– संजीव चांदोरकर
एक कुटुंब आहे. कुटुंबप्रमुख स्त्री धरा किंवा पुरुष किंवा दोघे एकत्र. त्याला / त्यांना तीन मुलगे आणि तीन मुली आहेत. अर्थात सर्व भिन्न अंगकाठीची आणि स्वभावाची देखील. त्यांना खायला घालणे हे पालकांचे काम. त्यांच्या घरात अन्नाची नेहमीची मारामारी.
त्यांच्यापैकी एका आडदांड मुलाचे नाव आहे “इन्फ्रास्टक्चर” , त्याला भांडवल नावाचा पदार्थ खाण्याची सवय आहे, त्याची भांडवलाची भूक शमतच नाही. त्याला भांडवल मिळाले नाही की हा आडदांड मुलगा , त्याच्या पालकांची मुंडी धरतो. घरातून हाकलून देण्याची धमकी देतो. दुसऱ्या पालकांना घरात आणून बसवीन अशी धमकी देतो. हा पालकांचा लाडका आहे. वदंता अशी आहे की “इन्फ्रास्ट्रक्चर” भांडवल पदार्थ ताटात घेऊन, त्यातील काही वाटा पालकांना मागच्या दाराने देतो.
दुसरा देखील मुलगा त्याचे नाव “संघटित कर्मचारी”. हा पण अंगापिंडाने मजबूत. त्याला आधी प्रॉमिस केलेले तेवढे अन्न जेवणाच्या वेळी मिळालेच पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर हा घराला कुलूप लावून स्वतःच्या खिशात चाव्या ठेवतो. याला तो “स्ट्राईक” म्हणतो. त्यामुळे त्याला ठरलेले अन्न वेळच्या वेळी पालकांना घालावेच लागते.
तिसरा मुलगा आहे त्याचे नाव “व्याज”. त्याची भूक वर्षागणिक वाढतच आहे. त्याचे बाहेरच्या दादा लोकांशी संबंध आहेत. त्याला वेळच्या वेळी अन्न मिळाले नाही तर तो त्या बाहेरच्या लोकांना बोलावून घरावर जप्ती आणतो.
चौथी मुलगी “समाज कल्याण” नावाची. किरकोळ शरीरयष्टी. फार आवाज देखील चढवू शकत नाही. मिळेल ते, मिळेल तेव्हा, मिळेल तेव्हढेच खाते.
पाचवी पण मुलगी. नाव “लाडकी बहीण”. खरेतर ही पालकांनी अलीकडेच दत्तक घेतलेली. तिच्यात असे काहीतरी आहे की ती दुसरीकडे जाऊ नये म्हणून पालक तिला ठरलेले अन्न घालतातच.
सहावी मुलगी “आम जनता”. ती तर जणू काही सवतीची. कुटुंबप्रमुख तर तिला ताट वाढत नाहीत. ती घरच्या बाहेर रानोमाळ भटकत असते. अर्धी भुकेली. काय मिळाले खायला तर मिळाले.
गेली काही वर्षे घरात, परसात, डब्यात, भांड्यात , कुकरमध्ये, शिजवलेले, न शिजवलेले अन्न / धान्य कमी पडत आहे. त्याचे मूलभूत कारण पालक स्वतः काही कष्ट घेत नाहीत. बाहेर जाऊन नवीन धान्य आणतच नाहीत.
मग वेळोवेळी समाजकल्याण मुलीच्या ताटातील अन्न काढून लाडकी बहीण च्या ताटात वाढले जाते. इन्फ्रास्ट्रक्चर, संघटित कर्मचारी आणि व्याज या आडदांड मुलग्यांच्या ताटातील अन्न काढून घेण्याची पालकांची हिम्मत नाही.
ही गोष्ट आठवली ज्यावेळी लाडकी बहिणीला दिवाळी साजरी करता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने ४१० कोटी रुपये समाजकल्याण विभागाचे काढून लाडक्या बहिणींना दिले
कर वाढवून त्या उत्पन्नातून लाडकी बहीण सारखी योजना राबवली गेली असती तर तो वेगळा प्रस्ताव असता ; कारण कर संकलन युनी डायरेक्शनल फ्लो असतो. त्यात सरकारवर भविष्यात काही उत्तरदायित्व तयार होत नाही
लाडक्या बहिणांना दिले जात असणारे पैश्यामुळे राज्यावर कर्ज वाढत आहे. कर्ज काढून ज्यावेळी ते पैसे गरिबांना वाटले जातात , त्यावेळी पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात , व्याजासाठी आणि मुद्दल परतफेडीसाठी तरतुदी वाढल्यामुळे , गरिबांच्या कल्याणकारी योजनांसाठी कमी पैसे उपलब्ध होणार आहेत.
कमी शाळा / कमी इस्पितळे / शाळांची गुणवत्ता / इस्पितळांची गुणवत्ता खालावणार, सार्वजनिक वाहतूक, वीज सबसिडी कमी करावी लागणार इत्यादी. त्यांचे खाजगीकरण होणार. (ही फक्त काही उदाहरणे घेतली आहेत , त्यात भर घालता येईल).
म्हणजे लाडक्या बहिणींना आपल्या मुलामुलींसाठी / कुटुंबातील आजारी माणसांसाठी / सार्वजनिक वाहतूक, वीज यासाठी जास्त खर्च करावा लागणार इत्यादी पैसे कमी पडतात म्हणून अधिक मायक्रो लोन्स काढावी लागणार. सरकारकडून मिळालेले पैसे ईएमआय भरण्यात खर्ची पडणार.
याला म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे, हे सगळी राजकीय अर्थव्यवस्था कोण समजावून सांगणार लाडक्या बहिणींना / भावांना …..
कर्ज काढून तुमच्या अकाउंट मध्ये जे पैसे घातले जात आहेत ते भविष्यात तुमच्या कडून कॅश किंवा नॉन कॅश स्वरूपात , प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे पुढची अनेक वर्षे वसूल केली जाणार आहेत
नाशिक मध्ये मुक्तीभूमी येथे ‘प्रबुद्ध भारत’च्या बुक स्टॉलचे भीमराव आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक : येवला येथील ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे 'प्रबुद्ध भारत'च्या बुक स्टॉलचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या...
Read moreDetails