नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेमुळे व्यथित झालेल्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांनी दिले.
बाळासाहेब आंबेडकरांशी फोनवर संवाद –
या संवेदनशील भेटीदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी थेट पीडित कुटुंबियांशी फोनद्वारे संवाद साधला.यावेळी त्यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली आणि पक्षाकडून पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. पीडितांना न्याय मिळेपर्यंत पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी डोंगराळे गावात एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला अटक फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्यासाठी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कोअर कमिटी सदस्य आणि सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप, कैलास लोहार, संदीप महिरे, युवराज मगरे, दीपक उशीरे, सचिन अहिरे, शशिकांत पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





