– शांताराम पंदेरे
मध्यवर्ती कार्यकारिणी, युक्रांद, महाराष्ट्र
मागून पुढे…
उंबरे गावचा संप व खालापूरची चळवळ
सुधागडला लागून असलेल्या खालापूर परिसरातील उंबरे गावात १९८६ च्या जुलै मध्ये शेतमजूरीत वाढ व्हावी म्हणून उत्सूर्त संपाचा उठाव झाला. संपकाळात इतरत्र मजूरी करून शेतक-यांकडून आगावू घेतलेले पैसे संपक-यांनी परत केले. या संपाच्या पार्श्वभूमिवर पुढच्या लढ्याची दिशा नक्की करण्यासाठी सप्टें.८६ मध्ये उंबरे गावात परिषद घेण्यात आली. याच काळात गागोदे (ता.पेण) कोळसा भट्टी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. सुधागड-पाली-खालापूर येथील आदिवासी संघर्ष समितीच्या च्या निशाणाखाली या परिषदेत सामिल झाला. महाराष्ट्र कष्टकरी आंदोलन समितीच्या वतिने २८ नोव्हेंबर १९८६ महात्मा फुले स्मृतीदिनी सुधागड-पाली तहसीलवर मोठ्या संख्येने मोर्चा व सत्त्याग्रह करण्यात आला. शेकडो शेतकरी-शेतमजूरांनी स्वत:ला अटक करून घेतली. जमिनी नावावर करणे; गावठाणावरून आदिवासींना हुसकावून न लावणे; स्थलांतरीत मजूरांची नोंद करणे; रोहयो ची कामे काढणे; इ. मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या.
संघटित शक्तीचा हा प्रत्यय आल्यानंतर खालापूर तालुक्यात चळवळीला तोंड फुटले. गावोगाव सभा होवू लागल्या. खालापूर हे गाव मुंबईपासून ७६ कि.मी.अंतरावर तर पनवेलपासून २५ कि.मी.अंतरावर आहे. एकूण ९८ हजार लोकसंख्येपैकी ३२ हजार लोक खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत रहातात. खालापूरला विभागून टाटाच्या वीज केंद्रातील पाणी वाहून पाताळगंगा नदी बारमाही वहात आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर आहे. १५ ते २० कि.मी.वरून मुंबई-गोवा महामार्ग तर कर्जत-खोपोली रेल्वे जवळच आहे. परिणामी पाताळगंगा काठावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक कारखाने निघाले आहेत. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. पाण्याला घाण वास येत असून पाण्याचा रंग बदलला आहे. काठावरील जमिनीचा कस कमी झाला आहे. काही ठिकाणची पिकं तर प्रदूषित हवा, ॲसिड व घातक रसायनांमुळे करपून जात आहेत.
महामार्ग व नदी जवळच्या जमिनीचा एकरी भाव ७ ते १० हजार रुपयांवरून ६० हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत गेला आहे. याच परिसरात सिनेनट, राजकीय पुढारी, कारखानदार व बडे व्यापारी यांनी मोठमोठ्या बागा व बंगले उभारले आहेत. बहुतक वाड्या या खाजगी जमिनीवर वसलेल्या आहेत. परिणामी गुंडांच्या टोळ्या उभ्या राहिल्या आहेत. हे गुंड व दहशतीच्या जोरावर आदिवासी, दलितांच्या या वस्त्या उठवून लावल्या जात आहेत. त्यांच्या जमिनी विकत घेता येत नाहीत म्हणून काही ठिकाणी त्यांचे सर्व्हे नंबर्स बदलण्यात आले आहेत. संरक्षित कूळ घोषित करूनही हप्ते न भरल्याने आदिवासी-दलितांच्या जमिनी मालक काढून घेऊन विकत आहेत. गुरचरण (गायरान), जंगल व दळी जमिनीची कागदपत्रे शासकीय यंत्रणेने जप्त करून त्यांना या जमिनीवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कारखानदारी उभारताना या भागातील दलित-आदिवासी व मराठवाडा, कर्नाटकातून आलेला लमाण (बंजारा), कैकाडी, वडार व बेलदार हा भटका-विमुक्त समाज जनावराप्रमाणे राबतो. परंतु कारखाना सुरू झाल्यावर त्याच्याकडे कसब नाही; म्हणून नोकरी नाकारण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांची संख्या कमी आहे. मात्र मराठा व इतर सवर्ण शेतकरी युवक मुंबई-पनवेलमध्ये नोकरी करत आहे. त्यांच्या जमिनी पडिक पडत आहेत. त्या दरसाली २०० ते ४०० रु. भाडेपट्ट्याने आदिवासी-दलित कसत आहेत. पाताळगंगेचे पाणी उचलून उन्हाळी भातशेती व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर केला जातो. ही भाजी पुणे-मुंबईचे व्यापारी खरेदी करतात. बांधकाम व्यवसाय जोरात असल्याने वीट-भट्टी व खडीचा व्यवसाय मोठ्याप्रमाणावर चालू आहे. पूर्वी कोळसा व्यापारी व कारखानदारांनी या भागातील जंगल उध्वस्त केले आहे. परिणामी उरलेले डोंगर व माती धुवून नेली जात आहे. यातून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.
