विद्रोह म्हणजे बंड! जेव्हा जेव्हा अन्याय, जुलूम, छळ यांचा अतिरेक होतो, आता सहन करणे शक्य नाही असे जेव्हा माणसाला वाटते तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. आपली प्रतिष्ठा, स्वाभिमान जेव्हा आपल्या जिवितापेक्षा महत्वाचे वाटायला लागतात तेव्हा माणूस बंड करतो. प्रत्येकाची पद्धत आणि माध्यम वेगवेगळे असते. हा विद्रोह प्राचीन काळापासून साहित्यातून माध्यमातून देखील व्यक्त झाला आहे. हिंदीत कबीर आणि मराठीत तुकारामांनी अन्याय, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, परंपरा यांची जराही हयगय गेली नाही. हिंदी उर्दू गझलेत मीर, गालिब पासून समाकालीन शायर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारताना दिसतात. मराठी कवितेत स्वातंत्र्योत्तर काळात नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार यासारख्या अनेक कविंनी शोषित-पिडीत वर्गाची वेदना आपल्या कवितेतून मांडली. मराठी गझलेतही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध सुरेश भटांसह अनेक गझलकारांनी बंडाचे निशाण हाती घेतलेले दिसून येते.
ज़ाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर
या वो जगह बता दे जहाँ पर ख़ुदा न हो
हा शेर कोणी लिहिला माहित नाही. शेरातील मद्यसेवनाचे समर्थन कधीही करता येऊ शकत नाही. परंतु या शेराला अनेक पदर आहेत. मद्य इस्लामला वर्ज्य आहे. तरीही शायर धर्मोपदेशकाला मशिदीत बसून मद्य सेवन करण्याची परवानगी मागतो कारण त्याच्या मते ख़ुदा सर्वव्यापी आहे. हा वरवरचा अर्थ असला तरी ते एक प्रकारे प्रचलित धार्मिक आस्थांना दिलेले आव्हानाच असे म्हणावे लागेल. हा शेर एका अर्थाने विद्रोहीच आहे. अशा प्रकारे धर्माविरुद्ध बंड करणारे अनेक शायर उर्दूत सापडतात.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है
ही उर्दू शायर बिस्मिल अज़ीमाबादी यांची रचना क्रांतीकारक राम प्रसाद बिस्मिल यांच्यामुळे स्वातंत्र्य संग्रामात प्रकाशझोतात आली. या रचनेत जनसामान्यांच्या इंग्रजांच्या अन्याय-अत्याचाराविरोधातल्या भावना व्यक्त झाल्या आहेत. राजकीय व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह म्हणून या गझलेकडे नक्कीच पाहता येईल. स्वातंत्र्योत्तर काळातील एक सुप्रसिद्ध शायर दुष्यंत कुमार यांच्या केवळ ५२ रचना असलेल्या ‘साये में धुप’(१९७५) या संग्रहात विद्रोह ठासून भरला आहे. दुष्यंत कुमारांना फार थोडे आयुष्य लाभले परंतु ‘साये में धुप’ मधील प्रत्येक रचना आजही मानवतावादी लढ्यात सामील होणा-या प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर असते.
हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए
विद्रोही म्हणजे कोणी दोन शिंगे, चार हात असलेला व्यक्ती नाही. विद्रोहाचे मुळ मानतावादात आहे. रस्त्यावर उतरून जाळपोळ करणे, जिवित आणि वित्तहानी करणे विद्रोहाच्या व्याख्येत कधीच बसत नाही. विद्रोह करणारा व्यक्ती शांत आणि संयमी असतो. विद्रोहात सूड, संताप व तिरस्कार या अतिरेकी भावनांना स्थान नसते. प्रस्थापित व्यवस्थेवर बंड पुकारणा-याचा संताप नक्कीच असतो. परंतु त्या व्यवस्थेत सामील असलेल्या माणसांविरुद्ध त्याचा लढा नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा होय. त्यांचा लढा ब्राम्हणांविरुद्ध कधीच नव्हता. त्यांचे अनेक सहकारी ब्राम्हण होते. खरे म्हणजे त्यांचा लढा होता तो ब्राम्हणी प्रवृत्तींविरुद्ध ! विद्रोही व्यक्ती प्रवृत्तींच्या विरोधात लढतो. अशा प्रवृती दर्शवणारा उर्दूचे सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा एक शेर आहे –
अंडा मछली छु कर जिनको पाप लगे
उनका पुरा हाथ लहू में डुबा है
सोवळे-ओवळे पाळणा-या पुण्याच्या खोलेबाईंसारख्या प्रवृत्तींचे वाभाडे काढत शायर म्हणतो मासाहाराच्या नुसत्या स्पर्शाने पाप लागणा-यांचे हात निष्पाप लोकांच्या रक्ताने माखलेले असतात. आपल्या मोलकरणीला तिच्या घरी जाऊन मारहाण करणा-या खोलेबाईंसारख्या प्रवृत्ती माणुसकीवर लागलेला मोठा कलंकच असतात. उपरोक्त शेरात बशीर बद्रांनी अशा प्रवृत्तींचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मराठी गझलेत सुरेश भटांच्या रचनांमधे हळुवार प्रेम भावनेबरोबरच टोकाचा विद्रोह अविष्कृत झाला आहे. त्यांच्या ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ या सारख्या गीतांमधे सुद्धा ताकदीची आव्हानात्मकता आहे. अशा गझला आणि गीते मानवमुक्तीच्या चळवळींमधे केंद्रस्थानी असतात. सुरेश भटांच्या ‘एल्गार’, ‘झंझावात’ या कवितासंग्रहांमधील अनेक रचनांमधे शोषीत-पिडीत वर्गाबद्दलचा कळवळा व्यक्त झाला आहे.
