गाझा : गाझामध्ये उपासमारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह असून, आतापर्यंत 113 लोकांचा भुकेने मृत्यू झाल्याची माहिती हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मृतांचा हा आकडा सातत्याने वाढत आहे. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे, असे युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी (UNRWA) चे आयुक्त-जनरल फिलिप लाझ्झारिनी यांनी नमूद केले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, गाझामधील 2.1 दशलक्ष लोकांना मूलभूत गरजांची तीव्र टंचाई जाणवत आहे आणि तिथे कुपोषण वाढत आहे. गाझामधील प्रत्येक घरावर उपासमारीचे संकट घोंघावत आहे.
100 हून अधिक आंतरराष्ट्रीय मदत संघटना आणि मानवाधिकार गटांनीही गाझामध्ये मोठ्या प्रमाणात उपासमारीचा इशारा दिला आहे. लाझ्झारिनी यांनी म्हटले आहे की, त्यांच्या टीमला दिसणारी बहुतेक मुले दुर्बळ आणि कमकुवत असून, त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होण्याचा धोका वाढू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 23 जुलै रोजी म्हटले होते की गाझाची मोठी लोकसंख्या उपासमारीने मरत आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी या परिस्थितीला “सामूहिक उपासमार” असे संबोधले आणि ती मानवनिर्मित असल्याचे म्हटले.
मानवी मदत करणाऱ्या संस्थेच्या कर्मचारी, तहानी शेहादा यांनी बीबीसीला सांगितले की, गाझामधील लोक दररोज जगण्यासाठी संघर्ष करत नाहीत, तर ते दर तासाला जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.
गाझामधील रहिवासी बीबीसीला सांगतात की, मदत वाटप होत असलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास गोळ्या घातल्या जातील, अशी त्यांना भीती वाटते. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांत अन्न मदत मिळवण्याच्या प्रयत्नात इस्रायली सैन्याने 1,000 हून अधिक पॅलेस्टिनींना ठार केले आहे.
महमूद अब्दुल रहमान अहमद यांनी बीबीसीला सांगितले की, 20 जुलै रोजी सकाळी त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी पाणी वितरण केंद्राकडे गेला होता. रिकामे कॅन घेऊन इतरांसोबत रांगेत उभा असताना, अचानक त्या ठिकाणी आणि पाणी वितरण केंद्रावर बॉम्ब हल्ला झाला, ज्यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.
दोन महिन्यांच्या युद्धबंदीनंतर मार्चच्या सुरुवातीला इस्रायलने गाझाला मदत पोहोचवणे थांबवले होते. जवळजवळ दोन महिन्यांनंतर नाकेबंदी अंशतः शिथिल करण्यात आली, परंतु अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा वाढतच गेला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर: पालघरमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर, शाळांना सुट्टी
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील...
Read moreDetails