मुंबई : कुर्ला येथील जागृती नगर, एस.के.पी. शाळेजवळील मैदानास अखेर अधिकृतपणे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान’ असे नाव देण्यात आले आहे. या नामकरणाची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करत होते, आणि आता महानगरपालिकेने मैदानावर नामफलक उभारून ही मागणी पूर्ण केली आहे.
या नामकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. स्थानिकांनी हा विजय त्यांच्या संघर्षामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे.
या ऐतिहासिक निर्णयामागे वंचित बहुजन आघाडीचे लढवय्ये कार्यकर्ते स्वप्नील जवळगेकर यांचा मोठा वाटा आहे. जवळगेकर यांनी या मैदानाच्या नावासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यामध्ये त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार करणे, स्थानिक नागरिकांसह स्वाक्षरी मोहीम करणे, तसेच महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागातील अधिकाऱ्यांशी थेट चर्चा अशा विविध माध्यमांतून त्यांनी हा विषय अधोरेखित केला. त्यांनी केलेल्या सतत प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे.
Mumbai Sewage Problem : काळाचौकीत सांडपाण्याचा कहर; आलिशान इमारतींचा त्रास चाळकऱ्यांना
वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले की, हा लढा केवळ नामकरणापुरता न राहता, नागरिकांचे हक्क, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकास यासाठी आघाडीचा संघर्ष सतत सुरू राहणार आहे. यावेळी स्वप्नील जवळगेकर म्हणाले, हा विजय लोकशक्तीचा आहे आणि संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव कधीच होऊ शकत नाही.
स्वप्नील जवळगेकर यांनी फक्त नामकरणावरच समाधान मानले नसून, मैदानातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी सांगितले की, मैदानावर प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि खेळासाठी लागणाऱ्या साधनांची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही प्रशासनाशी सातत्यानं संवाद साधत आहोत आणि लवकरच या सुविधा पुरवण्यासाठी काम सुरू होईल.
कुर्ला येथील मैदानास “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान” हे नाव मिळाले असून, वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे यश मिळाले आहे. आता मैदानाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.