Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home संपादकीय

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2022
in संपादकीय
0
भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?
0
SHARES
242
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समूह-महात्मा गांधी-मुस्लिमसमूह यांच्या विरोधातील संघ परिवाराच्या विद्वेषी प्रशिक्षणातून तयार झालेले कालीचरण हे दाढीधारी-भगव्या कपड्यातील महाराज महात्मा गांधींविरोधी खूप काही बोलले. तसेच या धर्म संसदेत मुख्य संरक्षक राम सुंदर महाराजांनीही गांधींबाबत विकृत विधाने केली. विकृतांची भर असलेल्या या २० धर्मगुरूंच्या धर्मसंसदेत काहींनी सनातन हिंदूंना शस्त्रे घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी तयार होण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-संघ परिवार कोणत्या ना कोणत्या कारणाने धर्मसंसद बोलावित असतो. १७-१९ डिसेंबर २०२१ या काळात छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका सभागृहात धर्मसंसद भरली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समूह-महात्मा गांधी-मुस्लिमसमूह यांच्या विरोधातील संघ परिवाराच्या विद्वेषी प्रशिक्षणातून तयार झालेले कालीचरण हे दाढीधारी-भगव्या कपड्यातील महाराज महात्मा गांधींविरोधी खूप काही बोलले. तसेच या धर्म संसदेत मुख्य संरक्षक राम सुंदर महाराजांनीही गांधींबाबत विकृत विधाने केली. विकृतांची भर असलेल्या या २० धर्मगुरूंच्या धर्मसंसदेत काहींनी सनातन हिंदूंना शस्त्रे घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी तयार होण्याचे आवाहन केले. एकाने तर नेहमीसारखे गांधींच्या हत्येबद्दल ब्राह्मणी नथुराम गोडसेचे कौतुकही केले.

हे हिंदू राष्ट्र स्थापनेचे आवाहन नाही. तर ब्राह्मण नसलेल्या साधूंना चेतवून ब्राह्मणी राष्ट्र स्थापनेचे हे आवाहन आहे. ते इथेच थांबले नाहीत ,तर मुस्लीम अल्पसंख्याकांनी वेगवेगळ्या देशांचे राजकारण आणि प्रशासन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला.

तर दुसरीकडे, आपल्या संतुलित भाषेत स्वामी स्वरूपानंद यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबतच्या विधानाशी असहमती दाखवली. त्यांनी धर्मसंसदेत अशी विकृत विधाने करणा-यांना प्रती प्रश्न केला; ३० कोटी मुस्लीम आणि सुमारे १५ कोटी ख्रिश्चन राहत असलेल्या देशाला तुम्ही हिंदू राष्ट्र कसे म्हणाल? धर्मसंसदेचे निमंत्रक दूधधारी मठाचे प्रमुख महंत राम सुंदर दास यांनीही कालीचरणच्या मुक्ताफळांना विरोध करत स्वतःला या संसदेपासून दूर केलं. या धर्मसंसदेचा उद्देश फळाला न आल्याचंही ते म्हणाले. या संसदेत उपस्थित असलेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री कॉंग्रेसचे श्री. भूपेश बघेल अचानक धर्मसंसद सोडून निघून गेले. एनजीओ नीलकंठ सेवा समिती आणि दूधधारी मठ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काँग्रेस नेते प्रमोद दुबे, भाजप नेते ब्रिजमोहन अग्रवाल आणि विष्णू देव साई यांनीही सहभाग घेतला. संघ-भाजप-कॉंग्रेस यांची विचारपीठंही सारखीच आहेत! मात्र ,कॉंग्रेसने पोलिसात तक्रार दाखल केली!

दरम्यान ,कालीचरण यांना अटक झाल्याची बातमी आली आहे. वादांच्या या चढाओढीत संघाचे कट्टर स्वयंसेवक, महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी तर येथे संघाच्या काळ्या टोपीखालील ब्राह्मणी, विद्वेषी डोक्याचा अधिक वापर करत गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाने भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही; तर केवळ हिंसाचार-खूनी हल्ल्यांमुळे ते मिळाले अशा आशयाची विधाने केल्याचे प्रसिध्द झाले आहे. हे संपादकीय लिहीपर्यंत तरी याला मुंबई राजभवनमधून अधिकृतपणे नकारही आलेला नाही! वास्तविक राज्यपाल हे राज्याचे संविधान प्रमुख आहेत. त्यांनी सा-या मर्यादा ओलांडल्या आहेत!! अटक झालेल्या कालीचरणला तुरुंगातून सोडण्यासाठी वंचित बहुजन समाजातील बहकवले गेलेले तरुण रस्त्यावर उतरल्याच्याही बातम्या येवू लागल्या आहेत. नेहमीप्रमाणेच मा. पंतप्रधान श्री. मोदीजी काहीही बोलणार नाहीत हे ठरलेले आहेच!

कालीचरण मूळचा महाराष्ट्र-अकोला, जुने शहर भावसार समाजातील आहे.त्याचे मूळ नाव अभिजीत धनंजय सारंग. नेहमीप्रमाणे छोट्या ओबिसी समाजातील, अर्धवट शिक्षण झालेला ;पण अध्यात्माकडे ओढ असलेला तरुण. हरिद्वारला दीक्षा घेतल्यावर कालीचरण महाराज झाला. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभव पत्करावा लागला होता.

कालीचरणसारख्या तरुणांची ही अवस्था पाहिल्यावर श्री. कालेलकर यांच्या ९३ वर्षांपूर्वीच्या मुंबई इलाख्यांतील जाती या ऐतिहासिक पुस्तकाची आठवण झाली. यात एकूण ३०८ पानांपैकी एकट्या ब्राह्मण वर्ण-जातीची माहिती ३५ पानांत (११.३६%) नमूद केलेली आहे. त्यांच्या सर्वाधिक म्हणजे १४७ उपजाती आहेत. ब्राह्मण उपजातींमध्ये कितीही मतभेद, व्यवसाय असले ,तरी सारे वर्चस्ववादी-एकचालकानुवर्ती संस्कृतीचा प्रचार-प्रसार करत आले आहेत. ब्राह्मण पौराहित्य आणि भिक्षुकी व्यवसाय सर्वत्र करत आहेत. स्वत:चे पावित्र्य, सर्वज्ञ असल्याचे दाखवत आहेत. स्रीशूद्रातिशूद्रांच्या समाजात सर्व प्रकारच्या गैरसमजुती, अनेक थोथांड विधी सांगत आहेत. समता, लोकशाहीवादी परंपरेच्या विरोधात विकृत प्रचार करत आहेत.

१९२०- लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन भारतात परतले. गांधी गुजरातचे. तरी गांधी-आंबेडकर यांचे चळवळीचे मुख्य क्षेत्र भारतासह महाराष्ट्र राहिले. त्यांच्या निमित्ताने प्रथमच मुख्य प्रवाहात मोठ्या संख्येने स्रीशूद्रातिशूद्र लढ्यात आले. डॉ. आंबेडकर तर स्रीशूद्रातिशूद्रांतील अस्पृश्यांना सोबत घेत समता, स्वातंत्र्य, मैत्रीभाव मूल्यांचा आग्रह धरत होते. आजपर्यंतच्या पारंपरिक नेतृत्वाच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रीय-आंतर्राष्ट्रीय स्तरावर भूमिका मांडू लागले. बाबासाहेब त्यांच्या लिखाणात सांगत तसे स्वत: ब्राह्मण समूह एकाकी पडू नये व सामान्य शूद्रातिशूद्रांना चकविण्यासाठी ते अतिअल्पसंख्य पारंपरिक ब्राह्मणी धर्म-संस्कृतीचा चेहरा लपवत हिंदू धर्म नावाने वावरू लागतात. सर्व काही सोयीने करायची ब्राह्मणी संघाची कार्यपध्दतीच आहे.

श्री. हेडगेवारांनंतरचे सरसंघचालक श्री. मा.स.गोळवलकर यांच्या बंच ऑफ थॉट्स या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी मुसलमानांच्या प्रश्नावर मुलाखत दिली आहे. ब्राह्मणी हिंदू धर्माचा त्याग करून बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसोबत १९५६ ला बौध्द धम्म स्वीकारला. तर राज्यघटनेत अल्पसंख्यांक, अनु. जाती-जमाती, आदी समूहांना खास सवलती दिल्या आहेत. बाबासाहेबांना उघड विरोध न करण्याच्या संघाच्या डावपेची धोरणानुसार या मुलाखतीत त्यांनी या समूहांविरोधी उघड भूमिका घेतली आहे. हे समूह राष्ट्रीय ऐक्याला धोका असल्याचेच ते म्हणत आहेत. यावर कॉंग्रेस गटांनी कधीच विरोध केलेला नाही.