सूर्य केव्हाच अंधरला यारहो
या नवा सुर्य आणू चला यारहो
हे नवे आले फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यारहो
अतिशय संयत भाषेत सुरेश भटांनी वरील ओळींमधून राजकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. दर पाच वर्षांनी नवे लोक सत्तेवर येतात. खूप अपेक्षा ठेऊन जनता त्यांना निवडून देते. पण सत्य हे आहे की एकदा सत्तेवर आल्यानंतर खुर्चीत बसलेल्यांना जनतेचा विसर पडतो. जनतेचा कैदखाना मात्र काही केल्या बदलत नाही. विद्रोही साहित्याची भाषा कशी असावी? हा मुद्दाही नामदेव ढसाळांच्या कवितेच्या भाषेवरून अनेकदा चर्चिल्या गेल्या आहे. नामदेव ढसाळांनी त्यांच्या कवितेतून अश्लिल शिव्यांचा वापर केला आहे. या शिव्या वाचताना पांढरपेशे रसिक अनेकदा नाक मुरडताना दिसतात. भालचंद्र नेमाडे म्हणतात, ‘भाषा सतत वापराने बेचव, बोथट होत असते. साहित्याच्या भाषेतही एकसारख्या वापराने भाषिक रूपांना गुळगुळीतपणा येत राहतो. निळेजांभळे रंग, ‘मोरपंखी’ डोळे, गुलाबी’ गाल, ‘कोवळी उन्हें,’ ‘रम्य प्रभात’ अशा रूपांमधले नावीन्य नाहीसे होते आणि त्यांच्या पिष्टोक्ती तयार होतात. त्यामुळे अनुभव कितीही नवीन असला, तरी अशा जुनाट भाषिक रूपांनी तो संपूर्ण कंगोऱ्यांसह ताजेपणा कायम ठेवून व्यक्त होत नाही. भाषिक रूपांना नवीन अर्थच्छटा प्राप्त करून देण्यासाठी रुढ प्रमाणके मोडणे आवश्यक ठरते’. या दृष्टीने नामदेव ढसाळांच्या भाषेचा विचार केला तर भाषेची रुढ प्रमाणके मोडून संवेदनांना आलेला बोथटपणा दूर करण्यासाठी व्यवस्थेच्या ओझ्याखाली दबून पडलेल्या सामान्य माणसांची बोलीभाषा त्यांच्या कवितेत उतरली आहे. सुरेश भटांनी सुद्धा ‘गांडूळ’, ‘हरामखोर’, ‘भिकारडे’, ‘कुत्रे’ असे शब्द वापरून कवितेची रुढ प्रमाणके मोडली आहेत. थोडक्यात विद्रोह गुळगुळीत भाषेत मांडता येत नाही.
गझलेत वापरली जाणारी भाषा ही अत्यंत संवादी असावी लागते. वाचणा-या, ऐकणा-याला ती आपलीशी वाटली पाहिजे. तेव्हाच जे काही मांडायचे आहे ते थेटपणे रसिकंपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळेच गझलेच्या भाषेत एक विलक्षण नाट्यमयताही असते. अनेकदा गझल म्हणजे नाटकातल्या एखाद्या पात्राने मंचावरून सादर केलेले स्वगतही वाटते. विद्रोही कवितेची भाषा तर संवादी असणे क्रमप्राप्तच असते कारण ज्या वर्गाच्या वेदना मांडल्या जात आहेत त्यांच्याच भाषेत कविता असावी लागते आणि ती थेटपणे व्यवस्थेपर्यंत पोचणे गरजेचे असते.
