१४ ऑगस्ट : पहाटे रेडिओ लावला आणि सकाळी सहा पासूनच विविध सिनेमांतील राष्ट्र प्रेमाची, खास करून सिने कलाकार आमिरखानच्या लगान या प्रसिद्ध सिनेमातील गाणी लागली. अशा गाण्यांचे फक्त तीन-चार दिवसच! फार मागे नाही, फक्त २०१४ पासून एकामागून एक घडलेल्या सा-या घटना डोळ्यासमोर आल्या. दिवस उजाडला आणि हातात तिरंगा घेतलेल्या शाळेतील लहान लहान मुलांच्या मोठ्या मिरवणुका, जीव तोडून दिलेल्या त्यांच्या घोषणा ऐकू आल्या. मधूनच मोठ्या व्यक्तीने दिलेल्या फाळणीविरोधातील घोषणाही ऐकू आल्या! १४ ऑगस्ट, भारताची फाळणी. १५ ऑगस्ट, भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. हजारहून अधिक फूट लांब तिरंगा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उचलून धरायचा वा वर म्हटलेल्या लहान मुलांनी तिरंग्यांच्या मिरवणुका काढायच्या आणि दुस-या बाजूला केंद्र-राज्य सरकारने घोषणा देत सांगायचे, हर घर तिरंगा समजू शकतो. पण, विभाजन विभीषिका स्मृतिदिन! ही काय भानगड? विभाजन विभीषिका स्मृतिदिन अर्थ लागला नाही!
फुले-आंबेडकरांमुळे थोडासा शिकलो असल्याने गुगल आणि डिक्शन-या पाहू लागलो. मग अर्थ लागला. राज्यघटना म्हणून लोकशाहीच मान्य नसणा-या संघ-भाजपने फाळणीचा दिवस विभाजन विभीषिका स्मृतिदिन म्हणून २०२१ पासून साजरा करण्याचे ठरविले. केंद्रातील संघ-भाजप सरकार संस्कृत हिच खरी भाषा मानणारे आहे. हिंदुत्व, सामान्य हिंदू माणूस व राष्ट्रीयत्वाची उठता बसता भाषा करणा-या मा. पंतप्रधान यांनी चिमूटभर असामान्य समूहाचा अहं ब्रम्हास्मिवाल्यांचा विभीषिका हा शब्द वापरला आहे. हा शब्द व संस्कृत भाषा या सामान्य हिंदू ओबिसींबरोबरच जैन, लिंगायत, बौध्द, मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन, आदी ९०% हून अधिक लोकसंख्येलाही कळत नाही. यातच संघाचे राजकारण दिसून येते आणि सारा उलगडा होतो. मुळात विभीषिका याचा हिंदी अर्थ त्रास, भय वा डर दिखाना! आतंक, खौफ असेही समानार्थी शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचे महत्त्व, पर्यायी समानार्थी शब्द हे विषयांनुसार असतात. इंग्रजीतील अर्थ awfulness, dreadfulness, horridness, terribleness. विभीषिका हा शब्द मराठीत सापडला नाही, म्हणून जेव्हा गुगलवर वाक्यातील अर्थ पाहिला तेव्हा दिसले, तहेरी अजार संपूर्ण इस्लामवादी विभीषिका का प्रतिनिधीत्व करता है. एक ऐसा सुनियोजित मुसलमान जिसका धर्म उसे गैरमुसलमानों को मारने की खुले आम प्रेरणा देते है. इ.इ.याचा अर्थ या मोहीम अंतर्गत मुसलमान म्हणजे क्रूरता, दहशत, हिंसा, पर धर्मीय म्हणजे हिंदूंना ठार करणारे असे अमानव! ही प्रतिमा शाळेतील मुलांपर्यंत जायला वेळ लागणार नाही.
