अकोला : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही विचारतोय की, महाविकास आघाडीचा मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होणार नाही. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना विचारायला हवे की, आपण युतीच्या विरोधात आहात का ? जर नाही, तर प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना दिली, तर युती होणार कशी ? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि राहील. असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीच्या दोन बैठका झाल्या होत्या. त्यात त्यांनी ‘समान किमान कार्यक्रम’ या विषयाला प्राधान्य दिले होते. याबाबतची स्पष्टोक्ती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. त्यात त्यांनी जागावाटपाचा मुद्दा हा दुय्यम असल्याचेही म्हटले होते.
आता महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.