मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षाचालकाला भररस्त्यात शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, आमदारांच्या या ‘भाईगिरी’वर सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन आणि खौगली परिसरात पदपथांवरील अतिक्रमणांबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार पराग शाह शुक्रवारी (१९ डिसेंबर) या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी पाहणी सुरू असतानाच, महात्मा गांधी मार्गावर एक रिक्षाचालक वाहतुकीचे नियम मोडून चुकीच्या दिशेने (Wrong Side) येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
रिक्षाचालकाला त्यांनी केवळ अडवले नाही, तर त्याच्या रिक्षाची चावी काढून घेतली. संताप इतक्यावरच मर्यादित राहिला नाही; पराग शाह यांनी भररस्त्यात सर्वांसमोर रिक्षाचालकाच्या कानाखाली लगावली आणि त्याला उद्धट भाषेत शिवीगाळही केली.
https://www.facebook.com/share/v/1A77Cj754b/
हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, यावर आता गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत. रिक्षाचालकाने नियम मोडला असेल तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांचा आहे, आमदारांचा नाही.एक लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊन मारहाण कशी काय करू शकतो?
निवडणुकीच्या तोंडावर ‘सामान्य जनता’ म्हणणाऱ्या नेत्यांचा हाच का खरा चेहरा? अशा तीव्र शब्दात लोकांनी निषेध केला आहे.
सोशल मीडियावर तीव्र पडसाद
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी पराग शाह यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. “आमदार साहेब, तुम्ही कायदा बनवणारे आहात की कायदा तोडणारे?” असा सवाल विचारला जात आहे.





