प्रकाश आंबेडकरांनाच खरा प्रकाश दिसला प्रा.एस.टी. चिकटे, दादमहल, चंद्रपूर
(प्रास्ताविक : जेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जन्माला आला नव्हता; तेव्हा भारिप बहुजन महासंघाचे चंद्रपूरचे एक प्रमुख कार्यकर्ते प्रा. एस.टी. सरांसारखे सहकारी स्थानिक दैनिकं, अनियकालिकात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत होते. आणि पक्ष-संघटनेच्या निर्णयानुसार कृतीही करत होते. आज हा सोशल मीडिया जनसंपर्क व जनसंवादाचे एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे आले आहे. याने जसे फायदे होत आहेत; तसे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक तोटे आहेत. असे वृत्तपत्रीय लिखाण कमीच होत गेले. याचे सर्वात मोठे नुकसान आहे; सोशल मीडियातून केवळ प्रतिक्रिया देत राहाणे; हेच जणू काही पक्ष-संघटनेचे कार्य मानण्याची परंपरा सुरू झाली आहे!
जनवाद नियतकालिकात करंट मधील मनिष बोधींचे उजेडाच्या शोधात प्रकाश वाचले. मनिष बोधींना वाटते बहुजन महासंघामुळे स्वत: प्रकाश आंबेडकर अंधारात जातील आणि आंबेडकरी चळवळीला आपले अस्तित्व आणि अस्मितेची किंमत मोजावी लागेल. ते म्हणतात की, खा. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष जातिपुरता मर्यादित केला. यावर प्रा. चिकटे सर लिहितात, “मनिष बोधीसारख्या अनुभवी कार्यकर्त्याने असे विधान करावे याचे नवल वाटते.”
२८ वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघ व सर्व साम्यवादी पक्ष, कामगार आघाडी सह मिळून बनवलेल्या “बहुजन श्रमीक समिती” या नावाने या सर्व पक्षांनी १९९५ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर असा एक सामाजिक-राजकीय आणि बहुजन विरोधी व्हायरसचा धुमाकूळ सुरू झाला आणि सर्वांचे एकमेव टिकेचे लक्ष भारिप बहुजन महासंघ आणि नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर बनले. खरं ही खदखद भारिप बहुजन महासंघ सुरू होताच किनवटचे भूमिहीन शेतमजूर, तरुण आदिवासी कार्यकर्ते भिमराव केराम हे आमदार म्हणून निवडून आले. तेही किनवट विधानसभेच्या मध्यवधी निवडणुकीत. त्यांनी कॉंग्रेसच्या कोट्यधीश उमेदवाराचा पराभव केला होता. फुले-शाहू-आंबेडकरी विचार-चळवळीची निवडणूक म्हणजे काय हे त्यावेळी पाहिले-अनुभवले. आधी आणि नंतरही अकोला जिल्हा व धुळे जिल्ह्यातून आमदार जिंकू लागले. कॉंग्रेस गटांना काहीच कळेना. ही राजकीय त्सुनामी काय प्रकारची आहे आणि इतकी पळवापळवी होवून, खोटा प्रचार करूनही आज वंचितच्या कालखंडातही या आंबेडकरी सामाजिक-राजकीय त्सुनामीला कसे रोखायचे कुणालाच कळत नाही आणि भविष्यात तर समजण्याची अजिबात शक्यता नाही. कारण त्यांनी पाळलेले पारंपरिक रिपब्लिकन नेतेच त्यांना माहीत होते. तेव्हापासून सा-यांची एकच बडबड सुरू झाली…वंचित आणि बाळासाहेब भाजप ची बी-टीम आहे.
प्रा. चिकटे सर हाच आरोप व चुकीच्या, खोट्या प्रचाराला खालील पत्रातून खोडायचा प्रयत्न करत आहेत. हे पत्र-लेख त्यांच्याच परिवारातील शैलेंद्र चिकटे यांनी स्वत:हून उपलब्ध करून दिले. त्याबद्दल नक्कीच आभारी आहोत….शांताराम पंदेरे) जनवादमध्ये करंटमधील मनिष बोधींचे उजेडाच्या शोधात प्रकाश वाचले. मनिष बोधींना वाटते बहुजन महासंघामुळे स्वत: प्रकाश आंबेडकर अंधारात जातील आणि आंबेडकरी चळवळीला आपले अस्तित्व आणि अस्मितेची किंमत मोजावी लागेल. ते म्हणतात की, खा. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष जातिपुरता मर्यादित केला. मनिष बोधीसारख्या अनुभवी कार्यकर्त्याने असे विधान करावे याचे नवल वाटते. अहो, खा. प्रकाश आंबेडकरांनी बहुजन महासंघाची स्थापना करून आंबेडकरी चळवळ ख-या अर्थाने व्यापक केली आहे. आणि एका जातीच्या मर्यादेतून बाहेर काढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अपेक्षेने पक्ष स्थापन केला होता; त्या अपेक्षेच्या अनुरूप प्रकाश आंबेडकरांनी दमदार आणि भक्कम पाऊल टाकले आहे. बाबासाहेबांची इच्छा होती की. एस.एम.जोशी, आचार्य अत्रेंसारखे नेते रिपब्लिकन पक्षात यावेत. पण त्यांचे महापरिनिर्वाण झाले व त्यानंतरच्या नेत्यांनी पक्ष व्यापक करणे तर सोडाच उलट तो विभाजित केला आणि रिपब्लिकन पक्ष म्हणजे, केवळ पूर्वाश्रमीच्या महारांचा व १९५६ नंतरच्या बौध्दांचा बनविला! या देशाची समाज व्यवस्था जातीच्या पायावर उभी आहे. नेत्यालाही त्याची जात चिकटविली जाते. त्यामुळे इतर जातीचे लोकही रिपब्लिकन पक्षाला बौध्दांचा व दलितांचा पक्ष समजत राहिले. ओ.बी.सीं.च्या उत्थानासाठी आलेला मंडल आयोग बाबासाहेबांची लेखणीची करणी व त्याचा पाठपुरावाही केला; तो रिपब्लिकन चळवळीने. पण, ज्यांच्यासाठी हे सर्व केले; त्यांना रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळ आपली वाटली नाही. कारण शेकडो वर्षांपासून त्यांच्या डोक्यात जातीचे विष पेरलेले आहे.
परंतु, हळूहळू त्यांना सत्य कळत आहे. ८५ टक्के बहुजन समाजाचे कल्याण, या देशाचे हित फक्त फुले आंबेडकरी विचारात आहे याची जाणीव होत आहे. त्यांच्या मतांवर ४५ वर्षे सत्ता भोगणा-यांनी त्यांची घोर फसवणूक केली, हे त्यांना कळून चुकले आहे. खरं तर त्यांना या आधीच कळले होते. पण, त्यांना स्वतंत्र मंच नव्हता. ते काम खास. प्रकाश आंबेडकरांनी व आम. मखराम पवारांनी केले आहे. प्रकाश आंबेडकरांची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. आंबेडकरी चळवळ त्यांनी खूप व्यापक केली आहे. पण, यामुळे आंबेडकरी चळवळीची अस्मिता व अस्तित्व कसे काय हरवू शकेल? उलट,या चळवळीला व्यापक पाया मिळणार आहे आणि बाबासाहेबांना जशी अपेक्षा होती की तेली, तांबोळी, सोनार, शिंपी, कुणबी, कोष्टी, माळी, भटके-विमुक्त, आदिवासी या सर्वांनी या पक्षात यावे, अगदी तोच प्रयत्न खास. प्रकाश यांनी केला आहे. ख-या फुले-आंबेडकरी व्यक्तींना समस्त ओ.बी.सी, भटक्या-विमुक्तांनी, आदिवासी व सर्व स्त्रियांनी आंबेडकरी विचार स्वीकारावा, असे वाटते. त्यामुळे पुढे चालून या चळवळीचे सूत्र त्यांनी स्वीकारले, तर आपणास आनंदच वाटायला हवा. हा तर आंबेडकरी विचाराचा विजयच आहे. त्यामुळे मनिष बोधींनी प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन करायला हवे व शक्य तेवढे त्यांना सहकार्य करायला हवे. फुले-आंबेडकरी विचारांचा स्वीकार सर्व समाजात व्हायला लागला आहे. त्यामुळे मनिष बोधी कश्ती दुबी नहीं, सफर तो अभी शुरू हुआ है. मंजिल तो अभि दूर नहीं. अंतिम विजय तर आमचाच आहे. प्रकाश आणखी आणखी प्रकाशात येत आहेत! प्रा.एस.टी. चिकटे, दादमहल, चंद्रपूर (संदर्भ: प्रकाश आंबेडकरांनाच खरा प्रकाश दिसला,
प्रा.एस.टी. चिकटे, दादमहल, चंद्रपूर,
जनवाद, २१.८.१९९३, शैलेंद्र चिकटे यांच्या मार्फत)