संजीव चांदोरकर
अमेरिकेतील शेअर मार्केटचे बाजार मूल्य ५५ ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यातील फक्त पहिल्या १० कंपन्यांचे बाजार मूल्य एकूण बाजार मूल्याच्या ४० टक्के आहे. म्हणजे जवळपास २२ ट्रिलियन डॉलर्स. (भारतातील सर्व कंपन्यांचे मिळून बाजार मूल्य ५ ट्रिलियन डॉलर्सच्या आत मध्ये आहे).
अमेरिकेतील एकूण शेअर्स पैकी ८७ टक्के शेअर्स देशातील फक्त १० टक्के नागरिक गुंतवणूकदारांकडे आहेत. गेल्या पाच वर्षात, ज्या प्रमाणात शेअर्सचे भाव वाढले त्याप्रमाणात या दहा टक्के नागरिकांची संपत्ती देखील वाढली आहे.
अमेरिकेतील फक्त तीन (फक्त तीन! ) अब्जाधीशांकडे जेवढी संपत्ती गोळा झाली आहे ती अमेरिकेतील तळातील अर्ध्या नागरिकांच्या एकूण संपत्तीपेक्षा देखील जास्त आहे.
अमेरिकेतील सर्व नागरिकांचे मिळून जेवढे वार्षिक उत्पन्न असते त्यातील ४५ टक्के वाटा फक्त वरच्या एक टक्का व्यक्तींकडे जातो.
अमेरिकेतील मोठ्या कॉर्पोरेट मधील मुख्याधिकाऱ्याला मिळणारे वार्षिक पॅकेज त्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला मिळणाऱ्या सरासरी मिळकती पेक्षा ३५० पट जास्त असते.
अमेरिकेत संपत्ती (wealth) आणि कुटुंबांची मिळकत (income) या दोन्हींमध्ये असणारी सद्यकालीन आर्थिक विषमता न गेल्या शंभर वर्षात बघितलेली नव्हती. (आधी एवढी सविस्तर आकडेवारी उपलब्ध देखील नव्हती).
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात “ऑलिगार्क”, म्हणजे मूठभर श्रीमंत नागरिकांची सत्ता स्थापन झाली आहे असे म्हटले जाते ; वर वर्णन केलेलेच ऑलिगार्क आहेत.
फक्त मूठभर अमेरिकन नागरिकांच्या हातात सातत्याने गोळा होणारी महाकाय संपत्ती, आणि त्याच्या जोरावर सारा देश मूठभर “ओलिगार्क”च्या हातात जाणे हा आजच्या अमेरिकेत हा सर्वात मोठा आर्थिक ज्वलंत प्रश्न बनला आहे.
टोकाच्या आर्थिक विषमतेतून मुठभर लोकांची हुकूमशाही का तयार होत असावी ? कारण त्यांना माहित असतं की टोकाच्या आर्थिक विषमतेतून टोकाचा असंतोष तयार होत असतो. त्याला दडपण्यासाठी त्यांना हुकूमशहाची गरज लागते.
देशात टोकाची आर्थिक विषमता नसणे ही त्या देशात खरीखुरी लोकशाही नांदण्याची पूर्वअट आहे. नेहमीच. म्हणून लोकशाहीच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांनी आर्थिक विषमता कमी करणाऱ्या कार्यक्रमाशी देखील जोडून घेतले पाहिजे. या दोन भिन्न गोष्टी नाहीच आहेत.
अमेरिकेत नक्की काय सुरु आहे याची माहिती का घ्यायची ? तर आपल्या भारतात काय सुरु आहे आणि भविष्यात काय होऊ शकते याची राजकीय अंतर्दृष्टी यायला मदत होते म्हणून.
भारत अमेरिकेच्या वाटेवर चालत आहे हे नक्की. याचे महत्त्वाचे कारण भारतातील धोरणकर्ते, ऑपिनियन मेकर्स, मध्यमवर्ग यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था, अमेरिकन समाज यांचेच मॉडेल प्रमाणभूत मानले आहे. गेली अनेक दशके. एवढे की त्यांना बारकाव्यात जाऊन अमेरिकेबद्दल माहिती घेण्याची गरज देखील वाटत नाही. ( म्हणजे तुम्हाला चीनचे मॉडेल प्रमाणभूत असावे असे म्हणायचे आहे अशी नेहमीची व्हॉट अबाउटरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा).
भारतात देखील टोकाची आर्थिक विषमता आणि मूठभरांची सत्ता हातात हात घालून वेगाने पुढे येत आहेत. अमेरिका बरीच पुढे गेली आहे, तुलनेने भारत मागे आहे एवढाच काय तो फरक.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails