चेन्नई : भारतीय स्क्वॉश संघाने २०२५ च्या स्क्वॉश विश्वचषकाचे (Squash World Cup) विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. चेन्नईतील एक्सप्रेस एव्हेन्यू मॉलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात भारताने हॉंगकॉंग संघाचा पराभव करत, पहिल्यांदाच ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

भारताच्या या ऐतिहासिक यशात १७ वर्षीय युवा खेळाडू अनाहत सिंगने निर्णायक भूमिका बजावली. तिने नोंदवलेल्या विजयाने भारतीय संघाच्या विश्वचषक विजयावर अखेरचा शिक्कामोर्तब केला.
हा भारताचा पहिला स्क्वॉश विश्वचषक खिताब आहे. यापूर्वी, २०२३ च्या स्पर्धेत कांस्य पदक हे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन होते. विशेष म्हणजे, दुसरी सीड (वरीयता) असलेल्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेदरम्यान एकही सामना गमावला नाही. त्यांच्या या अभेद्य कामगिरीने आणि संपूर्ण स्पर्धेतील वर्चस्वाने भारताच्या खेळाडूंची उत्कृष्ट लय आणि तयारी दर्शविली.

भारताने स्वित्झर्लंड आणि ब्राझील या दोन्ही संघांवर ४-० अशा मोठ्या फरकाने सहज विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३-० असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने दोन वेळच्या विजेत्या आणि बलाढ्य इजिप्तच्या संघाला ३-० असे नमवून अंतिम सामन्यात धडक मारली.






