मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी असून अत्यंत निषेधार्ह आहे. या निषेधार्थ मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य उत्कर्षाताई रूपवते, तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष कार्यालय प्रमुख शिवाजीराव नलावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. पक्षाच्या वतीने रुपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.





