श्रामणेरी-बौद्धाचार्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात
वाशी : धर्माच्या आधारावर निर्माण झालेले देश दीर्घकाळ टिकू शकले नाहीत; मात्र धर्मनिरपेक्ष संविधानाच्या बळावर भारत आजही एकसंध आणि मजबूत आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) नवी मुंबई जिल्हा महिला शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य महिला धम्म परिषद, श्रामणेरी-बौद्धाचार्या व उपासिका प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम बुद्ध प्रतिष्ठान विहार प्रांगण, सेक्टर १५, वाशी येथे पार पडला.
यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यदिन जसा महात्मा गांधींना समर्पित आहे, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित व्हावा, ही काळाची गरज आहे. पाकिस्तान, बांगलादेशसारखे धर्माधारित देश आज अस्थिरतेला सामोरे जात आहेत; परंतु भारत धर्मनिरपेक्ष संविधानामुळे टिकून आहे.
मात्र संविधानविरोधी शक्ती सत्तेत असल्याने संविधान बदलण्याची भाषा केली जाते आणि हिंदू राष्ट्राची घोषणा केली जाते, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आज देशात संविधान समर्थक आणि संविधानविरोधक असे दोन प्रवाह निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहा दिवसीय श्रामणेरी-बौद्धाचार्या प्रशिक्षण शिबिराच्या संघनायिका भिक्खुणी आर्या संघमित्रा होत्या.
कार्यक्रमात ॲड. एस. के. भंडारे (ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांनी मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेत महिलांना स्वतंत्र नेतृत्वाची संधी देण्यात आली असून राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर स्वतंत्र महिला कार्यकारिणी स्थापन करून खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात प्रथमच महिला जिल्हा शाखेने एकाचवेळी प्रशिक्षण शिबिर, धम्म परिषद व रॅलीचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व महिलांचे अभिनंदन केले.
धम्म परिषदेत तीन महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सुप्रिया कासारे – बौद्ध धम्मामध्ये महिलांची प्रगती : काल, आज आणि उद्या
विशाखा निळे – संविधानामुळे महिलांना मिळालेले हक्क व अधिकार
उज्ज्वला खरात – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली
या कार्यक्रमास सुषमा पवार, डॉ. अनंत हर्षवर्धन, बी. एच. गायकवाड गुरुजी, ॲड. डॉ. एस. एस. वानखडे, रागिणी पवार, भारती शिराळ, स्वाती शिंदे, चंदा कासले, विलास कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या प्रमुख निवासी शिक्षिका म्हणून स्वाती गायकवाड यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा कांबळे होत्या. सूत्रसंचालन ज्योती जाधव व संजय झनके यांनी केले.
शिबिरात १३ जिल्ह्यांतील ३३ महिला सहभागी झाल्या. परिषदपूर्वी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विशेष रथातून समता सैनिक दलाच्या बँड पथकासह भव्य रॅली काढण्यात आली. तसेच विविध शाखांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला-पुरुषांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






