पुणे : प्रभाग क्रमांक ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत फेक मतदान झाल्याचा गंभीर आरोप उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात आली असून, संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी उमेदवाराने केली आहे.
उमेदवाराने व्यक्त केलेल्या आक्षेपानुसार, मतदान केंद्रावर फेक मतदान घडवून आणण्यात आले असून यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकारी यांच्यावर तात्काळ शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान दबाव तंत्र वापरून मतदारांना घाबरवणारे पोलिंग एजंट आणि संबंधित पोलीस अधिकारी यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, मतदान खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तात्काळ तपासण्यात यावे. एकाच व्यक्तीने एकापेक्षा अधिक वेळा मतदान केले असल्यास ती व्यक्ती कोण आहे, तिच्यामागे कोणाचा हस्तक्षेप आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा मास्टरमाइंड कोण आहे, हे उघड करण्यात यावे. दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका उमेदवाराने मांडली आहे.
या कथित गैरप्रकारामुळे लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य मतदारांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून, लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीविरोधात कायदेशीर लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.