शेकडो उपजातींची ब्राह्मण वर्ण-जातिव्यवस्था, हजारो फसव्या नावाने गिर्यारोहण, किल्ले संरक्षण, पर्यावरण संरक्षण-झाडे लावणे, गर्भ संस्कार वर्ग सारख्या संस्था चालवत आहेत. निमसैनिक दले उभी करत आहेत. विषारी जाळ्यांत मोठ्या संख्येने वंचित बहुजन समाजातील अर्धशिक्षित बेरोजगार, गरिबीत परेशान झालेल्या तरुणांना अडकवीत आहेत. त्यांच्या ख-या प्रश्नांविषयी सरकारला व त्यांच्या धोरणांना जाब विचारण्याऐवजी या तरुणांचे नियोजनबद्धरित्या गुन्हेगारीकरण करून त्यांच्यातील लढाऊ ऊर्जा व्यवस्थेविरुध्द लढणा-यांविरुध्द वापरीत आहेत. त्यांनी ब्राह्मणशाही, भांडवलशाहीविरुध्द लढण्यास प्रवृत्त होवू नये, असा हा राजकीय कट आहे. यांना रोखण्यात व्यवस्थाविरोधी चळवळ कमी पडत आली आहे. ब्राह्मणशाहीचा सरळ उल्लेख करण्याऐवजी केवळ हिंदू-हिंदुत्व या नावाने सामान्य हिंदू ओबिसींनाच झोडत चालले आहेत. ब्राह्मणी धर्म नोशन्सना कुठेच हात लावत नाहीत. केवळ भांडवलशाहीविरोधी प्रामाणिकपणे लढूनही प्रतिकात्मक कार्यक्रम घेत ब्राह्मणशाही उदध्वस्त होवूच शकत नाही. आता यांच्या मदतीला त्या त्या राज्यातील मूठभर मराठा, पटेल, रेड्डी, जाट, ठाकूर, आदी सत्ताधारी घराणी धावत सुटली आहेत. शासन-प्रशासनात या दोघांचेच प्राबल्य आहे. वंचित बहुजन कुठेच नाही!

२०१४ पासून कॉंग्रेसविरोधात केंद्रामध्ये संघ-भाजप सत्तेवर आहे. तेव्हापासून संघ परिवारातील सर्व समर्थक खूपच पिसाटले आहेत. १९५० ला अधिकृतपणे संसदीय लोकशाही आधारित राज्यघटना स्वीकारल्यापासून अतिअल्पसंख्य ब्राह्मणी संघाने त्यांच्या नियोजनाप्रमाणे वंचित बहुजन समूहांतील वारकरी आदी समतेची परंपरा मारून तरुणांच्या मस्तिष्काचे विद्वेषी, हिंसक ब्राह्मणीकरण करायला सुरुवात केली. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या राजकीय बहुसंख्येसाठी ओबिसी तरुणांवर लक्ष केंद्रित केले. त्याप्रमाणे ते आता बोलू लागले आहेत. या धर्मसंसदेच्या केंद्रस्थानी संघाला शरण न येणारे मुस्लीम आणि आंबेडकरवादी बौध्द समूह आहेत. हिंदूंना म्हणजेच बहुसंख्य ओबिसी-भटके-विमुक्त तरुणांना सशस्त्र होण्याचे आणि देशातील मुस्लिमांना नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले. डोके मात्र भिडे-एकबोटेसारख्या ब्राह्मणी शक्तीचे. इतिहासाची नव्याने मांडणी करणारे डॉ. आ.ह.साळूंखे यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्या धडावर डोकेही आमचेच! असा संकल्प येथील वंचित बहुजन विशेषत: ओबिसी-बारा बलूतेदार-कारागिर-भटके-विमुक्तातील तरुण-तरुणींनी केला, तरच आपल्या भावी पिढ्या शाबूत राहणार आहेत. नाहीतर येथील नवीन आर्थिक धोरणांनुसार आपला चेहरा बदलणारी ब्राह्मणशाही व जागतिक स्वरूप घेतलेली भांडवलशाही आपल्या सा-यांचा बळी केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी सच्चे फुले-आंबेडकरी विचार मानल्याशिवाय पर्यायच नाही. स्वत:ची हक्काची, स्वाभिमानी सत्ताच अशा ब्राह्मणी डोक्यांचा समाचार घेऊ शकते!

