वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती
मुंबई : परभणीतील शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत दाखल झालेल्या एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत केली जाणार असून त्यानंतर औपचारिक चौकशीस सुरूवात होणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस कोठडीत अमानुष मारहाण झाल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला. प्रारंभी पोलिसांनी मृत्यूचे कारण ‘हृदयविकाराचा झटका’ असल्याचे सांगितले होते.
मात्र, वैद्यकीय अहवालामुळे हा दावा फोल ठरला. विजयाबाई यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात त्या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत स्पष्ट निर्देश दिले की आरोपींचं नाव माहीत नसले तरी एफआयआर दाखल होऊ शकतो. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी समिती गठीत केली की चौकशीला सुरुवात होईल. हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी संविधानिक न्यायाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.