– संजीव चांदोरकर
सार्वजनिक मालकीच्या आयडीबीआयला कॅनडियन फेरफॅक्सला विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, एक महिन्यापूर्वी जाहीर झाल्यानंतर, जादूगाराच्या पोतडीतून एकेक अचंबित करणारी वस्तू बाहेर यावी तसे या व्यवहारात झालेले घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत.
त्यातील एक माहिती तर सर्वांवर कडी करणारी आहे. माजी केंद्रीय वित्तसचिव सुभाषचंद्र गर्ग म्हणतात हा भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असू शकतो.
हे सगळे वाचताना “या डाव्यांना सगळीकडे सारखे घोटाळे दिसतात” असे विचार वाचकांच्या मनात येत असतील तर त्यांनी हे सर्व डिटेल्स बाहेर काढणारे पत्रकार, विश्लेषक, माजी सचिव कोणीही रूढार्थाने डाव्या विचारसरणीचे नाहीत, मेनस्ट्रीम मध्ये अनेक दशके काम केलेले प्रोफेशनल्स आहेत हे लक्षात ठेवावे आणि आपण स्वतः बौद्धिक प्रामाणिक आहोत की या राजवटीचे अंध समर्थक आहोत याचा स्वतःशीच धांडोळा घ्यावा
सर्वावर कडी करणारी ही माहिती काय आहे ?
केंद्र सरकार आणि आयुर्विमा महामंडळ दोघे मिळून त्यांचा आयडीबीआय मधील ६० टक्क्यांपेक्षा हिस्सा ५२,८७८ कोटी रुपयांना फेअरफॅक्सला विकणार आहे. ( या विक्री प्रस्तावावरील मूलभूत राजकीय टीका तूर्तास बाजूला ठेवूया).
कोणाचाही असा समज होईल की फेअरफॅक्स हे पैसे स्वतःच्या खिशातून, त्याच्या कॉर्पोरेट समूहातून, बाहेरून कर्ज उभारून वगैरे उभे करणार असेल. फेयरफॅक्सचा कावेबाज प्रस्ताव वेगळा आहे. बघूया..
फेअरफॅक्सच्या भारतातील बँकिंग आणि वित्त क्षेत्रात इतरही गुंतवणुकी आहेत. त्यातील तीन आहेत IIFL, Godigit General Insurance आणि Godigit Life Insurance. (यातील पहिल्या दोन लिस्टेड कंपन्या आहेत , तर तिसरी अनलिस्टेड आहे).
२०२६ मध्ये आयडीबीआय खूप चांगल्या वित्तीय स्थितीमध्ये आली आहे. फक्त काही वर्षापूर्वी नव्हती. कशामुळे आली? तर सार्वजनिक स्त्रोतांतून दिल्या गेलेल्या हजारो कोटी रुपयांच्या मदतीमुळे. थकित कर्जाच्या मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या write off मुळे.
आयडीबीआयच्या या वित्तीय सुस्थितीचा फायदा घेत, आयडीबीआयचे नव्याने होऊ पाहणारे मालक म्हणजे फेअरफॅक्स, आपल्या वरील तीन वित्तसंस्थामधील शेअर्स आयडिबीआयला विकणार आहे. (म्हणजे हात पीरगळून खरेदी करायला लावणार आहे. मालक आहेत ना).
पुन्हा एकदा यातील व्यावसायिक नीतिमत्ता बाजूला ठेवूया आणि प्रश्न विचारूया की आयडीबीआय वर उल्लेख केलेल्या या तीन वित्त संस्था विकत घेताना जे पैसे देईल ते कोणाकडे जाणार आहेत ?
त्याचे उत्तर आहे फेरफॅक्स कडे.
किती? त्याचे उत्तर आहे अंदाजे २८,३०० कोटी रुपये!
लक्षात येतेय का?
फेरफॅक्सला आयडीबीआय मधील कंट्रोलिंग हिस्सा विकत घेण्यासाठी जे ५२,८७८ कोटी रुपये हवे आहेत त्यातील २८,३०० कोटी रुपये म्हणजे जवळपास ५३ टक्के, फेअरफॅक्स आयडीबीआयच्या खिशातूनच उचलणार आहे.
या पोस्टमधील बरीच माहिती मिडियामध्ये आलेली आहे. या पोस्टचा उद्देश फक्त तेवढाच नाही. त्याआधी LBO म्हणजे काय ते समजून घेऊया. (LBO बद्दल अधिक माहिती हवी असल्यास फक्त गुगल करावे)
अमेरिकेत अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या विकत घेण्यासाठी जे विविध मार्ग वापरले जातात त्यातील एक आहे लिव्हरेज बाय आऊट (LBO). यामध्ये बहुतांश वेळा प्रायव्हेट इक्विटी फंड खरेदीदार असतात. हे फंड त्यांच्या नजरेत भरलेल्या कंपनीला विकत घेण्यासाठी जे पैसे लागतात ते कर्ज रूपाने उभे करतात.
अर्थात कर्ज देणाऱ्या बँका/ वित्तसंस्थाना कर्जाची परतफेड होण्यासाठी स्थिर कॅशफ्लो आणि सुरक्षा म्हणून कर्जापेक्षा जास्त मूल्याच्या मत्ता गहाण हव्या असतात. प्रायव्हेट इक्विटी फंड जी कंपनी विकत घेऊ इच्छितात त्या कंपनीचेच ॲसेट / मत्ता गहाण ठेवतात आणि त्याच कंपनीच्या कॅशफ्लो मधून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडतात.
हेच तत्व त्यात फेरफार करून फेयरफॅक्स आयडीबीआय विकत घेताना वापरत आहे.
फेअरफॅक्सचे सर्वेसर्वा प्रेम वत्स, त्याची मोदी राजवटीशी असलेली सलगी, त्याने भाजपला दिलेल्या देणग्या याच्यापलिकडे जाऊन जागतिक वित्त भांडवलशाही, जिचे निःसंदेह हेडक्वार्टर अमेरिकेतील वॉल स्ट्रीट आहे, किती निर्दयी, रूथलेस आहे हे या निमित्ताने समजून घेण्यासाठी आहे.
वित्त भांडवल / त्याकडे वाहत येणारे अब्जावधी डॉलर्स / रुपये / त्याचे मॅनेजर्स काही परग्रहावरून आलेले आक्रमक नाहीत. ते सगळे इथलेच आहेत. मुद्दा आहे की त्यांना एवढी हिंमत येते कोठून ? ती येते प्रस्थापित राजकीय अर्थव्यवस्थेतून. ज्यात कायदे, नियामक मंडळे मोडतात..म्हणून राजकीय व्यवस्था समजून घेतली पाहिजे.
LBO अपवादात्मक नाही. स्टॉक मार्केट, मायक्रो फायनान्स, आरोग्य विमा अशी अगणित उदाहरणे देता येतील. ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जिणे मुश्किल झाले आहे.
जागतिक वित्त भांडवल, जे दिसेल त्याला शिंगावर घेणारा, नफ्याच्या रक्ताची चटक लागलेला एक मदमस्त बैल आहे. त्याला नीतिमत्तेची चाड नाही. त्याला फक्त राजकीय सत्ता वठणीवर आणू शकते. म्हणून नैतिक शुद्धतावादी भूमिकेतून सत्तेच्या राजकारणापासून दूर राहू नका.





