प्रस्तुत लेखातील लेखक अनिकेत गुळवणी यांचं दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. निधनाच्या आधी प्रबुद्ध भारतासाठी त्यांनी हा विशेष लेख लिहला होता. त्यांचा हा विशेष लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे LGBTQ समूहाचे प्रश्न मांडणारा, एक तरुण उमदा लेखक, कार्यकर्ता आपल्यातून निघून गेलाय. “प्रबुद्ध भारताच्या”वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
वैश्विकरण झाल्यानंतरच्या या काळात जागतिक पातळीवर आधुनिक प्रथेनुसार जून महिना हा लैंगिक अल्पसंख्यांक असलेल्यांचा गौरव म्हणून साजरा करण्यात येतो. भारतासारख्या जातपितृसत्ता प्रबळ असलेल्या ठिकाणी लैंगिकता हा मुद्दा खरोखरच सामाजिक भेदभावाच्या संदर्भात कळीचा असतो. पण, प्रतिमा जपण्याच्या दांभिक मानसिकतेमुळे लैंगिकता हा विषयच अनैतिक मानून त्याबद्दल चर्चा टाळली जाते. सामाजिक अधिकार असलेल्या शोषक उच्चभ्रू समूहांना लैंगिकतेचे नियम तोडले तरीही फारसा त्रास /शिक्षा होत नाही पण, निम्नवर्गीय जातींना तेच नियम तोडण्याची, मनाप्रमाणे जगण्याची मुभा नसते. दलित व आदिवासी समाजातील समलैंगिक, तृतीयपंथी आणि इतर लैंगिक अल्पसंख्य संपूर्णपणे दोन्ही प्रकारे नाडले जातात, म्हणून लैंगिकतेवर जातीयवादाची सांगड घालत हे भाष्य करण्याचा खटाटोप.जातपितृसत्ताक समाजात लैंगिकतेचे जाचक नियम धाब्यावर बसवण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वजातीय स्ट्रेट व उच्चजातीय गे पुरुषांचीच आहे. तरच लेस्बिअन स्त्रीया, हिजडे, वेश्या, व निम्नजातीय गे पुरुष निदान उघडपणे त्यांची ओळखतरी बिनधास्त उघड करू शकतील. लैंगिकतेच्या लढ्याबाबत नकारात्मकता व उपहासाचं वलय आणि उपभोगात्मक म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण, लैंगिकतेचे एकनिष्ठादी ब्राम्हण्यवादी नियम सामाजिक संसाधनांच्या असमान वितरणाला मोठाच हातभार लावतात व विविध शोषित वंचित गटांना नैतिकतेच्या नावानं एकत्र येऊ देत नाहीत. लैंगिकता विषयाचा अभ्यासक या नात्याने समाजमाध्यामांवर लिखाण करत असल्याने माझ्याकडे खूप शोषित समूहांतील समलैंगिक मुलंही मदत मागतात पण, त्यांच्या जाती-जमातीचे प्रश्नही वेगळे असल्याने व लैंगिकतेचे ब्राम्हण्यवादी नियम त्यांचेही पुरुष पाळत असल्याने त्यांना मदत करणे विलक्षण कठीण जाते. जर आपण लग्नसंस्थेच्या ब्राम्हणी वर्चस्ववादी नैतिकतेला व पावित्र्याला कृतिशील आव्हान नाही दिले, तर शोषितांना पुन्हा पितृसत्तेला शरण जावेच लागते. कृपया आमचाही समलैंगिक म्हणून दया दाखवत स्वीकार करा, हीच भूमिका त्यांच्या घरी पुन्हा घ्यावी लागते. ब्राम्हणी व्यवस्था लैंगिकतेचे जाचक नियम; घटस्फोट, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, समलैंगिकता, हिजडे, वेश्याव्यवसाय, बहुनिष्ठा, गर्भनिरोधक वापर, विवाहपूर्व शारीरिक संबंध, विवाहहीन संबंध, कुमारीमाता इ. सगळ्यांनाच