मुंबई : मुंबईतील कांदिवली पूर्व भागात मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत सात जण भाजले असून, यात सहा महिलांचा समावेश आहे. भाजलेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ही आग सकाळी सुमारे ९:३० वाजता चाळीच्या पहिल्या मजल्यावरील एका दुकानात लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विजेच्या वायरिंग, गॅस सिलेंडर आणि इतर उपकरणांमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या दुर्घटनेत भाजलेल्या सात जणांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या तीन महिला गंभीर जखमी आहेत. रक्षा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०) आणि पूनम (२८) या ८५ ते ९० टक्क्यांहून अधिक भाजल्या आहेत.
या व्यतिरिक्त, ई.एस.आय.सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शिवानी गांधी (५१), नितू गुप्ता (३१) आणि जानकी गुप्ता (३९) या ७० ते ८० टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यासोबतच मनराम कुमकट (५५) हे पुरुषदेखील ४० टक्के भाजले आहेत.
स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.