काँग्रेसच्या नेत्या श्रीम. इंदिरा नेहरू-गांधी यांच्या राजवटीत स्त्रिया, अनु. जाती- जमाती-भटके-विमुक्त समूहावर जे अत्याचार होत होते. वंचित समूहांच्या घर, रोजगार, शिक्षण, आदि प्रश्नांनी थैमान घातले होते. त्यावेळी पंधरा-अठरा वयातील विद्यार्थी – तरुण – तरुणी जोर जोरात घोषणा देत असायचे. इंदिरा तेरे राजमें, औरत नंगी होती है, I औरत नंगी होती है, बेशरमकी बात है I आज संघ-भाजप राजवट तर या संदर्भात समृध्दी महामार्गाने जात आहे, असेच म्हणावे लागतेय!
तुम्ही म्हणता, हर घर तिरंगा! आम्ही तर म्हणतो, आमच्या हृदयातच तिरंगा!! पण–? आम्हाला पुढे तर मुस्लीम, वंचित बहुजनांचे मरणच दिसत आहे! आणि म्हणावे लागत आहे, जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो! अशीही गाणी सकाळीच लागत आहेत. म्हणून आम्हाला किमान जगून, संघ-भाजपच्या एकाधिकारशाही-एकचालकानुवर् ती राजवट आणि विचारांविरोधात संघर्ष करावा लागणारच आहे.
या पार्श्वभूमीवर भारत आणि तत्कालीन पश्चिम पाकिस्तान-पूर्व पाकिस्तान अशा फाळणीच्या संदर्भात विभाजन विभीषिका स्मृतिदिन म्हणत असताना नुकतेच महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १२ ऑगस्ट ला वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयात हिंदीतून भाषण केले. सेना नेते मा. उद्धव ठाकरे, कार शेड आणि एक दोन मुद्दे सोडल्यास भाषणातील बाकी मुख्य मुद्दे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाषा-संस्कृती-परंपरा यावरच होते. हे Live भाषण ऐकताना संघाचे कट्टर स्वयंसेवक, प्रचारक बोलत आहेत असेच वाटले. रा.स्व.संघाचे सरसंघचालक मा.स.गोळवलकर गुरूजी यांच्या Bunch of Thoughts – विचारधन या ग्रंथातील विचार सांगत होते,—–भारतातील सर्व प्रादेशिक भाषांचा उगम संस्कृत मधून झाला आहे. तिला दहा हजार वर्षांची परंपरा आहे. पुढे त्यांनी जे सांगितले त्याचा आशय असा आहे की, मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातही याचेच प्रतिबिंब आहे. सध्या महाराष्ट्रात भाजप-शिंदे शिवसेनेचे युती सरकार आहे. पण, शपथविधी झाल्यापासून आतापर्यंत जे उघडपणे सर्वांना दिसतेय, ऐकू येतेय, त्यावरून तरी या युती सरकारला मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्रीच चालवताहेत असेच वाटते! याचाच अर्थ रा. स्व. संघाच्या विचारांनुसारच फडणवीस राज्य चालवत आहेत आणि वर्धा येथील वरील भाषण ऐकल्यावर तर नक्कीच झाले! आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना प्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देवून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्व काही राष्ट्रवादी पक्षच पाहत होता. तसेच आता चालले आहे! ब्राह्म-क्षत्रियांचा चाणाक्ष राजकीय डाव!!
प्रत्यक्षात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करताना हे सारे पाहिल्यावर म्हणावे लागतेय, या निमित्ताने संघ-भाजप सरकार कुणा कुणाला त्रास, भय वा भीती दाखवित आहे? आतंक, खौफ निर्माण करीत आहे?
याचेच प्रतिबिंब नुकतेच नवे संसदभवन सेंट्रल व्हिस्टा वर बसवलेल्या सिंहांच्या मुद्रेत दिसते. मूळात भारताचे बोधचिन्ह-राजमुद्रा हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी-२६ जानेवारी १९५० रोजी ही मुद्रा स्वीकारली गेली. मूळ मुद्रेतील सिंह अभय देत आहेत. सुंदरतेचे प्रतीक आहेत. ही राजमुद्रा भारतातील एका महान समतावादी परंपरेचे प्रतीक आहे. निर्भयतेचे प्रतीक आहे.
