उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठी आपत्ती ओढवली असून, यामुळे गंगोत्री धाम आणि मुखवा येथील धराली गावाजवळ असलेल्या खीरगंगा नाल्यात अचानक पूर आला. या पुराच्या पाण्यासोबत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे (मलब्यामुळे) अनेक घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. ही घटना घडल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ढगफुटीमुळे पाण्याचा प्रवाह खूप वेगाने गावांमध्ये शिरला. यामुळे धराली गावातील अनेक घरांना मोठा तडाखा बसला. स्थानिकांनी सांगितलं की, पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की लोकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे गंगोत्री धाम आणि गंगाजीच्या हिवाळ्यातील प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या मुखवा गावाजवळील धार्मिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागालाही धोका निर्माण झाला आहे.
बचावकार्य आणि प्रशासनाची भूमिका
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तात्काळ बचावकार्यात उतरला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) यांच्या टीम्सना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि लष्करही बचावकार्यात मदत करत आहे.
प्रशासनाने लोकांना नदीकाठी न थांबण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. हर्षिल परिसरात खीरगंगा नाल्याची पाण्याची पातळी वाढल्याने धरालीमध्ये जास्त नुकसान झालं आहे. प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे.
गंगोत्री धाम आणि मुखवाजवळ घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीती आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, पाण्याचा लोंढा आणि मातीचे ढिगारे इतक्या वेगाने आले की त्यांना आपलं सामान आणि कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा वेळच मिळाला नाही.
या आपत्तीमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे, कारण त्यांची घरं आणि शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर, हवामान बदलामुळे अशा घटनांमध्ये होणारी वाढ आणि डोंगराळ भागातील अनियंत्रित बांधकाम व जंगलतोड यामुळे आपत्तींची तीव्रता वाढत असल्याचं तज्ज्ञांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.