काँग्रेसचे दलित, आदिवासींवरील प्रेम म्हणजे ढोंग : ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : कर्नाटक सरकारने दलित आणि आदिवासी यांच्यासाठी राखीव असलेला 14 हजार 730 कोटींचा निधी इतरत्र वळवला आहे. काँग्रेस केवळ मतांसाठी दलित, आदिवासींवर प्रेम दाखवते. ते त्यांचे ढोंग आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केला आहे. त्यांनी याबाबत ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार निवडणुकीत जनतेला दिलेल्या हमी योजना पूर्ण करण्यासाठी अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतील (एससीएसपी-टीएसपी) निधी वळवत आहे? काँग्रेसला दलित आणि आदिवासींवर अजिबात प्रेम नाही. काँग्रेसला फक्त दलित आणि आदिवासींची मते हवी आहेत.
यासंदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली असून, 7 दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या निधीतून १४,७३० कोटी रुपये काँग्रेसने आश्वासन दिलेल्या पाच हमी योजना पूर्ण करण्यासाठी वापरले जाणार आहेत.
हा वळविण्यात येणारा निधी म्हणजे दलित आणि आदिवासींवर अन्याय करण्यासारखे आहे. कारण, कर्नाटकात दलित-आदिवासी सर्वाधिक वंचित, पीडित असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे. दलित, आदिवासींचा निधी इतरत्र वळवताना भाजप आणि काँग्रेसने थोडी तरी लाज बाळगावी असाही टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.