– कुलदीप कोटंबे (संस्थापक – एक्सलेन्स आय.ए.एस अकॅडमी तथा आंबेडकराईट लर्निंग)
आज सोमवार आहे, आज मांसाहार करू नकोस… आज चतुर्थी आहे, उपवास कर बाळा… उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे, अंडी वगैरे असलेले पदार्थ खाऊ नकोस… आज बौद्धेतर दलित समाजातील सुशिक्षित आई जी स्वतः डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्राध्यापिका आहे बाहेरगावी शिकणाऱ्या किंवा नोकरीला असलेल्या आपल्या मुलांना असे सल्ले देताना दिसते. फुले शाहू आंबेडकर चळवळीमुळे ज्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आणि आरक्षणाचा लाभ घेऊन ज्या स्वावलंबी झाल्या, त्या माता आपल्या मुलांना या महापुरुषांचे विचार सांगताना दिसत नाहीत.
उलट, त्या स्वतःही हे विचार समजून घेताना दिसत नाहीत. आमच्या पिढीतील माता या पिढीपेक्षा कदाचित अधिक धार्मिक होत्या, पण त्यांनी कधीही मुलांवर अशा धार्मिक गोष्टींचे दडपण आणले नाही. तू घरापासून दूर आहेस, जे आवडेल ते खा. अभ्यास महत्त्वाचा आहे, चतुर्थी एकादशी येत जात राहील, आम्ही करू तुझे उपवास, तू काळजी नको करू, असे सांगणारी ती पिढी होती. आम्ही जेव्हा फुले आंबेडकर विचार स्वीकारले, तेव्हा त्यांनी विरोध केला नाही. माझी आई वारकरी होती, पण तिने बाबासाहेबांना विठ्ठला इतकेच मानले. आमच्या वैचारिक स्वातंत्र्याचे त्या पिढीने स्वागतच केले.
परंतु, आज पदवीचे शिक्षण घेणाऱ्या पिढीवर धार्मिक कर्मकांडांचे प्रचंड ओझे आहे. दलित समाजातील आया कदाचित उच्चवर्णीय आयांचे अनुकरण करत असतील, पण आपल्या मुलांचे सामाजिक वास्तव आणि त्यांची ओळख वेगळी आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. या संदर्भात रशियाला वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या एका मुलाची गोष्ट महत्त्वाची आहे. नांदेड जिल्ह्यातील जांब जळकोट येथील एका शिक्षक कुटुंबातील हा मुलगा. घरात अत्यंत धार्मिक वातावरण, भिंतीवर देवी देवतांचे फोटो आणि सतत सण वारांचे स्टेटस. हा मुलगा रशियाला गेल्यानंतर तिथल्या भारतीय मुलांसोबत राहू लागला. त्याची प्रचंड धार्मिकता पाहून सुरुवातीला इतरांना तो ब्राह्मण वाटला. मात्र, महाराष्ट्रातील मुलांनी त्याचे आडनाव आणि विभाग पाहून इतरांना स्पष्ट केले की हा मुलगा दलित समाजातील आहे. जेव्हा इतर मुलांनी खात्री केली की तो बौद्धेतर दलित आहे, तेव्हापासून त्याचा इतका छळ सुरू झाला की तो मुलगा प्रचंड नैराश्यात भारतात परत आला. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्या कुटुंबाने त्र्यंबकेश्वरला जाऊन नागबळीची पूजा केली, पण त्याने काहीही साध्य झाले नाही. शेवटी नांदेडमधील काही चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याला समजावून सांगून पुन्हा रशियाला पाठवले.
एवढे होऊनही त्या कुटुंबातील अंधश्रद्धेचा पगडा कमी झाला नाही. मुद्दा हा आहे की, आपण कितीही हिंदू देवी देवतांची पूजा केली तरी समाज आपल्याला हिंदू म्हणून स्वीकारायला तयार नाही. आज 2026 मध्येही वास्तव बदललेले नाही. खेडेगावात आजही काही समाज दलितांचे केस कापायला नकार देतात. शहरांमध्ये सुशिक्षित लोकांना आडनावावरून घरे नाकारली जातात. मग आपण स्वतःला अशा धर्माचे का समजतो जो आपल्याला नाकारतो? आपल्याला महापुरुषांच्या चळवळीतून मिळालेले आरक्षण चालते, पण त्यांचे विचार का चालत नाहीत? आपण बौद्ध समाजाला कट्टर म्हणतो, पण त्यांना एक स्वतंत्र ओळख आहे. राजकारणात आणि समाजकारणात त्यांना त्यांचे स्थान मिळाले आहे. भारतीय जनता पक्षासारख्या पक्षातही सर्वाधिक लोकप्रतिनिधी बौद्ध समाजाचे आहेत, कारण त्यांची एक दबाव गट म्हणून ओळख आहे. याउलट, बौद्धेतर दलित समाजातील डॉक्टर, आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर आपली जात कळल्यानंतर स्वतंत्र व्यवसाय करताना अडचणीत येतात, कारण त्यांना हिंदू समाज पूर्णपणे स्वीकारत नाही.
जात मानणे चुकीचेच आहे आणि बाबासाहेबांची विचारधारा जाती निर्मूलनाची होती. पण आपण आपल्या मुलांना हिंदू आहोत असे शिकवतो आणि पुढे आयुष्यात त्यांना त्याचे जबर फटके बसतात. आंतरजातीय विवाहांमध्येही या समुदायाला अनेकदा नाकारले जाते. हिंदू धर्मात जातीव्यवस्था हाच कणा आहे. संत चोखामेळा कितीही मोठे भक्त असले तरी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. आज आपल्याला मंदिरात जे प्रवेश मिळतात, ते संविधानामुळे आहेत, धर्माच्या उदारतेमुळे नाही. उच्चवर्णीय लोक आजही अशा धार्मिकतेचे प्रदर्शन करणाऱ्या दलितांकडे पाहून उपहासाने हसतात. जर आपण उच्चशिक्षित होऊनही अंधश्रद्धा आणि जुन्याच कर्मकांडांमध्ये अडकून पडणार असू, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? ज्या महापुरुषांनी फुले, शाहू, आंबेडकर, लहुजी साळवे, मुक्ता साळवे आपल्याला माणूस म्हणून ओळख दिली, त्यांना जर आपण स्वीकारणार नसू, तर आपल्याला कधीच स्वतःची खरी ओळख मिळणार नाही. उलट, आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचे अस्तित्वच मिटवून टाकत आहोत.






