अहिल्यानगर : नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कुणी विजयाचा गुलाल उधळत आहे, तर कुणी पराभवाचे खापर फोडत आहे. मात्र, या विजयापेक्षाही गंभीर प्रश्न भारतीय लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर उभा ठाकला आहे. ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर उपस्थित झालेले प्रश्न हे केवळ राजकीय आरोप नसून, ते सामान्य मतदाराच्या मनात घर करून बसलेली भीती आणि अस्वस्थता आहे याच विषयावर वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी मांडलेले परखड विचार मांडले आहेत.
या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ (VVPAT) ची अनुपस्थिती हा लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रकार ठरला आहे. मतदाराने दिलेले मत ही केवळ सॉफ्टवेअरमधील ‘डिजिटल नोंद’ नसून, तो जनतेचा सर्वोच्च ‘कौल’ असतो. जगातली प्रगत राष्ट्रे तांत्रिक धोके ओळखून पुन्हा बॅलेट पेपरकडे वळत असताना, भारतात मात्र यंत्राचा अट्टाहास का? असा प्रश्न पडतो.
याच पार्श्वभूमीवर, शेजारील कर्नाटक राज्यामध्ये स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याबाबत सुरू झालेले विचारमंथन हे पुरोगामी विचारांचे द्योतक आहे. महाराष्ट्राच्या मातीतही प्रत्येक नागरिकाला ‘माझे मत कुठे गेले’ हे पाहण्याचा घटनादत्त अधिकार मिळायलाच हवा. जर कर्नाटक बॅलेट पेपरचा धाडसी विचार करू शकते, तर महाराष्ट्र सरकारने यापासून बोध घेऊन तातडीने अंमलबजावणी करायला हवी, ही आमची ठाम भूमिका आहे. केवळ यंत्रावरच संशय नाही, तर प्रशासकीय पातळीवर मतदार याद्यांचा झालेला बोजावारा हा लोकशाहीवरचा मोठा आघात आहे.
हजारोंच्या संख्येने नावे गायब होणे, जिवंत मतदाराला मृत ठरवणे आणि हक्काच्या मतदाराची नावे ऐनवेळी गायब करणे, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. जेव्हा पायाच (मतदार यादी) सडलेला असतो, तेव्हा त्यातून मिळणारा निकाल ‘पवित्र’ कसा मानता येईल? हा केवळ तांत्रिक बिघाड नसून लोकशाहीच्या हक्काची केलेली ‘पद्धतशीर लूट’ आहे. लोकशाही ही ‘लोकांसाठी’ असते, यंत्रांच्या ‘हट्टासाठी’ नाही. जर जनतेचा विश्वास यंत्रावर नसेल, तर हट्टास पेटून तांत्रिक प्रगतीचे तुणतुणे वाजवणे हे हुकूमशाहीच्या मानसिकतेचे लक्षण आहे.
पारदर्शक मतदार यादी आणि मतपत्रिकेद्वारे होणारी पारदर्शक निवडणूक हीच आता लोकशाही वाचवण्याची संजीवनी आहे. प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने मतदारांचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी तातडीने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शेवटी, लोकशाहीत ‘विजयाचा वेग’ किती आहे यापेक्षा, तो ‘विश्वासार्ह’ किती आहे याला जास्त महत्त्व असायला हवे.