सुधागड-पालीच्या तुलनेत खालापूर
तालुक्याची काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
आदिवासी, दलित स्थिरावत आहे. कारखानदारीच्या परिसरात शेतमजूरांचा तुटवडा कमी असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. औद्योगिक कामगार संघटनांमुळे संघटित शक्तीची येथील आदिवासी, दलितांना झालेली आहे. खडी व्यापारी-बागायतदार-कंत्राटदार व कारखानदार यांनी गुंडांच्या व दलालांच्या टोळ्या पोसल्या आहेत. शासकीय यंत्रणा पुर्णत: आज त्यांच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमिवर जाने. ८७ पासून सुमारे ८०-९० गावांशी संबंधित अशा ८-९ गावांत जाहिर सभा घेण्यात आल्या. आदिवासी-दलित जाती-जमातींमधील युवक व स्त्रिया मोठ्या संख्येने कार्यकर्ते म्हणून कामाला लागले आहेत. त्याच बरोबर मराठा, आगरी आणि इतर जाती-जमातींमधील तरुण पुढे येत आहेत. तसतशी पोटाच्या प्रश्नाबरोबरच पोलिस व गुंडांची प्रकरणे समजू लागली. माणसं निर्भय होवू लागली. भोगलेले दु:ख बोलू लागली.
पोलिस व धनाजी शेठची बेछूट गुंडगिरी
खालापूर पोलिस ठाण्याने या परिसरात आदिवासी-दलितांमध्ये कमालीची दहशत निर्माण केली आहे. ट्रक लुटणे, भुरट्या चो-या, दारू, आदी आरोपांवरून सतत संपूर्ण वाडी झोडपून काढली जाते. खोट्या केसेस केल्या जातात. कधीही वस्तीवर धाड घालून सर्व वस्ती धुवून नेली जाते! नवीन कपडे, भांडी, कोंबड्या, बक-या उचलून नेल्या जातात. या मारहाणीतून तरुणांबरोबरच लहान मुले, म्हातारी माणसे गरोदर व बाळंतीण बाया सुटत नाहीत.
टायर, शॉक पध्दत व अपंगत्व’
खालापूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीला (कातकरी, ठाकूर, दलितच फक्त) टायरमध्ये घालून नालाबंदी पध्दतीने अमानुष मारहाण केली जाते. रक्त न येता झालेली ही मारहाण व त्यात वीजेचे शॉक्स दिले जातात. या भागातील बरीच तरुण मुले याची शिकार आहेत. त्यातून अपंगत्व आल्याची उदाहरणे सापडतात. खालापूरची आदिवासी स्त्री गोदाबाई दाजी हिचा एकुलता एक मुलगा सुदाम याला या पध्दतीने मारहाण झाल्याने वेडा झाला व मागील दोन महिन्यापासून तो बेपत्ता आहे. गणेश लहान्या पवारला या पध्दतीने मारहाण झाली व त्यासोबत त्याची आई व बहिणीस मारहाण झाली.
टेंभरी प्रकरण व धनाजी शेठ
धनाजी शेठ भोईर हा कुंडेवहाळ (ता. पनवेल) गावचा रहाणारा असून त्याची खडी सेंटर्स व दारूचे गुत्ते आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर बागा आहेत. सरकारी कंत्राटदारीची कामं त्याला मिळत असतात. त्याच्या मालकीचे ट्रक्स व काही दुकानं आहेत. पनवेल तालुक्यातील काही खून प्रकरणात त्याने सुमारे ११ वर्षे शिक्षा भोगलेली आहे. बिना परवाना बंदुका व हत्त्यारांचा तो सर्रास वापर करत असतो. खडी सेंटर्सवर कर्नाटक व मराठवाड्यातील भटक्या विमुक्त जाती-जमातींमधील व आदिवासी मजूर वेठबिगार म्हणून डांबून ठेवलेले आहे.
ट्रक्समध्ये गुंड भरायचे, शस्त्रे घेऊन वस्ती लुटायची, तेथील बाया भोगायच्या व मोकळी झालेली जमीन कारखानदारांना विकायची हा त्याचा आणि इतर दलालांचा धंदा आहे. अशा अत्याचारीत आदिवासी व दलित बायांची संख्या मोठी आहे. टेंभरी गावच्या कातकरी वाडीत सुमारे ६० कुटूंबं रहातात. गेल्या वर्षी मार्च-एप्रिल १९८६ रोजी या धनाजी शेठने लागोपाठ तीन वेळा ट्रकभर गुंड आणून हल्ला केला. बंदुकाच्या फैरी झाडण्यात आल्या. वाडीवरील स्त्रिपुरूषांसह लहान मुलांना झोडपून काढण्यात आले. एका स्त्रिला सर्वांसमक्ष सर्वांसमक्ष जबदस्तीने उचलून नेऊन चार दिवस स्वत:कडे ठेवली व नंतर पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात चोरीची धादांत खोटी घालून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली. आता तर तिच्यावरच केस चालू आहे.