लावते व विविध सामाजिक उतरंडी बनवते, त्यांच्या आपापसात फूट पाडते आणि दांभिक नैतिकतेच्या जोरावर शोषण करते. संसाधनांचे हक्क स्वतःकडे ठेवते. विवाहसंस्थेची निर्मितीच ब्राम्हण्यवादी आहे. ज्या अल्पसंख्य व्यक्ती लिंगभावाच्या कोणत्याच सामाजिक निकषांत-साच्यांत बसत नाहीत व स्त्री-पुरुषपणाचे नियम पाळत नाहीत; त्या प्रचलित विवाहसंस्थेला व पर्यायाने पुरुषसत्तेला आव्हानात्मक वाटतात. त्यांचे तृतीय-चतुर्थ प्रकारांत वर्गीकरण करणे व त्यांना समान प्रतिष्ठा व दर्जा देणे म्हणजे विवाहसंस्थेला पर्याय उपलब्ध करून देणे; अशी समजूत समाजात असते. जास्तीत जास्त व्यक्ती स्त्री-पुरुषपणाच्या नियमांचे उल्लंघन करून / द्वैताच्या बाहेर जाऊन जगल्यास-राहिल्यास जातिसंस्थेलाच धोका उद्भवू शकतो. म्हणून हे नियमन सक्तीचे केले जाते व ते नियम न पाळणाऱ्या व्यक्तींची सामाजिक अप्रतिष्ठा होते. ”खरा मर्द” वगैरे सन्माननीय सर्वोच्च प्रकार व त्याखालोखाल इतर सर्व-मर्दानी बाई, लेडीज महिला, बायकी पुरुष, समलैंगिक व्यक्ती, षंढ, तृतीयपंथी –हिजडे इ. सामाजिक उतरंड मुद्दाम तयार केली जाते. या सामाजिक नियमांच्या प्रमाणे जो स्त्रीदेह असलेल्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवतो तोच खरा पुरुष व जी पुरुषदेह असलेल्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवते तीच खरी स्त्री ! असे असल्याने ज्या व्यक्ती निषिद्ध मानलेल्या समलैंगिक संबंधाना अनुसरतात, त्या केवळ लैंगिकतेच्या नियमांचेच उल्लंघन करत नाहीत, तर लिंगभावाच्या स्त्री-पुरुष या द्वैताचेही उल्लंघन करतात. तीच बाब इतर सर्व लैंगिक अल्पसंख्यांकांची; म्हणून स्त्रीवाद आणि लैगिकतांचा अभ्यास या गोष्टी परस्परावलंबी आहेत. ज्या वैयक्तिक कृतींच्याद्वारे लिंगभाव व लैंगिकतेच्या नियमांचे उल्लंघन केले जाते त्यांना विकृती समजण्यात येते. ज्या पुरुषदेह धारण करणाऱ्या व्यक्तीस; स्त्रियांचे कपडे घालणे, स्त्रीप्रमाणे हावभाव-चाल-वर्तन करणे आवडते, दुसऱ्या पुरुषदेह असलेल्या व्यक्तींसोबत शरीरसंबंध ठेवणे आवडते, ते स्वतःला स्त्री समजून स्त्रियांची विकृत नक्कल करत आहेत, असे मानले जाते. तसेच समलिंगी जोडप्यांत तथाकथित बायकी-पुरुषी वागणारे जोडीदार विषमलिंगी संबंधांची नक्कल करत आहेत, असा समज असतो. प्रत्यक्षात त्यांचे तसे वागणे ही त्यांच्या वैयक्तिक लिंगभावाची अभिव्यक्ती असते. अशा वागण्यातून लिंगभावाच्या धारणांची व तीच्या द्वैतातील विभागणीची ते जणू खिल्ली उडवत असतात. उदाहरणार्थ, साडी नेसणे हे केवळ स्त्रीदेहाचेच नैसर्गिक वर्तन आहे या समजाला, पुरुषदेहसुद्धा साडी नेसू शकतो या बंडात्मक कृतीतून सुरुंग लावला जातो. लिंगभावाची अभिव्यक्ती ही व्यक्तीसापेक्ष असते हे सांगायचे असते यातून. कोणतीही व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे स्त्री-पुरुष द्वैतापलीकडे लैंगिक वर्तन करू शकते व त्यात अनैसर्गिक असे काही नाही, कारण लिंगभाव व लैंगिकता या गोष्टीच मुळात समाजानेच ठरवलेल्या व म्हणून कृत्रिम आहेत.
