वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा (महाराष्ट्र) च्या विधी विभागात आयोजित फ्रेशर्स पार्टीदरम्यान काही असामाजिक तत्वांनी संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक –
या प्रकरणाला वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी संघटना असलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनने उचलून धरले आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, विद्यापीठ प्रशासनाकडे यावर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने स्पष्ट केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे आणि तो कदापी सहन केला जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र भेट देऊ इच्छित होते. मात्र, याच वेळी सवर्ण विद्यार्थ्यांच्या एका गटाने या कृतीला तीव्र विरोध केला. त्यांनी केवळ आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या नाहीत, तर बाबासाहेबांचा सन्मान करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना मारहाणही केल्याचे सांगण्यात येत आहे. हा अत्यंत गंभीर आणि संविधानाच्या मूल्यांचे उल्लंघन करणारा प्रकार आहे.
पोलीस प्रशासनाकडे कायदेशीर कारवाईची मागणी –
वंचित बहुजन आघाडी आणि संबंधित विद्यार्थी संघटनांनी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडेही कठोर मागणी केली आहे. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या सवर्ण विद्यार्थ्यांवर आणि मारहाणीत सामील असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
पीडित विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपली विद्यार्थी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.