मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीये, सिनेमा ‘दर्जेदार’ असून चालत नाहीयेत, मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीये इ.इ. ही नेहमीची ओरड आहे. यात पुन्हा एकदा भर पडली ती मराठी सिनेमा अभिनेता प्रसाद ओक यांची. ओक काका म्हणताय की, मराठी चित्रपटांना देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात येतं. परंतु देखील मराठी प्रेक्षक आपल्या चित्रपटांकडे पाठ फिरवतात. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागतेय अशी वेळ येईल असा विचारही केला नव्हता असं दु:ख त्यांनी व्यक्त केलं.
पण, प्रेक्षकांवर जबाबदारी ढकलून हे अभिनेते मोकळे होतात. मराठी सिनेमांना क्वालिटी आहे का? हा प्रश्न सतत पडतो. म्हणजे ठाणे, मुंबई, कोथरूड, डोंबिवली यापलीकडे ओक काकांचा मराठी सिनेमा का जात नाही?
का इथल्या कल्चरवर, लोकांच्या प्रश्नांवर प्रसाद ओक आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकांना सिनेमा तयार करावासा वाटतं नाही? सिरीयलमध्ये सावळ्या रंगाची अभिनेत्री भेटत (?) नाही, म्हणून गोऱ्या रंगांच्या अभिनेत्रीला काळ करून स्क्रीनवर दाखवणाऱ्या लोकांना प्रेक्षकांना जाब विचारायचा अधिकार आहे का??
दिड जीबी डेटाने पिढी बरबाद केली..असं सर्रास वापरलं जाणारे वाक्य आपण ठोकून देतो. पण, अतिग्रामीण भागात हा ‘दीड जीबी डेटा’ काय प्रभाव पाडत असेल ? हा विचार मनात येऊन गेला. त्याला कारण असं की, अमळनेर तालुक्यातील एक छोट्या खेड्यात राहणाऱ्या मुलाने व्हाट्सअप्पवर गाण्याची एक लिंक पाठवली. ती मी उघडून बघितल तर अहिराणी गाणं होते. त्या गाण्याला लाखो views होते. या पोराकडे कुठलीही साधन नाहीत. त्याने फक्त ऑडिओ रेकॉर्ड केलेला ट्रॅक एक इमेज वापरून युट्युबवर अपलोड केलं होतं.
ह्या अहिराणी गाण्यांनी एक मोठं मार्केट उभं केलंय. फार तुटपुंज्या साधनांमध्ये ही पोरं काहीतरी उभारताय. त्याचा एवढा फरक पडला की, मेन स्ट्रीममधील मराठी संगीत चॅनेल्सला त्याची दखल घ्यावी लागली.
अनेक अहिराणी गाणी आजघडीला संगीत मराठी, 9 एक्स झकास मराठीवर दाखवली जातात. ते त्याला मिळणाऱ्या TRP वरून.
काही अहिराणी गाणे आहेत, ज्याला जगभरातून views आले आहेत. गेल्यावर्षी रिलीज झालेलं प्रेम गीत जे एका शेतात शूट केले होते ते, ‘सावन महिना मा’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. त्या गाण्याने इतिहास रचला होता. युट्युबवरील काही निवडक गाण्यांची नाव देतो.
- सावन महिना मा – 8 करोड, 4 लाख views
- बबल्या इकस केसावर फुगे – 21 करोड views
- बबल्या इकस केसावर फुगे (लहान मुलांसाठी ऍनिमेटेड गाणं) 10 मिलियन
- मनी पैसावाली ताई – 3.8 करोड
- गोट्या न लगीन – 2.7 करोड
- भुली गयी मना प्यारला – 2 करोड
- खान्देशी जत्रा – 2.4 करोड
- मन लगीन करा – 2.4 करोड
- भाऊ मना सम्राट – 6.1 मिलियन
- माडी मन लगन द्या करी – 2.5 करोड
ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी
मृण्मयी देशपांडेचा ‘मन फकिरा’ सिनेमा आला होता. त्याच्या प्रमोशनसाठी अख्खी सिनेमाची टीम सिग्नलवर उभे राहून सिनेमा बघा नाहीतर तुमचं नुकसान होईल…असे पोस्टर घेऊन उभे होते. आता यात अनेकांना “प्रमोशन फंडा” वाटू शकतो. पण, तसं नाहीये. ह्या थिमचे अनेक सिनेमे येऊन गेले. तीच घिसीपीटी स्टोरी कोथरूड, मुंबई, डोंबिवली, सदाशिव पेठच्या पुढे जात नाही. त्यामुळे थिएटर्स जरी मिळाले, तरी प्रेक्षक कुठे आहेत ? हा मोठा प्रश्न आहे.