नियोजनबद्धरित्या गांधी-आंबेडकरांविरुध्दचे संघाचे विष या तरुणांच्या तोंडातून ओकायला लावत आहेत. त्याला साथ हे २४ तास प्रचंड पोलीस पहा-यातील कोश्यारींसारखे संघ-स्वयंसेवक देत आहेत. ही संघ-भाजपची खरी शक्ती आहे. इतिहासात तत्कालीन परिस्थितीत आपापली सामाजिक पार्श्वभूमी आणि आपल्यासोबत असलेला समूह केंद्रित दृष्टिकोन यातून गांधी, आंबेडकर यांची परस्परविरोधी भूमिका पुढे येत होती. ते मतभेदाचे वास्तव नाकारता येतच नाही. दोघांची संघटनात्मक माध्यमही स्वतंत्रच होती. तरीही डॉ. बाबासाहेबांचे नातू एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात ३१ जानेवारी ३० जानेवारी, २०१८ गांधी स्मृतीदिनी महात्मा गांधींचे नातू मा. राजमोहन यांच्या समोर गांधी –आंबेडकर यांच्या महाविवादांबाबत घेतलेली भूमिकाही तितकीच वर्तमान आणि भविष्याबाबतीत अत्यंत महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य लढ्यातील कॉंग्रेस पक्ष- नेत्यांसमोर स्वातंत्र्य लढा, ब्रिटिश शासन, वंचित बहुजन राजकारण आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत, आदी मूलभूत मुद्द्यांवर गांधी-आंबेडकरांमधील अहिंसक वादविवाद यामुळे त्यांना परस्पर समजून घेण्याची संधी मिळत होती. स्वातंत्र्य लढा समृध्द होत होता. यातूनच नव्या भारताची उभारणी कशी याविषयी स्पष्टता येत होती. या दृष्टिकोनातून पाहिले नाही ,तर १९२० चे सनातन ब्राह्मणी गांधी, १९४५-४७ पर्यंतची आंतरजातीय लग्न समर्थनार्थ भूमिका, १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य ,त्यांच्या स्वप्नातील नाही म्हणणाऱ्या गांधींना कॉंग्रेसनेच एकटे पाडणे; स्वातंत्र्य मिळताच भा.रा. कॉंग्रेस पक्ष बरखास्त करावा गांधींच्या या भूमिकेचे बाबासाहेबांनी केलेले समर्थन, संसदीय लोकशाहीत कॉंग्रेससमोर वंचित बहुजन-कष्टक-यांचा समर्थ विरोधी पक्ष व त्याक्रमात सत्ताधारी पक्ष म्हणून स्वत:ला विकसित करत जाणे; शेवटी स्वातंत्र्य मिळताच पांच महिन्यांत म्हणजे ३० जानेवारी १९४८ ला गांधींची ब्राह्मणी नत्थुराम गोडसेने सेवाग्राम आश्रमात हत्या करणे, आदी महत्त्वाच्या घटनांचा सुसंगत अर्थच लागणार नाही. अशा गोडसे-भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण कोण हे ओळखले पाहिजे!

शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१८५७


       
Tags: ambedkarBhidebjpCongressGandhiKalicharanrssshantarampandere
Previous Post

चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

Next Post

ढोंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावधान !

Next Post
ढोंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावधान !

ढोंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावधान !

आरक्षणाशिवाय घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची झालेली पद भरती रद्द करा !
बातमी

समतादुतांच्या कार्यशाळेत बार्टी महासंचालक व अधिकारी कर्मचारी ह्यांचा बेभान डान्स.
ह्या सर्व नाच्या ना निलंबित करा – राजेंद्र पातोडे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वारे समतादुतांच्या कार्यशाळेत बेभान ...

June 2, 2023
परमेश्वर रणशूर यांची रुग्णालयात जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली भेट !
बातमी

परमेश्वर रणशूर यांची रुग्णालयात जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली भेट !

मुंबई - वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर व गौतम हराळ यांच्यावर मुंबईतील दादर परिसरात भ्याड हल्ला करण्यात ...

June 1, 2023
राजदंडाची स्थापना म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी?
राजकीय

राजदंडाची स्थापना म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी?

आज (२८/०५/२०२३) नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांना डावलून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी ...

May 29, 2023
मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणात चोख प्रत्युत्तर देऊ – वंचित बहूजन युवा आघाडी.
बातमी

मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणात चोख प्रत्युत्तर देऊ – वंचित बहूजन युवा आघाडी.

काल वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वार्ड अध्यक्ष गौतम हराळ ह्यांचेवर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला ...

May 28, 2023
मागासवर्ग आयोगाला बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ देण्यात आलाय ! – राजेंद्र पतोडे
बातमी

टीव्ही9 ची ही कसली पत्रकारिता !

मविआच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल ह्या हेडलाईन ने #TV9मराठी ने एक बोगस बातमी चालवली आहे.अकोला लोकसभा मतदार संघात बाळासाहेब आंबेडकर ...

May 24, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क