मुंबई : क्रिमीलेयर आरक्षण संपवण्याचे तंत्र आहे. ओबीसी आरक्षणात क्रिमीलेयर आणून ओबीसींचे आरक्षण निकामी करण्यात आले, आता एससी, एसटी या क्रिमीलेयर लागू करून आरक्षणातून काढण्याचे डावपेच आखले जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
या वेळी त्यांनी राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी हे काय म्हटले आणि त्याचा कसा विपर्यास केला जातो यावर निखिल वागळे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत आहेत. निखिल वागळे यांनी व्हिडिओ करायच्या 48 तास आधीच तेलंगणा सरकारने एससी आणि एसटी आरक्षण उप वर्गीकरणासाठी समिती गठीत केली आहे. पण यावर निखिल वागळे काहीच बोलत नाहीत.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने आरक्षण उप वर्गीकरणाचा निकाल दिला. यानुसार एससी, एसटी यांच्यामध्ये अ,ब,क,ड असे वर्गीकरण होणार आहे. या निर्णयाला देशभरातील आंबेडकरवादी नेते, पक्ष आणि संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा क्रिमीलेयरला विरोध दर्शवला. त्याच बरोबर 21 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या भारत बंद ला पाठिंबा देखील जाहीर केला होता.