कंधार : कंधार येथील नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी पक्षाचे नगरसेवक दिलीप संतराम देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून प्रशासकीय कामकाजावर पक्षाची पकड अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिलीप देशमुख यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नगरपालिका सभागृहात त्यांचा विशेष सत्कार समारंभ पार पडला. यावेळी नवनियुक्त नगराध्यक्ष शहाजी नळगे यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन देशमुख यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला कंधारमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये संजय भोसीकर (तालुकाध्यक्ष, काँग्रेस) मोहसीन बागवान यांच्यासह नगरपालिकेतील विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