बायकी पुरुष, समलैंगिक व्यक्ती, तृतीयपंथी –हिजडे, क्रॉसड्रेसर इ. लिंगभावाच्या सामाजिक संकेतांचे उल्लंघन करत द्वैत मोडतात आणि तसे करताना ते स्त्री-पुरुषांची विकृत नक्कल करतात, असे मानले जाते. या समजामागे अस्सल स्त्रीत्व किंवा अस्सल पुरुषत्व असे काहीतरी अस्तित्वात असते, ही धारणा गृहीत धरली असते. कारण मूळ प्रत असल्याशिवाय तिची नक्कल करता येत नाही. परंतु, वास्तवात स्त्रीदेहावर किंवा पुरुषदेहावर स्त्रीत्व-पुरुषत्व त्या त्या काळातील व समाजातील निकष-गरजांनुसार कृत्रिमरित्या लादलेले असते. हिजडे बाईपणाची नक्कल करतात असे मानल्यास मूळ बाईपण हे काहीतरी नैसर्गिक असते, हे मानावे लागते. पण बाईने साडी नेसावी, सोशिक-मर्यादाशील असावे, गृहकृत्यदक्ष असावे, कोमल-मृदू हावभाव-हालचाली असाव्यात, पुरुषासमोर दुय्यम वागावे, इ. बाईपणाचे नियमसुद्धा कृत्रिम असतात, समाजाने ठरवले असतात. स्त्री तिला मिळणाऱ्या विशेषाधिकार आणि मान्यतेच्या मोबदल्यात ते नियम पाळून बाईपण वठवून दाखवत असते, सादर करत असते. त्याचप्रमाणे हिजडेसुद्धा तसे वागून बाईपण वठवतच असतात. त्याव्यतिरिक्त हिजडे साडी नेसून बाजारात ज्या पद्धतीने पैसे मागतात, टाळ्या वाजवतात, कमावलेल्या विशिष्ट आवाजात जोरजोरात बोलतात, पैसे मिळाल्यावर आशीर्वाद देतात; ते सर्व वर्तनसुद्धा हिजडेपण दाखवण्यासाठी / फायद्यासाठी मुद्दाम केलेले सादरीकरण असते. खाजगीत ते अर्थातच तसे वागत नाहीत. समाजासमोर समाजमान्य हिजडा असण्याचा लिंगभाव व्यक्त केला नाही, तर त्यांना हिजडा म्हणून मान्यता आणि पैसे मिळणार नाहीत आणि तसेही समाज त्यांना स्त्री-पुरुषांच्या प्रमाणे सन्मानाने वागवत नाही ना त्यांना सर्वत्र पैसे कमावण्याच्या समान संधी दिल्या जातात. तसेच जी स्त्रीदेह असणारी व्यक्ती बाईपणाचे सामाजिक संकेत पाळत नाही, तिला अस्सल बाई मानले जात नाही आणि बाईपणाचे सांस्कृतिक फायदेतोटे तिच्या वाट्यास येत नाहीत. पुरुष असण्याचेही तसेच फायदेतोटे असतात जे समाजमान्य प्रकारे पुरुषी न वागणाऱ्या नराला मिळत नाहीत . लिंगभावाप्रमाणे लैंगिकतेच्या सामाजिक आविष्कारातसुद्धा कृत्रिमता व नियमन असते. पितृसत्ताक पुरुषप्रधान सामाजिक रचनेच्या हितासाठी जास्तीत जास्त विषमलिंगी स्त्री-पुरुष जोडपी असणे आवश्यक असते व त्यांची लैंगिक अभिव्यक्ती समाजमान्य असणे गरजेचे ठरते. जननक्षम पतीपत्नीनेच एकनिष्ठ राहून, आपल्याच जातीत विवाह करून, योनीसंभोगच करून आपली लैंगिकता व्यक्त करणे अशा समाजाला अभिप्रेत असते. यासाठी मानवी नर-मादीला स्त्रीत्व-पुरुषत्वाचे नियम पाळत वरील प्रकारे लैंगिक संबंध सादर करून-वठवून दाखवावे लागतात. समलैंगिक गे-लेस्बियन जोडप्यांत खूपदा बायकी-पुरुषी जोडीदार असतात. अशी जोडपी विषमलिंगी संबंधांची नक्कल करतात ,असे मानले जाते. पण, बायकी लेस्बियन स्त्रीने पुरुष उपलब्ध नसताना पर्याय म्हणून पुरुषी वागणारी स्त्री जोडीदारीण स्वीकारला नसते; तर तिला स्त्रीदेहातच पुरुषी लिंगभाव असणारी जोडीदारीण हवी असते. तसेच समलैंगिक पुरुषाला दुसऱ्या नरातच, वैयक्तिक आवडीप्रमाणे पुरुषीपणा / बायकीपणा हवा असतो. तसेच लिंगभावाचे सामाजिक नियम संपूर्णपणे झुगारून देणारी व्यक्ती, तृतीयपंथी व्यक्ती, दोन्ही लिंगभाव एकाच देहात बाळगणारी व्यक्ती, स्थळ काळ-संदर्भांनुसार लिंगभाव बदलणारी व्यक्ती; जोडीदार म्हणून कोणालाही हवी असू शकते. प्रत्येक जोडप्याचे लैंगिकतेच्या अभिव्यक्तीचे मार्ग स्वतंत्र वैयक्तिक आवडीनुसार प्रगट होऊ शकतात, त्यामुळे लैंगिकतासुद्धा सम-विषम इतक्याच सामाजिक द्वैतात न अडकता, शतरुपांनी आविष्कृत होऊ शकते. ठळक बटबटीत सामाजिक नियमांच्याप्रमाणे लिंगभाव व लैंगिकता यांची काही प्रकारात वर्गवारी करता येते, पण प्रत्येकाचे वैयक्तिक खाजगी लैंगिक कल, त्या प्रकट करण्याच्या पद्धती आणि जोडीदारातील आवडी लक्षात घेत गेल्यास, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती- तितक्या लैंगिकता होऊ शकतात. कारण शेवटी लिंगभाव आणि लैंगिकता दोन्ही ना नैसर्गिक असतात ना आवश्यक!हे संबंध प्रजोत्पत्ती करत नसल्याने अनैसर्गिक व त्यामुळे अनैतिक आहेत, असा आरोप केला जातो. प्रामाणिक विचार करून पाहिल्यास लक्षात यावे की, सामान्य माणसे ठेवतात ते सर्वच लैंगिक संबंध प्रजोत्पादनासाठी नसतात. मुद्दाम गर्भनिरोधक वापरून बहुसंख्य नागरिक केवळ शरीरसुखासाठी लैंगिक संबंध ठेवतात; मग ते नैतिक कसे काय? लोकसंख्या घटण्याचा काहीच धोका नसतानादेखील माणसाच्या जगण्याचा प्राथमिक हेतू हा मुले पैदा करणे इतकाच असतो का? त्याव्यतिरिक्त अनेक प्रकारे थोर कर्तृत्व दाखवूनही जगण्याचे श्रेय मिळवता येते. आपल्याला जे व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे असते, ते आपण कृत्रिम असले ,तरीही योग्य म्हणून स्वीकारतो. उदा.कपडे घालणे, लग्न करणे, गर्भनिरोधक वापरणे इ. आणि जे आपल्याला खटकते-गैरसोयीचे वाटते, ते अनैसर्गिक म्हणून बाद करतो. हा दांभिकपणा आहे. बलात्कार ही गोष्ट निसर्गाच्या दृष्टीने नैसर्गिक संभोग-क्रिया आहे, म्हणून बलात्कारानेसुद्धा अपत्य जन्माला येतेच. पण, हा मानवी स्वातंत्र्यावर घाला आहे, या संवेदनशील जाणीवेतून बलात्कार गुन्हा ठरतो. समलैंगिक प्रवृत्ती कोणीही मुद्दाम जोपासत नाहीत, ती निसर्गतः असते आणि निसर्गात आढळते ते सर्व नैसर्गिक असते: पण केवळ नैसर्गिक प्रक्रीयेपेक्षा माणसाचे स्वातंत्र्य- संवेदनशीलता जास्त महत्त्वाची आहे.