‘मन फकिरा’ ह्या सिनेमाचे संगीत झी म्युझिकने केलं आहे. त्यातील सर्व गाण्यांची, सिनेमाच्या ट्रेलरची हिट्स एकत्र केल्यावर जेवढे होतात, तेवढे हिट्स एकट्या अहिराणी गाण्याचे आहेत.
लोकांना काय पाहिजे ? ही नस माहीत नसलेले लोकांवर त्यांची तीच कॅसेट लादतात. त्यामुळे सैराट, फँड्री, ख्वाडा, मोहरक्या, बबन एकचदा बनतो. मराठी सिनेमाला प्रक्षेक नाहीये, किंवा थिएटर्स मिळत नाही हे काही अंशी खरं जरी असलं तरी कंटेंट दर्जेदार ठरत नाही. ती कमी ही छोटं मार्केट भरून काढत आहेत.
उदा. आमच्या मालेगावात ‘मॉलिवूड’ नावाची आमची स्वतंत्र इंडस्ट्री आहे. कमी बजेटमध्ये एखादा सिनेमा बनवणे, कॉमेडी शो बनवणे असं एकंदरीत चित्र असतं. यात टॅलेंट इतकं आहे की, एकच व्यक्ती अनेक कामे करतो जस की, सिनेमाचा हिरो हाच डायरेक्टर, सिनेमा एडिटिंग करतो, म्युझिक पण तोच देतो…अशी अनेक काम ही लोक करत असतात.
आणि याला बघणारा मोठा समूह, कामगार वर्ग आहे. त्यामुळे हे सिनेमा चालतात. ह्या मालेगावच्या मॉलिवूडचा प्रभाव इतका ठरला की, तेच कलाकार, डायरेक्ट लोकांना घेऊन सोनी नेटवर्कने “सोनी सब” वर प्राईम टाईमला एक सायलेंट कॉमेडी शो ‘मालेगाव का चिंटू’ हा सुरू केला होता. ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
ह्या खान्देशातील ऑनलाईन मार्केटमध्ये अनेक जाती-धर्माच्या मुला-मुलींना संधी मिळाली आहे की, ते आज स्टार आहेत. जसे tiktok स्टार पोरांचा गावाकडे मेळावा भरतो, तसे ह्या युट्युबवरील स्टार मुलांचे मेळावासुद्धा होतात.
धुळ्यातील मोराडी गावच्या पंकज कोळी ह्या भिल्ल जातीच्या एका पोराने संगीत दिलेलं ”भुली गयी मना प्यारला” हे गाणं, त्याचे शब्द इतके धारदार आहेत की, मला ऐकतांना अस वाटत की, ह्या ताकदीचे प्रेमभंग – विरह सहन न होणारे गाणं आजतागायत झालं नाहीये. ज्याला भाषा कळत नाही असाही व्यक्ती या गाण्याशी स्वतःला रिलेट करतो. ही त्या गाण्याची ताकद आहे. नंतर त्या पोरांनी पैसे गोळा करून ते गाणं शूट करून अपलोड केले. त्याला आता 12 मिलियन views आहेत.
हा जो सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे, तो ही पोर मोडून पुढे जात आहेत. हा फक्त कलेचा संघर्ष नाहीये. हा मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे. जिथं माणसांना कला असूनही वजा केलं जात. तिथं तीच माणस ‘इंटरनेट’च्या साहऱ्याने पुढे निघून गेली आहेत.
भाषेच्या श्रेष्ठत्वावादाने इथल्या लोक कलेला मृत अवस्थेत ढकललं होतं. भाषिक अस्मिता धार्मिक अस्मितेशी जोडली की, त्याचा राजकीय वापर करून आपला स्वार्थ साधला जातो. असो.
ह्या सांस्कृतिक संघर्षाला ह्या पोरांनी आपल्या कलेच्या, कंटेंटच्या जोरावर कधीच सुरुंग लावला आहे. त्यामुळे त्यांना सिग्नलवर येऊन आमची कला बघा ! अशी आर्जव करण्याची गरज पडणार नाही. हे तितकंच खरं आहे.
-जितरत्न उषा मुकुंद पटाईत