मालेगाव : मालेगाव शहरात व परिसरात वंचित बहुजन आघाडीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आरपीआय (आठवले गट), रिपब्लिकन सेनेमधील शेकडो युवक व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे मालेगावात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्ह्याच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांचा विश्वास ‘वंचित’कडे :
या सोहळ्यात ग्रामीण व शहरी भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बहुजन, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व कष्टकरी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणांवर विश्वास व्यक्त करत, नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्याचा संकल्प केला.

येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी :
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटनात्मक ताकद वाढवून येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रभावी कामगिरी करेल. मालेगाव व नाशिक पूर्व जिल्ह्यातील युवकांची वाढती ताकद ही परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

संघटन विस्ताराला नवे बळ :
या भव्य पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्व जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने संघर्ष केला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप, राजेंद्र पवार सर, उपाध्यक्ष कैलास लोहार, कादिर शेख, आनंद शिंगारे, राम बसते, संतोष केदारे, बापू बर्डे, संदीप महिरे, शशी पवार, ऍड. नितीश हिरे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.





