एचडीएफसी बँकेने आपल्या बचत आणि पगार खात्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आतापासून रोख व्यवहार, निधी हस्तांतरण आणि चेकबुकच्या नियमांवर नवीन शुल्क लागू झाले आहेत. हे नवीन नियम १६ ऑगस्ट २०२५ पासून अंमलात आले आहेत, ज्यामुळे अनेक ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
रोख व्यवहार आणि शुल्क
बँकेने रोख व्यवहारांसाठी (पैसे काढणे आणि जमा करणे) नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, आता दरमहा फक्त ४ रोख व्यवहार मोफत असतील. यापेक्षा जास्त व्यवहार केल्यास, प्रत्येक व्यवहारावर १५० रुपये शुल्क आकारले जाईल.
याशिवाय, रोख व्यवहारांवर असलेली मोफत मर्यादा आता २ लाख रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. जर तुम्ही १ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढली किंवा जमा केली तर प्रत्येक १,००० रुपयांसाठी ५ रुपये शुल्क लागेल, ज्याची किमान मर्यादा १५० रुपये असेल.
तुम्ही दुसऱ्यांच्या खात्यात (थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन) पैसे जमा करत असाल, तर एका दिवसात फक्त २५,००० रुपये जमा करता येतील आणि यावरही १५० रुपये शुल्क आकारले जाईल.
निधी हस्तांतरणाचे बदललेले नियम
आता NEFT, RTGS आणि IMPS सारख्या डिजिटल निधी हस्तांतरणांवरही शुल्क वाढले आहे.
NEFT: १०,००० रुपयांपर्यंत २ रुपये, १ लाख रुपयांपर्यंत ४ रुपये, २ लाख रुपयांपर्यंत १४ रुपये, आणि २ लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी २४ रुपये शुल्क लागेल.
RTGS: २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत २० रुपये आणि ५ लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी ४५ रुपये शुल्क लागेल.
IMPS: १,००० रुपयांपर्यंत २.५० रुपये, १ लाख रुपयांपर्यंत ५ रुपये, आणि १ लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी १५ रुपये शुल्क आकारले जाईल.
चेकबुक आणि इतर सेवांचे शुल्क
चेकबुकच्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता बचत खात्यावर वर्षाला फक्त १० पानांचे एक चेकबुक मोफत मिळेल, जे पूर्वी २५ पानांचे होते. यापेक्षा जास्त पानांची गरज असल्यास, प्रत्येक अतिरिक्त पानासाठी ४ रुपये द्यावे लागतील.
बॅलन्स सर्टिफिकेट, व्याज सर्टिफिकेट किंवा अॅड्रेस कन्फर्मेशनसाठी १०० रुपये शुल्क लागेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे ९० रुपये आहे.चेक बाऊन्स झाल्यास, पहिल्यांदा ४५० रुपये, दुसऱ्यांदा ५०० रुपये आणि तिसऱ्यांदा ५५० रुपये दंड आकारला जाईल.
हे नवीन नियम मुख्यतः अशा ग्राहकांना प्रभावित करतील जे वारंवार बँकेत जाऊन रोख व्यवहार करतात. अशा ग्राहकांनी आता यूपीआय किंवा नेट बँकिंगसारख्या डिजिटल पर्यायांचा वापर वाढवून हे अतिरिक्त शुल्क टाळू शकता.