कोल्हापूर : कोल्हापूर येथे ऐतिहासिक किल्ले विशालगड येथे १३ महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार रवी पडवळ याला अखेर अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या शाहुवाडी पथकाने मंगळवारी मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील हडपसर येथून त्याला ताब्यात घेतले.
गेल्या वर्षी १३ आणि १४ जुलै रोजी विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान हा हिंसाचार झाला होता. काही समाजकंटकांनी गड पायथ्याशी असलेल्या मुसलमानवाडी येथील रहिवाशांच्या घरांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात घरांची मोडतोड, जाळपोळ, वाहनांचे नुकसान आणि धार्मिक स्थळांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.
या घटनेनंतर, पोलिसांनी रवी पडवळसह सुमारे ४५० तरुणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते, तर १४ जणांना जामीनही मिळाला होता. मात्र, मुख्य सूत्रधार समजला जाणारा रवी पडवळ तेव्हापासून फरार होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फरार असूनही रवी पडवळ सोशल मीडियावर सक्रिय होता. तो नियमितपणे ऑनलाइन येऊन विविध विषयांवर आपले विचार मांडत होता आणि गोशाळेत काम करत असल्याची माहितीही देत होता. तरीही, गेल्या १३ महिन्यांपासून तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर, हडपसर येथे त्याच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.