धुळे : शिरपूर तालुक्यातील रुपसिंगपाडा गावामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना एका गुप्त बातमीदाराकडून अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती मिळाली होती. रुपसिंग दुर्गा पावरा नावाचा व्यक्ती त्याच्या घराच्या मागील शेतात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक हिरे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पथकासह रुपसिंगपाडा येथे छापा टाकला. आरोपीच्या घराच्या मागील शेतात उसाच्या पिकामध्ये लपवलेल्या अवस्थेत पोलिसांना एक पत्र्याची कोठी आणि चार निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम सापडले.
त्यांची तपासणी केली असता, त्यात एकूण २२९.४२० किलोग्रॅम गांजा आढळून आला, ज्याची अंदाजित किंमत १६ लाख ५ हजार ९४० रुपये आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी रुपसिंग दुर्गा पावरा याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.