संवेदना जरा ना प्राणात खोल काही
उरली न सापळ्यांच्या रक्तात ओल काही
तोंडास काय टाळे लावून बैसला तू
सोसू नको मुक्याने तू आज बोल काही
आज मानवी जीवन संवेदनाविहीन होत चालले आहे. माणसामाणसांमधे आपुलकीची ओल दिसत नाही . श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेतील उपरोक्त ओळींमधे ही भावना व्यक्त होत असतानाच ते हे देखील म्हणातात की ‘सोसू नको मुक्याने; तू आज बोल काही’. या ओळींमधली बोलचालीची भाषा रसिकांचे लक्ष वेधून घेते. राऊतांनी सुद्धा त्यांच्या गझलेत कविता आणि भाषेची रूढ प्रमाणके मोडण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. त्यांच्या अनेक गझलांमधून त्यांचा विद्रोही बाणा दिसून येतो.
जानवे घालु नका रे विठ्ठलाला
त्या बिचा-याला स्वतःची जात नाही
म.भा.चव्हाणांच्या या शेरात धार्मिक-सामाजिक स्वरुपाचा विद्रोह दिसतो. शेरामधे आलेले ‘जानवे’ हे प्रतिकात्मक स्वरुपात आले आहे. काही लोकांच्या म्हणन्यानुसार जानवे घालणे विशिष्ट जातीशी संबंधित नसून तो संस्कार आहे. मान्य. पण पुढे प्रश्न विचारावासा वाटतो की या संस्काराचा अधिकार प्रत्येकाला का नाही? संपूर्ण समाज संस्कारीत व्हावा असे संस्कार करणा-यांना का वाटत नाही? त्यामुळेच मभांनी व्यक्त केलेली भावनाही अगदी रास्त आहे. मभांच्या अनेक शेरांमधे सामाजिक जाणिव धारदारपणे व्यक्त झालेली दिसते.
विद्रोही चळवळीच्या केंद्रस्थानी माणूस असतो. भारताचा इतिहास हा समांतर चालणा-या दोन संस्कृतींच्या संघर्षातून घडलेला आहे. एक म्हणजे विषमतावादी संस्कृती आणि दुसरी विषमतेला विरोध करणारी विद्रोही-समतावादी संस्कृती होय. श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विचारसरणीचा निर्णायक पराभव व समतावादी जगाची निर्मिती हे विद्रोही-समतावादी संस्कृतीचे ध्येय राहिले आहे. त्यामुळेच जातिव्यवस्थेचा अंत, स्त्री-पुरुष विषमतेचा अंत आणि संपूर्ण शोषणमुक्ती ही उद्दीष्टे विद्रोही विचारसरणीच्या संस्कृतीने नेहमीच समोर ठेवली आहेत. आणि याचेच प्रतिबिंब साहित्यातून उमटत राहते. विद्रोही जलसाकार वामनदादा कर्डकांच्या रचना वाचताना हे प्रकर्षाने जाणवते –
तो भीम जसा लढला तो लोक लढा लढवा
जा ठायी ठायी ठायी जा माणूस नवा घडवा
हा उंच पदी आहे, तो नीच पदी आहे
या नीच प्रणालीला जा सूळावर चढवा
विषमतवादी प्रणालीला सुळावर चढवले गेले पाहिजे. या जगात सगळे मानव समान आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करणा-या विषमतावादी विचारांना मुठमाती देण्याची गरज आहे. गरीब आणि श्रीमंतामधली दरी मिटली पाहिजे ही भावना ब-याचवेळा उर्दूप्रमाणे मराठी गझलेतही व्यक्त झाली आहे. मसूद पटेल म्हणतात –
बंगल्याची रोज जी आरास आहे
झोपड्यांचा चोरलेला घास आहे
भारतात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे. मोठमोठया इमारंतीमधे दिसणारी रोषणाई कोणाचे तरी शोषण करून केलेली असते. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत देश कधी ‘विश्वगुरु’ बनुच शकणार नाही. अनेकदा विद्रोही साहित्य हे तात्कालिक स्वरूपाचे असते असा आरोप केला जातो. त्यात तथ्यही आहे. परंतु भारतचा इतिहास आणि आजची परिस्थिती पाहता असे वाटते की विषमतेची मुळे भारतीय समाजात खोलवर रुजली आहेत. जातीयवादी मानसिकता अधिक बळकट होत चालली आहे. त्यामुळे विषमतेच्या विरोधात लढणा-या प्रत्येकाने केवळ पोटापाण्याच्या संघर्षात अडकून न राहता मराठी गझलेसह साहित्याच्या प्रत्येक प्रकाराचा वापर शस्त्रासारखा करणे काळाची गरज आहे.
अमोल बी शिरसाट
………………………………………………………….
लेखक मराठी गझलकार व गझल अभ्यासक आहेत.