प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला !
अकोला : मनोज जरांगे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेतली पाहिजे.फक्त एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये. असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. अकोला येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गरीब मराठ्यांच्या मधून नवीन नेतृत्व पुढे येत नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने ते पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई येथील मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या आंदोलनात गरीब मराठ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.
गरीब मराठे जेव्हा मोठ्या ताकदीने जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील तेव्हाच श्रीमंत / निजामी मराठा झुकणार आहे. जरांगे पाटील यांना झुलवण्याचे काम चालू आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.गरीब मराठ्यांचा वर्ग उभा करायचा आहे. रस्त्यावरून जागृती होते. पण, कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या 35 वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे परंतु, सत्तेतल्या श्रीमंत मराठ्यांनी त्याला कधीही स्वरूप आणि आकार दिला नाही.जरांगे पाटलांच्या निमित्ताने त्याला स्वरूप आणि आकार ही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे गरीब मराठ्यांच्या रस्त्यावरचा आवाज येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतही त्यांचा प्रतिनिधी गेला पाहिजे. त्याचे हे आंदोलन सुरू असताना त्यांचे सहकारी योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा ही त्यांनी पक्षाच्या वतीने केली आहे.