याउलट, सेंट्रल व्हिस्टावर बसवलेले सिंह भय व आक्रमक मुद्रेतील आहेत. ही दुसरी समांतर परंपरा आहे. ही ब्राह्मणी संघाचीच प्रतिमा आहे ना? २०१४ साली सत्तेवर आल्यापासून तर भाजप सरकारच्या कालखंडात हेच वर्तन केवळ मुस्लीम समूहापुरतेच नाही, तर स्त्रिया, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती, बौध्दांबाबतही अनुभवत आहोत. काही कृती या सरळ सरळ हिंसेच्या, तर काही अहिंसक हिंसाचारी आहेत. CAA, NRC, NPR, Atrocity Act, OBC-VJNT व अन्य समूहांच्या राखीव जागांबाबत तर मांजर जसे गरीब उंदराला खेळवत खेळवत, शेवटी तो उंदीर थकला की, त्याला गिळून टाकते, तसे भयावह अनुभव येत आहेत!
त्याला अनुसरून केंद्र सरकारने एक “अजेंडा” ठरवला आहे. केंद्रातील भाजप सरकारने फाळणीची शोकांतिका यावर विभाजन विभीषिका स्मृतिदिन या नावाने इंग्रजी, हिंदीमध्ये एक चित्रमय प्रदर्शन प्रसिध्द केले आहे. १४ ऑगस्ट २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले होते, ते या चित्रमय प्रदर्शनापूर्वी दिले आहे. यात मोदी म्हणतात, देशके बटवारेके दर्द को कभी भुलाया नहीं जा सकता I नफरत और हिंसा की वजहसे हमारें लाखो बहनों और भाईयों को विस्थापित होना पडा और अपनी जान तक गंवानी पडी I उन लोगोंके संघर्ष और बलिदान की याद में १४ अगस्त को विभाजन विभीषिका स्मृति दिवस के तौर पर मनाने का निर्णय लिया गया है I
५२ पानांच्या या प्रदर्शनाच्या शेवटच्या पानावर महात्मा गांधीजींचे शनिवारच्या प्रार्थनेतील एक विधान दिले आहे. रविवार, दि. १४ सप्टेंबर १९४७ च्या द हिंदूस्थान टाइम्स वीकली या साप्ताहिकातील वाचता न येणारी अस्पष्ट बातमी देवून म्हटले आहे, —-गांधी ने लोगोंसे कहा कि कानूनके संचालन में सरकार को सहयोग करें और उसे अपने हाथों में न लें Iपरंतु दुस-या बाजूला महात्मा गांधींची खूप बदनामी सुरू आहे. फाळणीला जबाबदार गांधीच आहेत. त्याचबरोबर हे प्रदर्शन पाहून व यातील मजकूर वाचल्यावर पाकिस्तानबरोबर तमाम मुस्लीम समूहाविषयी कमालीचा विद्वेष निर्माण होणार यात शंकाच नाही. कायम युध्दजन्य मानसिकता व वातावरण निर्माण केले जाईल. तशी सुरुवातही झाली आहे. आधीच पहिलीच्या पाठ्यपुस्तकांपासून अखेरपर्यंतच्या भाषा, इतिहास, भूगोल, आदी विषयांतून मुस्लीम, वरील सर्व वंचित समूह व त्यांच्या प्रश्नांविषयी कमालीचा राग, घृणा निर्माण केली गेली आहे. आता तर संघ-भाजपाच्या सर्व दूर पसरलेल्या सत्तांमुळे व आताच्या कार्यक्रम-उपक्रमांतून विद्वेषाचा कडेलोट होणार आहे आणि याचे टोक वर उल्लेखिलेल्या महान परंपरेशी नाते सांगणारी राज्यघटना बदलायची आहे! संघ-भाजपचे सारे आधीच ठरले आहे. नारायण राणे, विखे, आदी माजी कॉंग्रेसजन कितीही मोठी घराणी भाजपकडे गेलीत तरी भाजप सत्तेचे मुंडके संघाच्याच हातात राहणार आहे. त्यांना फक्त दाखवायचे आहे, ते केवळ ब्राह्मणी समूहांचीच सत्ता चालवत नाहीत, तर भाजप निमित्ताने राजकारणाचा बाह्य चेहरा मोहरा शिंदे-विखे-राणे-देशमुख-मोहिते-पाटील-पाचपुते, इ. समोर करत राहतील. राजकीय चकवा देत रा हातील.
