पुणे : इस्रोचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारताच्या रॉकेटरी कार्यक्रमातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे विजय पेंडसे. यांचे रविवारी (३० जून) रोजी लॉस एंजेलिस येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. (Vijay Pendse Dies)
पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी केली होती. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पाषाण येथील ARDE मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून झाली. तिथे त्यांची निवड ‘भारताचे रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी थुंबा विषुवृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रात (TERLS) सहायक शास्त्रज्ञ म्हणून केली.
तिथे त्यांना डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासोबत काम करण्याची मोलाची संधी मिळाली. श्रीहरिकोटा मध्ये त्यांचे मोलाचे योगदान भारताने श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी डॉ. गोवारीकर यांनी निवडलेल्या सहकाऱ्यांपैकी पेंडसे हे एक होते. (Vijay Pendse Dies)
यावेळी त्यांच्यावर अग्निबाणांसाठी घन इंधन निर्मिती करण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा विभाग स्वतंत्र झाल्यावर पेंडसे त्याचे प्रमुख बनले. तसेच भारताच्या यशस्वी SLV-3 आणि PSLV प्रक्षेपण मोहिमांमध्ये त्यांनी विकसित केलेल्या घन इंधनाचा वापर करण्यात आला.
इस्रो नंतरचे विजय पेंडसे यांचे आयुष्य – पेंडसे यांच्या इस्रो नंतरचे आयुष्याचे बोलायचे झाले तर, १९९५ साली त्यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते अमेरिकेत मिशिगन येथील एका रासायनिक कंपनीत रसायन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. भारतीय अवकाश संशोधनात त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.