अल्पसंख्यांक समलैंगिक व्यक्तींची त्यांच्या ‘लैंगिक’ वेगळेपणामुळे अप्रतिष्ठा करणे व त्यांना सामाजिक उतरंडीत खालचे स्थान दाखवून स्वत:चे वरिष्ठ स्थान अबाधित ठेवणे हे प्रस्थापित पुरुषसत्तेला हितावह वाटते. याच प्रकारचे राजकारण स्त्रिया, दलित, आदिवासी, दारिद्र्यरेषेखालील गट, इतर वंचित-शोषित यांच्या विरोधात केले जात असे; अजूनही केले जाते. त्यांच्याबाबत असलेल्या लढ्यांना पाठींबा द्यावा की नाही हे ठरवणे सामान्यांना सोपे आहे. पण, कामवासना व लैंगिकता यांबाबत आपला समाज अजूनही मानसिकदृष्ट्या पौगंडावस्थेच्या पलीकडे गेलेला नसल्याने, समलैंगिक व्यक्तींच्या समानतेने जगण्याचे महत्त्व व त्याबाबतच्या लढ्याची गरज आपल्या समाजाच्या लक्षात येत नाही. म्हणून इतर महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांबरोबर हा ‘गौण’ मुद्दा का चर्चेत आणावा हे समजत नाही. लैंगिक समानता जास्तीत जास्त व्यक्तींना समलिंगी संबंध ठेवून मजा करण्यासाठी नाही, तर मुळातच समलैंगिक संबंध ठेवणे ही ज्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्यांना या कारणामुळे गुन्हेगार ठरवले जाऊ नये व त्यांच्यावर अन्याय होऊ नये, म्हणून आवश्यक आहे. ‘गुन्हेगार’ नसलेल्या व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी कोणाचीही मान्यता गरजेची असते का, खरे तर? समाज नावाची कोणी अतिमानवी देहाची, सर्वसामर्थ्यवान, सर्वज्ञ व्यक्ती नसते. सुदृढ समाज हा समानतेच्या, स्वातंत्र्याच्या व न्यायाच्या पायावर उभारलेल्या घटक व्यक्तींचाच असतो आणि समलैंगिक या घटकांपैकीच एक आहेत. पण ,आपल्या समाजमनात लैंगिक असमानता इतकी खोल रुजली आहे की; लौकिकार्थाने पुरुषी असलेले कर्तृत्व करून दाखवणाऱ्या नारीचा ‘मर्दानी’ झांशीवाली म्हणून सत्कार होतो आणि लौकिकार्थाने बायकी मानल्या गेलेल्या आवडी असणाऱ्या नराला षंढ-बायल्या म्हणून हिणवले जाते. एवढे आपण कोत्या मनाचे आहोत. पुरुषीपणाचा अंतिम निकष हा अपत्य होणे असा असल्याने विनापत्य जोडप्याला सामाजिक पातळीवर खालचे स्थान असते, इतके आपले जगण्याचे निकष तकलादू आहेत. रोजचे आयुष्य जगताना सहजपणे स्त्रीपणाबद्दल कमीपणा व पुरुषीपणाबद्दल वरचढपणा आपण हद्दपार करू शकलो, तरच लैंगिक समानता येणार आहे. सर्व माणसे सम नाहीत, विषमता आहेच; पण तरीही सर्व समान आहेत– असमान नाहीत, ही जाणीव वर्तनात रुजणे महत्त्वाचे. असे झाले तर कोणाचे कोणावर प्रेम आहे, याला काहीच अर्थ उरणार नाही, कारण स्त्री व पुरुष हा भेद केवळ प्रजननसंस्थेपुरताच उरेल. समलैंगिक संबंध म्हणजे केवळ दोन पुरुष / दोन स्त्रिया / तृतीयपंथी यांच्या लैंगिक अवयवांचे तात्पुरते-छुपे संबंध नाहीत. इतर सर्व मानवी संबंधांच्याप्रमाणे दोन सज्ञान समलैंगिक व्यक्तींच्यामध्ये समतीने प्रेमाचे, भावनांचे व्यवहार होतात, एकमेकांच्या मानसिक आधाराची, आर्थिक पाठबळाची, रोजच्या जगण्यातील जोडपे म्हणून घडामोडींची, बौद्धिक-वैचारिक आकलनांची इ. त्या संबंधानाही तेवढीच गरज असते. समाजाने- नातलगांनी पाठींबा दिल्यास समलैंगिक नातीसुद्धा दृढ-आजीवन होऊ शकतात. उलट ,आपल्या लैंगिक-भावनिक कला नुसार खरे आयुष्य जगल्यास, खोटेपणाची घुसमट थांबून सुख