लोकसभा निवडणूक आज झाली तर काय? यावर नुकतीच इंडिया टुडे आणि सी व्होटरने एक पा हणी केली आहे. त्यानुसार भाजपच्या लोकसभेतील जागा घटू शकतात ,असे दिसून आले आहे. महाराष्ट्रात ४५ जागांचे स्वप्न पा हणा-या भाजपला धक्का बसेल, असेही दिसून आले आहे. कॉंग्रेसप्रणीत UPA ला ३० ,तर भाजपला १८ जागांचा अंदाज सांगितला आहे. ईडी, महागाई, जातीय-धार्मिक दंगली-तणाव, आदी संघ-भाजपच्या खास कार्यक्रमांमुळेही काही प्रमाणात भाजप सरकारविरोधी मत गेलेले या पाहणीत दिसते. कॉंग्रेस तर नेहमीप्रमाणे वाटेवर डोळे लावून बसलेली असतेच. म्हणून तर कॉंग्रेस कधी फारसे स्वतंत्र, स्वाभिमानी राजकारण करणा-यांना खिजगणतीतही ठेवत नाही. तोच अखेर पर्याय हाच त्याचा तोरा असतो आणि किमान एक तास तरी पंतप्रधान व्हायचे महान राष्ट्रवादी स्वप्न बाळगून काहीजण तरंगत आहेत, मस्त्या करत आहेत!
वर उल्लेखिलेल्या पाहणीवरून प्रस्थापिताचे विरोधक म्हणून फुले-आंबेडकरी प्रवाहाने हुरळून जाता कामा नये. सतत म्हणतो तसे, सर्वांच्या बाबतीत राजकीय चमत्कार घडताना दिसतील. पण स्वतंत्र, स्वाभिमानी असे वंचित बहुजनांचे सच्चे फुले-आंबेडकरी सत्तेचे राजकारण करणा-यांबाबत असे काहीच चमत्कार घडणार नाहीत. त्यांना राब राब राबूनच हक्काची सत्ता मिळणार आहे.
पण ,या पाहणीनंतरही संघ-भाजप अजिबात हार मानणार नाही. त्यांच्या १९२५ च्या पोतडीतून आतासारख्या ब-याच बाबी ते बाहेर फेकणार आहेत! त्यांचा टार्गेट मराठा नाही, तर वंचित बहुजन आहे आणि मुस्लिमांना नामोहरम करून सोडणार आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी हर घर तिरंगा यावर म्हटले आहे, हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वांत काळा दिवस म्हणून साजरा करण्याचे त्यांचे पाप धुवून काढण्याचा रा.स्व.संघ आणि भाजप चा प्रयत्न आहे.
१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीच्या लाल किल्यावर राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर सलग नवव्यांदा देशाला उद्देशून भाषण केले. सर्व स्वातंत्र्यविरांचे स्मरण केले. त्यानंतर १४ ऑगस्टला भारताच्या फाळणीचा स्मृतिदिन जड अंत:करणाने साजरा केल्याचेही सांगितले. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत पुढील २५ वर्षांसाठी पांच संकल्प केले. पहिला-विकसित भारत असेल, दुसरा-गुलामगिरी नष्ट, तिसरा-कालबाह्य वारसा सोडून नवीन वारशाचा अभिमान, चौथा-देशात एकता असावी, कामगारांचा सन्मान केला पाहिजे आणि पाचवा-नागरिकांचे कर्तव्य. वीज पुरवठा शासनाचे कर्तव्य, पण नागरिकांनी किमान एक युनिट वापरणे हे त्यांचे कर्तव्य, पाणी बचत हे कर्तव्य, महिलांचा आदर करणे, इ.इ.
