असणे हे दुर्दैव म्हटले पाहिजे. काही प्रज्ञावंत मंडळी तर 1920 च्या माणगाव परिषदेचा उल्लेख महार परिषद असा करतात आंबेडकरी चळवळ जातीच्या कप्यात बंदिस्त करतात हे सवार्थाने चुकीचे आहे.

शतकपूर्तीनंतरच्या या काळात माणगाव परिषदेच्या आठवणी इतिहास प्रेरणेने पुढे नेणे गरजेचे आहे. इतिहास हे एक असे शस्त्र आहे की, ज्यातून आपणास बोध घेता येतो किंवा जे लोक इतिहासातून बोध घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकविल्याशिवाय राहत नाही.माणगाव परिषदेच्या शतकोत्तर वाटचालीत आपण अधिक सम्यकपणे चळवळीत वाटचाल करणे, चिंतन करणे ही काळाची गरज आहे, आंबेडकरी चळवळ बौध्देतर व ब्राम्हणेतर समाजाच्या घराघरात घेऊन जाणे व आंबेडकरी  निळाई’ चा आवाज बुलंद करणे तसेच जय भिम  हा सम्यक परिवर्तनाचा पासवर्ड समजून आंबेडकरी विचार मूल्याचे जतन व संवर्धन करण्याची खर्‍या अर्थाने हीच ती वेळ आहे हे लक्षात घ्यावे.
(संपर्क  : 9423731382)


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *