मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवर अत्याचार वाढले आहेत. जे स्वतःला तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सांगत असतात ते यावर तोंड उघडायला तयार नाहीत. तोंड उघडणे राहु द्या, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिमांचे नाव देखील घ्यायला तयार नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
मौलाना सज्जाद नुमानी यांचा व्हिडिओ तय्यब जफर यांनी दाखवला. यामध्ये मौलाना सज्जाद नुमानी म्हणत आहेत की, काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या तोंडून मी मुस्लीम शब्द ऐकायला व्याकूळ झालो आहे.
जफर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि महाराष्ट्रात शिवसेना या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करा असे मुस्लिमांना सांगण्यात आले. पण आता मुस्लिमांच्या हत्या वाढल्या आहेत. भारतात पाहिले, तर अशा ठिकाणी सुद्धा मुस्लिमांच्या हत्यांचे प्रमाण वाढले आहे जिथे काँग्रेस सत्तेत आहे. तेलंगणा असो किंवा हिमाचल प्रदेश असो पण काँग्रेस गप्प आहे. ते ना भाजप सत्तेत असणाऱ्या ठिकाणी आवाज उठवत आहेत ना जिथे ते स्वतः सत्तेत आहेत अशा ठिकाणी बोलायला तयार आहेत.
अशा परिस्थितीत मी मुस्लिमांना आवाहन करू इच्छितो की, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, आपल्याला कोणासोबत जायचे आहे. मी जेव्हा पाहतो की, मुस्लिमांसाठी जर कोणी नेतृत्व उभे राहत असेल, तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि कोणता पक्ष उभा राहत असेल, तर तो वंचित बहुजन आघाडी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आता मॉब लिंचींगचा मामला असो, किंवा हत्यांचा प्रश्न असो बाळासाहेब आंबेडकर आमचा आवाज बनून भाष्य करत असतात. परंतु, काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे हे बोलण्यापासून वेळ मिळाला, तर कदाचित ते बोलतील. मी काँग्रेसला विनंती करतो की, तुम्हाला जर वेळ मिळाला, तर दलित, आदिवासी, मुस्लीम यांच्यावर कुठे अन्याय होतोय ते पाहावं, असा खोचक टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.