मिळण्याची जास्त शाश्वती असते. पुरुषीपणाचे/स्त्रीत्वाचे लादलेले जुनाट नियम मोडून जी माणसे मुक्तपणे जबाबदार, कृतिशील,संवेदनशील नागरिक म्हणून प्रतिष्ठेने जगू शकतील, तीच सुदृढ व प्रगत समाज निर्माण करतील. सर्वाना समान हक्क असलेला समाजच योग्य वैचारिक प्रगती, भौतिक विकास आणि मानसिक आरोग्य साधू शकेल. अजूनही ज्या व्यक्ती इतरांचे लैंगिक-भावनिक स्वातंत्र्य मान्य करू शकत नाहीत, त्या बुरसटलेल्या पितृसत्ताक मागास संकल्पनांना कवटाळून बसत आहेत. हा वर्ग समानतेच्या तत्त्वाशिवाय कोणत्या मानसिक व वैचारिक प्रवासाला-घडामोडींना कसा सामोरा जाणार? भारतीय विवाहसंस्थेचे स्वरूप मागील शतकात खूप बदलत आले आहे. तरीही अजून आंतरजातीय विवाहसुद्धा आपल्याला सहज मान्य होत नाहीत. समलैंगिक व्यक्तींना त्यांचे विवाह वगैरे पुढील हक्क न दिल्यास, या व्यक्तींचे विवाह नकळतपणे आपल्याशी / आपल्या आप्तांशी झालेले चालणार आहेत का? आपण पारंपरिक कुटुंबपद्धतीच्या चौकटी मोडून नवीन रचना स्वीकारण्याचा लवचीकपणा दाखवत नाही. लवचीक नसलेली कोणतीही गोष्ट शेवटी ताणाने मोडून पडते. दोन बाप वा दोन आया आणि दत्तक मुले अशीही कुटुंबरचना यशस्वी होणे शक्य आहे, पण समाजाचा पाठींबा यास आवश्यक आहे आणि पाठींबा/ मान्यता द्यायची म्हणजे नक्की काय असे उचलून द्यायचे असते? आपल्याला त्याबद्दल विचित्रपणा/ किळस/घृणा इ काहीही वाटले, तरीही त्या वाटण्याचा बाऊ न करता संवेदनशीलता बाळगून समोरच्याला समानतेने-सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत हक्क आहे, हे सत्य स्वीकारणे हेच गृहीत आहे फक्त. ही मान्यता दिली नाही तरीही समलैंगिकता स्वयंभू अस्तित्वात असतेच आणि आता तर कायदेशीररित्या या व्यक्ती आनंदाने जगूही शकतात, फक्त प्रतिष्ठेमुळे त्यांचा जगण्याचा लढा सोपा होईल. दुर्दैवाने लज्जास्पद अशी सांगण्याची बाब ही की ती उतरंड पाळत मीसुद्धा हिजड्यांना कमी लेखत असे व त्यांच्याशी माझी कुचेष्टेत तुलना झाल्यास अपमान मानत होतो. संवेदनशीलतेमुळे भावनिक पातळीवर हिजड्यांना तुच्छ लेखू नये हे मला कळालं नाही, नंतर प्रौढपणात वैचारिक भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा समानतेच्या तत्त्वासाठी हिजडे व वेश्या यांनाही ती गरज असल्याचे जाणवले. किंबहुना पितृसत्ताक समाजात “पतिव्रता विवाहित मातेपेक्षा” हिजडे व वेश्या कदाचित जास्त समर्थ व सक्षम असतात हे जाणवले. खेदाने सांगावे लागते की, जवळजवळ आजपर्यंत स्वतःपेक्षा दुबळ्या व लाचार व्यक्तींची सहज येताजाता खिल्लीही अजाणतेपणी उडवली आहे. आपण एकटे क्वचितच गमतीत ती चेष्टा करत असतो आपली थोर विनोदबुद्धी दाखवण्यासाठी, पण ती व्यक्ती तशी चेष्टा रोजच एकेकाकडून सहन करत असते व पुर्वानुभवांच्या भितीने ती तिच्या जिव्हारी लागत असते. जोपर्यंत स्ट्रेट मर्द पुरुष स्वतःहून संवेदनशीलता दाखवत नाही, तोपर्यंत हे दुय्यम घटकही खालच्यांना ती