भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेंडू बदलण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताने या संदर्भात थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार दाखल केली आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे सामना एका निर्णायक वळणावर भारताच्या बाजूने झुकण्याऐवजी इंग्लंडच्या हातात गेला, असा गंभीर आरोप भारतीय संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.
ही घटना लॉर्ड्स कसोटी दरम्यान घडली, जेव्हा भारताने दुसऱ्या डावात नवीन चेंडू घेतला. नियमांनुसार, १० षटकं जुना चेंडू खराब झाल्यास त्या दर्जाचाच दुसरा चेंडू संघाला दिला जातो. मात्र, भारतीय खेळाडूंचं म्हणणं आहे की, त्यांना बदलून दिलेला चेंडू ३० ते ३५ षटकं जुना आणि पूर्णतः मऊ होता.
परिणामी भारतीय गोलंदाजांना चेंडूत स्विंग किंवा सीम मूव्हमेंट मिळाली नाही आणि इंग्लंडने सहज धावा करत सामना २२ धावांनी जिंकला.याबाबत भारतीय कर्णधार शुभमन गिल याने मैदानावरच पंचांशी चर्चा करत आपला आक्षेप नोंदवला होता. याशिवाय संघ व्यवस्थापनाने अधिकृतरीत्या मॅच रेफरीकडे तक्रार केली असून आयसीसीकडून नियमांमध्ये स्पष्टता आणि तातडीचा हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.टीम इंडियाचे अधिकारी म्हणाले, “जर पंचांकडे १० षटकांचा चेंडू उपलब्ध नसेल, तर त्या परिस्थितीत खेळताना आम्हाला पर्याय दिला गेला पाहिजे होता. मात्र, आम्हाला कोणतीही माहिती दिली गेली नाही. जर चेंडूचा फरक आम्हाला आधीच सांगितला गेला असता, तर आम्ही जुनाच चेंडू वापरण्याचा निर्णय घेतला असता. त्यामुळे आयसीसीने यामध्ये स्पष्ट नियम घालणे गरजेचे आहे.”
या प्रकारामुळे लॉर्ड्स कसोटीतील पंचांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भारताच्या या तक्रारीमुळे ICC पुढील कसोटीत चेंडू बदलासंदर्भात अधिक पारदर्शक प्रक्रिया राबवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.