सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप तसेच स्पर्धा परीक्षांचे क्लासेस, स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम समतादुतांचे कार्य तसेच संविधान जागृतीसंदर्भात कार्यक्रम अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम राबवले जातात. मात्र, या वार्षिक बजेटमध्ये बार्टीला फक्त 75 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तेच, सारथी आणि महाज्योती या संस्थांना 365 कोटी देण्यात आले आहेत. त्यामुळे शासन दुजाभाव करीत असून, बार्टीला वाढीव निधी म्हणून 400 कोटी रुपये देण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील फुले – शाहू – आंबेडकरवादी संस्था, संघटना पक्ष यांच्या रेट्यामुळे ओबीसी समूहासाठी ‘महाज्योती’ मराठा समुहासाठी ‘सारथी’ची निर्मिती करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अनेक प्रयत्नांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने बार्टीच्या धर्तीवर “सारथी” ‘आणि “महाज्योती”ची निर्मिती केली आहे.
या तिन्ही संस्थांचे वार्षिक बजेट जवळपास समान आहे. तिन्ही संस्थांचे वार्षिक बजेट जवळपास 365 कोटी रुपये आहे. राज्य सरकारने व महाराष्ट्र शासनाने सारथी आणि महाज्योती या संस्थांना 365 कोटी रुपये हस्तांतरित केले. मात्र, बार्टीला फक्त 75 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोनाने दिली आहे.
आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्र शासन दुजाभाव करीत आहे. तो भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करत आहे, आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये भांडणे लावण्यापेक्षा बार्टीला वाढीव निधी म्हणून 400 कोटी रुपये देऊन हा भेदभाव महाराष्ट्र शासनाने संपावावा ही अपेक्षा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या जातीयवादी चुकीच्या धोरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सम्यकच्या शिष्टमंडळाने संबंधित घटनेचा निषेध नोंदवून बार्टी या संस्थेचे बजेट वाढवून सरकारने तकाळ द्यावे यासंदर्भात निवेदन दिले.
सरकार व प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर येत्या काळात सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.