दाखवू शकत नाहीत. म्हणून लैंगिक असो किंवा जातीय उतरंड , ती मोडण्याची पहिली व मोठी जबाबदारी सर्वात वर असलेल्या गटाचीच, कारण ती उतरंड विनासायास मोडण्याची शक्यता व संधी फक्त त्यांच्याकडेच असते. दुय्यम अधिकार व स्थान असलेले गट फक्त नक्कल करू शकतात सुरुवातीला. उतरंड मोडून समानता आणली तरी त्रास होणार नाहीत व समान संधी मिळतील, याची खात्री व ग्वाही उतरंडीत सर्वोच्च स्थानी असलेलेच गट प्रथम इतरांना देऊ शकतात. मगच मधल्या जातीही खालच्या जातींना ती कालांतराने समानता दाखवतील. समलैंगिक पुरुष हिजड्यांशी भेदभाव करणार नाहीत.संख्याबळावर असलेल्या वरचढ भावनेने अजूनही विषमलैंगिक समाज हा पीडित समलैंगिक गटाला समानतेचा मूलभूत हक्क ‘’देतो’’ आहे, यातच आपल्या सामाजिक संरचनेचा पराजय आहे, खरे तर. मुळात ही मान्यता देण्याचा वा नाकारण्याचा अधिकार ठरावीक बहुसंख्य समाजाला आहेच का? समानतेचा संवैधानिक व मानवी हक्क प्रत्येकाला असतोच, तो बजावण्याचा बाकी राहतो फक्त बऱ्याचदा. मी स्वतः समलैंगिक असल्याने विविध प्रकारच्या व्यक्तींकडून पौगंडावस्थेत भेदभाव, तिरस्कार, हिंसा किंवा क्रौर्य अनुभवले आहे. त्या त्रास देण्यात अर्थातच स्ट्रेट गर्विष्ठ ‘खरे मर्द’ वगैरे आघाडीवर असले, तरी ज्या स्वतः लैंगिक भेदभाव अनुभवतात अशा स्त्रियाही कमी नव्हत्या. इतकंच काय, मी बायकी मानलेले हावभाव किंवा आवडीनिवडी असल्याने जे पुरुषी दिसणारे समलैंगिक मर्द होते त्यांनीही या उतरंडीत कुचेष्टा- घृणा वगैरे दाखवत हात धुवून घेतलेच. ज्या स्ट्रेट मित्रांना माझ्याबद्दल सहानुभूती होती त्यांनीही या छळणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात फारशी खणखणीत भूमिका घेतली नाही त्या काळात. तशी भूमिका घेत माझी बाजू त्यांनी मैत्रीपोटी जरी उचलून धरली असती, तर त्यांचीही कुचेष्टा या पुरुषप्रधान मानसिकतेच्या मग्रूर पुरुषांकडून झाली असती. व समानतेच्या तत्त्वापोटी माझी बाजू घेण्याइतपत या संवेदनशील मित्रांचा मानसिक प्रवास अजून तेव्हा प्रगल्भ झाला नव्हता. पुरुषीपणाला महत्त्व व उच्चस्थान देण्याच्या उतरंडीत खालच्यांना कमी लेखत आपलं मर्यादित स्थान व महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी वरच्या “खऱ्या मर्दांना” महत्त्व देणं व त्यांची नक्कल करणं या इतर “दुय्यम घटकांना” भागच होतं. पुरुषी उन्मत्त मर्द संवेदनशील पुरुषाला कमी लेखतोच व स्त्रीया, पुरुषी समलैंगिक, बायकी पुरुष व हिजडे अशी उत्तरोत्तर खाली जाणारी संरचना कळत नकळतपणे तयारही करतो. ती शतकानुशतके रूढींनी दृढ केली असलेली संरचना मोडणं मधल्या व खालच्या घटकांना शक्यच नसतं, ती मोडायची तर सर्वात वर असलेल्या, अधिकार बाळगणाऱ्यांनीच.
– अनिकेत गुळवणी लिंगभाव व लैंगिकता अभ्यासक
लेख वाचून अनिकेतच्या जाण्याचे दुःख पुन्हा तीव्रतेने जाणवले. त्याची वैचारिक स्पष्टता, भाषेवरील पकड यामुळे लेख उत्तम झाला आहे.