मुंबई : महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.
शेतकरी अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त असताना, कृषिमंत्र्यांच्या या कथित कृतीमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याबाबत सरकारची उदासीनता याच कारणामुळे असावी, अशी टीका केली आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि नापिकीमुळे ग्रामीण भागातील गंभीर परिस्थिती असताना, सभागृहात मंत्र्यांच्या अशा वर्तनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ‘जंगली रमी’ नावाचा ऑनलाइन गेम खेळताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
आमदार कैलास पाटील यांनी या घटनेनंतर सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे राज्यातील तरुण आणि शेतकरी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरीही सरकारने यावर कारवाई का केली नाही, हे आता स्पष्ट होत आहे, असे पाटील म्हणाले. मंत्रिमंडळातीलच काही सदस्य या गेमचे व्यसनी बनले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पाटील यांनी यापूर्वी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची मागणी केली होती. “लाखो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना मुख्यमंत्री यांनी या गेमवर बंदी का आणली नाही, हे आता मला कळाले आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना याचे व्यसन लागले असल्याचे दिसून येत आहे,” असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails