सभागृहात बाजू न मांडल्यामुळे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमीन पटेल यांना हायकमांडची नोटीस!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेले जनसुरक्षा विधेयक सध्या काँग्रेस पक्षात अंतर्गत गोंधळाचे कारण ठरत आहे. या वादग्रस्त विधेयकावर अपेक्षित विरोध न केल्याने काँग्रेस हायकमांडने वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, आणि अमीन पटेल यांच्याकडे अहवाल मागवला आहे. त्या संदर्भातील नोटीस देखील यांना बजवण्यात आली आहे.
हायकमांडने या नेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याचे सांगितले जात असले तरी, विजय वडेट्टीवार यांनी अशा कोणत्याही नोटीबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार यांनी अशी कबुली दिली की, या विधेयकावर कठोर विरोध होणे आवश्यक होते. “मी सभागृहात असतो, तर हे बिल फाडून टाकलं असतं,” असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, ते विधेयक सभागृहात आले त्यावेळी उपस्थित नव्हते.
त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेली विरोधाची नोट सर्व आमदारांकडे होती, असेही नमूद केले. मात्र, सरकारकडून ‘समितीत चर्चा झाली’ या कारणावर विधेयकाला गोंधळात मंजुरी मिळाल्याचे ते म्हणाले.
या घडामोडींमुळे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत काहीजण छुपेपणाने भाजप सोबत असल्याची कुरबुर सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीने या विधेयकाविषयी आक्रमक भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष दिसून आला होता.