वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सने प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. गुरुवारी विजय सिंग पथिक क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या तीन महिला खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकत भारतीय तिरंगा उंचावला.
४८ किलो वजनी गटात मिनाक्षीने जबरदस्त प्रदर्शन करत सुवर्ण पटकावले. त्याचप्रमाणे ५४ किलो गटात प्रीतीनेही उत्तम कामगिरी दाखवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
दरम्यान, ८० किलो वजनी गटात नुपूरने उझबेकिस्तानच्या सोटिम्बोएवा ओल्टिनॉयवर ५-० असा दणदणीत विजय मिळवत सुवर्ण जिंकले. विशेष म्हणजे, याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नुपूरला ३-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, या स्पर्धेत तिने आपल्या पूर्वीच्या पराभवाचा बदला घेत शानदार पुनरागमन केले.
नुपूरने दोन महिन्यांपूर्वीच आत्मविश्वासाने सांगितले होते की, “मी देशासाठी सुवर्ण जिंकणार” मात्र, तिच्या या वक्तव्यावरून टीका व ट्रोल्स देखील झाली होती. पण नुपूरने आपल्या कामगिरीतून सर्वांचे तोंड बंद केले. आणि सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले.
भारतीय महिला बॉक्सर्सच्या या तिहेरी सुवर्ण कामगिरीने स्पर्धेत भारताचा दबदबा अधोरेखित केला आहे. क्रीडा क्षेत्रातून आणि देशभरात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.






