मुंबई : इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर परिणाम होताना दिसून येत आहे. यामध्ये कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम दिसून येईल. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत एक्स (Twitter) हँडलवरून ट्विट करत म्हटले की, इस्रायल-इराण संघर्षाचा पुढील काही महिन्यांत भारताच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चा तेल आयात करणारा देश आहे. तेल दरवाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती असुरक्षित बनत आहे.
तेल दरवाढीचे संभाव्य परिणाम या संघर्षामुळे तेल पुरवठा अडथळ्यांत सापडण्याची शक्यता असून, शिपमेंट खर्चात वाढ होणार आहे. परिणामी, तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिफायनऱ्यांना तेल खरेदीसाठी अधिक डॉलर्सची गरज भासेल, त्यामुळे डॉलरची मागणी वाढेल, रुपयाचे अवमूल्यन होईल आणि इंधन आयात अधिक महागडे होईल. यामुळे देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) वाढण्याचा धोका आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला सुचवलेल्या उपाययोजना –
1. तेल करारांमध्ये विविधता: केवळ मध्यपूर्वेवर अवलंबून न राहता इतर देशांबरोबरही तेल आयातीसाठी पर्यायी करार करण्यात यावेत.
2. इंधन दर नियंत्रणात ठेवावेत: उत्पादन शुल्क कमी करून किंवा अनुदानाच्या माध्यमातून इंधनाचे दर मर्यादित ठेवावेत, जेणेकरून महागाईवर नियंत्रण मिळवता येईल.
3. रुपयाची अस्थिरता रोखा: रिझर्व्ह बँकेने (RBI) परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचे उपाय करावेत.
प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, “ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, केंद्र सरकारने तातडीने आणि दूरदृष्टीने निर्णय घेणे गरजेचे आहे.