मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भीक मागून पाठवणार पैसे – युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचा इशारा
जालना : राज्यात मागील पंधरवड्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. जालना जिल्ह्यातही सोयाबीन, मका, हरभरा, तुर या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री यांनी नुकताच जालना जिल्ह्याचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अहवालाच्या आधारे घोषणा केली होती की, “दीपावलीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाईल.” मात्र, दिवाळी संपली तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही ‘अधुरी दिवाळी’ ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आता सरकारविरोधात आक्रमक झाली असून, उद्या जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर ‘भीक मागो’ आंदोलन राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान सरकारने न दिल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर भीक मागून तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी सांगितले.
लहाने म्हणाले, “शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पायमल्ली करून हे सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. शेतकऱ्यांना दिवाळीतही मदत न मिळणे हे सरकारचे अपयश आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनाला जालना जिल्ह्यासह ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.