मुंबई : टाटा मोटर्सची (Tata Motors) ब्रिटनस्थित उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) एका मोठ्या संकटात सापडली आहे. एका गंभीर सायबर हल्ल्यामुळे कंपनीला तब्बल 2 अब्ज पाउंड (सुमारे ₹ 2,38,61,66,00,000 / 2.38 लाख कोटी) इतके प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या धक्कादायक बातमीमुळे शेअर बाजारात खळबळ उडाली असून टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.
सायबर हल्ल्यामुळे JLR चे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कंपनीला आपल्या अनेक कारखान्यांमधील उत्पादन थांबवावे लागले आहे. सुरुवातीला 24 सप्टेंबरपर्यंत उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण आता ही मुदत 1 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यामुळे कंपनीने सुमारे 33,000 कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालानुसार, उत्पादन थांबल्यामुळे JLR ला दर आठवड्याला 50 मिलियन पाउंड (सुमारे 68 मिलियन डॉलर) इतके मोठे नुकसान होत आहे.नफा बुडण्याची भीती आणि शेअर बाजारात घसरणJLR हा टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात सुमारे 70% योगदान देणारा महत्त्वाचा विभाग आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये JLR ने सुमारे 1.8 अब्ज पाउंड नफा कमावला होता, परंतु सायबर हल्ल्यामुळे होणारे अपेक्षित नुकसान त्याहूनही जास्त असण्याची भीती आहे.
यामुळे याचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या शेअरवर झाला. बुधवारी बीएसईवर कंपनीचा शेअर जवळपास 4% घसरून ₹655.30 वर आला होता, तर दिवसअखेरीस तो 2.7% घसरून ₹682.75 वर बंद झाला. गुरुवारी (सकाळी 11.30 पर्यंत) तो आणखी 2.87% घसरून ₹663.15 वर व्यापार करत होता. ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
विम्याचा आधारही नाही!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, JLR ने अशा प्रकारच्या आपत्कालीन स्थितीसाठी कोणताही सायबर विमा घेतलेला नव्हता. लॉकटन नावाची विमा कंपनी पॉलिसी तयार करण्याच्या प्रक्रियेत होती, पण ती वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता हा संपूर्ण आर्थिक भार कंपनीला स्वतःच्या खांद्यावर पेलावा लागणार आहे. यामुळे JLR आणि टाटा मोटर्सवर मोठा आर्थिक दबाव येण्याची शक्यता आहे.