या हल्ल्यात चार कुत्रे व दोन बक-यांना धनाजीने चाकू व गोळ्यांनी ठार केले. शेकडो कोंबड्या, सर्व बकरे उचलून नेले. वाडीतील सर्व भांडी, खाटा घेऊन गेले. घरे मोडून टाकली. जिवाच्या भितीने आदिवासी डोंगरात पळून गेले. हा हल्ला व लुटालुटीनंतर पाठोपाठ खालापूरच्या पोलीसांनी टेंभरी गावाला परत गराडा घातला व उरली सुरली माणसे झोडपून काढली. वस्ती उध्वस्त केली. त्यामुळे तरुण आदिवासी आजपर्यंत वाडी सोडून आजपर्यंत जंगलात वणवण फिरताहेत.
धनाजी शेठ व त्याच्या गुंडांवर खटला भरण्याऐवजी या वाडीवर राहिलेल्या राघो भिवा (वय ६० वर्षे), गणू किसना (वय ६५), लक्ष्मी जान्या (वय ५०), नथी दामू (वय ३५), आदी ओल्या बाळंतिणी व म्हाता-या ६ बाया आणि ५ पुरूषांना पोलीसांनी अटक केली. केस अजून चालूच आहे.
मात्र धनाजी विरूध्द खालापूर तालुक्यात एकही केस नोंदविलेली नाही. पैशाच्या जोरावर पोलीस व शासकीय यंत्रणेशी अत्यंत चांगले संबंध ठेवण्यात धनाजी यशस्वी झाला आहे. रायगड जिल्ह्यात समुद्र किना-यावर चालणा-या स्मगलींग प्रकरणांची त्याला ब-यापैकी माहिती असल्याचे या भागात बोलले जाते. वेळोवेळी राजकीय पक्षांचा आश्रय घेऊन आपली अमानुष कृत्ये दडपून टाकण्यात त्याला यश आलेले आहे. आदिवासी ठाकर व कातक-यांकडे सतत संशयाने पहाण्याची परंपरा या परिसरात पडलेली आहे. अंगावर नवीन कपडे दिसले की ते चोरीचेच असले पाहिजेत असे मानून ते जप्त केले जातात. जिल्ह्यात कुठेही चोरी-दरोडा पडला की या परिसरातील आदिवासी वाड्यांवर धाडा घालायची प्रथा सर्रास पडलेली आहे. अमानुष व बेछूट गुंडगिरी करणा-या पोलीस व धनाजी शेठ ला आजपर्यंत कुणीच जाब विचारला नव्हता. सर्वात प्रथम आवाज संघर्ष समितीने दिला.
प्रत्यक्ष हल्ल्याची घटना
२ एप्रिल ८७ रोजी खालापूरला संघर्ष समितीच्या मोठी जाहीर सभा झाली. त्यानंतर तहसिलवर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी तहसिलदारांनी १३ एप्रिल रोजी सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेण्याचे जाहीर केले. या सभा व मोर्च्यात हिंमकिपं. चे नेते साथी शरदराव, राज्य सरचिटणीस साथी शंकर साळवी, म्यु.लेबर युनियनचे सरचिटणीस प्रभाकर आडेरकर, युक्रांद महाराष्ट्र कार्यवाह शांताराम पंदेरे, अजित सरदार, निर्मला स्वामी, सहकार्यवाह व संघर्ष समितीचे प्रमुख कार्यकर्ते मधु मोहिते यांनी भाषणे केली होती.
१३ एप्रिल ८७ रोजी ठरल्याप्रमाणे दु.३ वा. खालापूर तहसिलमध्ये बैठक सुरू झाली. सायं. ५.३० वा. बैठक संपली. या बैठकीत संघर्ष समितीने तहसिलदार नाईक सिनी. फौजदार शेख यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर केली. या बैठकीला तालुक्याचे सभापती, भूजल सर्व्हेक्षण यंत्रणा, जंगल खाते, कृषी, रोहयो, आदी विभागिय अधिकारी, तसेच पनवेलचे सर्कल इन्स्पेक्टर मोहन कांबळे, सिनी. फौजदार, तहसिलदार हिं.म.कि.पं.चे शंकर साळवी, मधु मोहिते, प्रभाकर आडेरकर, शांताराम पंदेरे, नत्थु पवार, आदी हजर होते. तहसिल बाहेर हजारो आदिवासी-दलित शेतकरी-शेतमजूर जमा झाले होते. या बैठकीत जवळ जवळ सर्व मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले. (क्रमश:)
(संदर्भ: खालापूरचा खूनी हल्ला व युवक क्रांती दलाची चळवळ, पान क्र. ४ ते ८ प्रकाशक : घोषणा प्रकाशन, मध्यवर्ती कार्यकारिणीकरिता, पुणे-४११००४, देणगी मूल्य..दोन रु. फक्त.)