संघाचे एकनिष्ठ सेवक असलेल्या पंतप्रधानांनी ७५ व्या वर्षांचा टिकात्मक ;पण वस्तुनिष्ठ आढावा अजिबात घेतला नाही. कदाचित त्यांची तशी तयारी नसावी वा जुने नाणे तसेच पुढे किती चालेल याची चिंता असावी! पण मागील नऊ वर्षांत पत्रकार व टिव्ही. चॅनल्सला सामोरे जायची हिम्मत नसलेल्या पंतप्रधानांना याचा आत्मविश्वास नसावा!! नेहमीची सवय लागलेल्या भुसभूशित भाषणांसारखेच हेही भाषण वाटले. किंबहुना भाषणाच्या अखेरीस त्यांना सापडलेले तीनच मुद्दे विचारात घेऊ. संपूर्ण विसंगतीपूर्ण असे ते मुद्दे होते. महिला सन्मानाची बात केली गेली. मागील नऊ वर्षांत पूर्वस्पृश्य मजूर कुटुंबांची दिवसाढवळ्या भर गावातून नग्न धिंड काढली गेली, तुमच्याच योगी मुख्यमंत्र्यांच्या राज्यात मनिषा वाल्मिकी या अशाच कुटूंबातील तरुणीवर बलात्कार व खून झाला, मुस्लीम समूहातील लहान मुलीला ठार मारल्याची बातमी, रोहित वेमुलाची हत्या, डॉ. तडवी तरुणीची आत्महत्या, भटके-विमुक्त समूहातील साधूंची हत्या, इकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच राजस्थानमधील इंदर मेघवाल हा अनु. जातीतील लहान विद्यार्थी हेडमास्तरांसाठी राखीव भांड्यातील पाणी प्यायला म्हणून बेदम मारहाण केली व त्यात तो मरण पावला. छैल सिंह हा तरुण, उ च्च वर्णीय मास्तर ब्राह्म-क्षत्रिय वर्चस्वाची भावना सोबत घेऊन नोकरी करत आहे. भारतातील नोकरशाहीतील बहुसंख्य माणसे अशीच मानसिकता घेऊन निवृत्त होत आहेत. ही मानसिकता व व्यवस्था (Religious Notion) बदलणारा कोणताही परिणामकारक कायदा, प्रबोधन व संघर्षात्मक कार्यक्रम नाही. तोपर्यंत अशी प्रकरणे घडतच राहणार आहेत. काँग्रेस वा संघ-भाजपचे राज्य असो! राजस्थानमध्ये ज्या पक्षाचे राज्य त्याच्या विरोधी पक्षाकडे हा हेडमास्तर जाणार हा आजवर ठरलेलाच सामान्य व्यवहार आहे! अशा अनेक घटना सांगता येतील. यावर भाजपच्या सन्माननीय मं त्र्यांनी कशी, किती मुक्ताफळे उधळली? अमृत महोत्सवी वर्षात शेवटच्या माणसाच्या सन्मानाच्या याच गोष्टी आहेत का?
७५ वर्षांतील दोनच मुद्दे त्यांना महत्त्वाचे वाटले. भ्रष्टाचार व घराणेशाही! वास्तविक हे दोन्ही मुद्दे त्यांचे नाहीत. मागील ४७ वर्षांत सर्वांनी चोथा करून फेकलेले मुद्दे आहेत. त्यापुढची त्यांची धोरणेही आखली गेली आहेत. सामान्य कष्टकरी, वंचित समूहांना पदोपदी जाणवणा-या भ्रष्टाचाराला तोंड द्यायला ते समर्थ आहेत. त्यासाठी पंतप्रधानांनी असा अमूल्य दिवस व वेळ खर्ची घालायची अजिबात गरज नव्हती ,असे वाटते. मुख्य सवाल आहे वरील भ्रष्टाचार नाही, तर या समूहांना लुटणारी आर्थिक धोरणे, सामान्यांना उदध्वस्त करणारी धोरणं जबाबदार आहेत. त्याविषयी संघ-भाजपचे विचार मांडले असते, तर जगाला मार्गदर्शक ठरले असते.
नेहमीप्रमाणे पंतप्रधानांच्या भाषणातील शब्द व त्याला समानार्थी शब्दांचा महापूर येत असतो. १५ ऑगस्टचे भाषण वंचित समूहांच्या संदर्भात माफ करा फसव्या फापडपसाऱ्यात प्रथम दर्शनी क्षणभर छाती फुलवणारे वाटते. परंतु छातीतील हवा गेली की, यातील फसवी बाब समजून येते.आणखी एक फसवी ८ शब्दांची घोषणा ऐकू येते, अमृत कालकेलिए आवश्यक आहे, **जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान!सवाल येतो कोणते अमृत? आजवर माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि त्यांनी उच्चारलेले चार शब्द जय जवान, जय किसान माहीत होते! १९६४ नंतर आज बरोबर ५८ वर्षांत काँग्रेस आणि संघ-भाजप सरकारांनी जवान आणि शेतकऱ्यांचे अनेक दशकांपासून सडत ठेवलेले काहीतरी प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केला का? नुसते युद्ध साहित्य खरेदी करून आणि शेजारच्या छोट्या राष्ट्रांना भीती दाखवायला सतत युध्द सराव करून जवानांचे प्रश्न सुटत नाहीत ना औद्योगिक वस्तूंच्या तुलनेत शेती मालाला भाव मिळत? याबाबत संघ -भाजप-सर्व काँग्रेस एकच आहेत. त्यांची मिली भगतच दिसते!
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे CRPF जवानांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला होतो आणि ४५ निरपराध जवान ठार होतात की केले जातात? चौकशीची हाक ना बोंब!
आता या जोडीला जय विज्ञान, जय अनुसंधान! मोदींनी आणले आहे. पण हे कोणते विज्ञान? कोणते संशोधन? संघ-भाजप तर सतत म्हणतोय, त्यांच्या वैदिक परंपरा, वाड.मयात सारे विज्ञान सामावले आहे. पाणी शंभर डिग्रीला उकळते, न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिध्दांत, टेस्ट-ट्यूब बेबी, इतकेच काय संत तुकाराम यांना आकाशात निळ्या पट्ट्याच्या पलीकडे त्यांचे पेट्रोल विरहित पुष्पक विमान सुखरूप पोचवते!, आदी सारे शोध जगाच्या पूर्वी फक्त यांच्या ब्राह्मणी वर्ण-जातीने लावले होते! म्हणून त्यांच्या ७/१२ वर साऱ्या पृथ्वीसह अख्ख्या विश्वाची पुरुषी मालकी सांगताहेत!
पर्यावरणाचा उल्लेख करता, मग नैसर्गिक संसाधनांची लयलूट करणा-या अडाणी, अंबांनींचे काय करायचे? त्यांच्यावर सरकारचे जरासे तरी नियंत्रण आहे का? त्याचप्रमाणे महात्मा गांधींसमोरचा शेवटचा माणूस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तमाम वंचित समूह याचा विचार कधी, कसा होणार आहे? मला वाटते पुढच्या शताब्दी वर्षापर्यंत वाट पा हवी लागेल, असेच वाटू लागलेय. देशाच्या चारी बाजूला वणवा पेटला आहे. यातून भारत कोणत्या 5-G तंत्रज्ञानाने विझवणार आहे?
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत बोलायला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री, संघ स्वयंसेवक सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. जोरजबरदस्तीने त्यांना हवे तेच राष्ट्रप्रेम दाखवायला सांगत आहेत! त्यावर चहूकडून विरोध होताच जबरदस्ती नसून ऐच्छिक असल्याचा खुलासाही त्यांनी केला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनीही अशा टिकेचे स्वागतच केले आहे! पाहू या!!
शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१९५७